राज्याच्या आरोग्यसेवेचा बोजवारा : विश्वजित

0
114

राज्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असून आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देऊन गोमेकॉसह राज्यातील सर्व सरकारी इस्पितळांत येणार्‍या रुग्णांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध होतील याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे माजी आरोग्यमंत्री व आमदार विश्वजीत राणे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांना जोपर्यंत मंत्री वठणीवर आणणार नाहीत, तोपर्यंत खात्यातील सावळागोंधळ दूर होणार नसल्याचे राणे म्हणाले.या घडीला सर्वांत मोठी समस्या आहे ती औषधांची. गोमेकॉसह सर्व सरकारी इस्पितळांत औषधांचा कधी नव्हे एवढा तुटवडा असून त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना सरकारी इस्पितळातून मोफत मिळणारी औषधे आता मिळत नसल्याने त्यांना ही महागडी औषधे खासगी औषधालयांतून विकत घ्यावी लागत आहेत. गरिबांपुढे ही महागडी औषधे कशी विकत घ्यावीत ही समस्या उभी राहू लागली असल्याचे सांगून ‘अच्छे दिन’ची भाषा करणार्‍यांना हे शोभत नसल्याचे ते म्हणाले. गोमेकॉ, दंत महाविद्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, आयपीएचबी या सर्वांना औषधांसाठी एकच निविदा काढण्याचा निर्णय हा चुकीचा असून त्या सर्वांच्या औषधांसाठीच्या गरजा या वेगवेगळ्या असल्याचे ते म्हणाले. औषधांसाठी गेल्या ऑगस्ट महिन्यात निविदा काढण्यात आली होती, मात्र नंतर काहीच झाले नसल्याचे ते म्हणाले. गोमेकॉतील शवागाराचा प्रश्‍नही ऐरणीवर असल्याचे ते पुढे म्हणाले. त्यामुळे तेथे मृतदेह ठेवण्यासाठी जागाच नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण आरोग्यमंत्री असताना डिचोली, सांखळी, वाळपई येथे इस्पितळे उभारली होती. ती सुरू करणे भाजप सरकारला शक्य झाले नसल्याचा आरोपही यावेळी राणे यानी केला. आपण राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू केली होती. नव्या सरकारने त्या सेवेचीही वाट लावल्याचा आरोप करताना या रुग्णवाहिकेत काम करणारे सर्व प्रशिक्षित कर्मचारी नोकरी सोडून गेलेले असून आता आहेत ते अप्रशिक्षित कर्मचारी, असेही राणे म्हणाले.
यासंबंधी आपण लवकरच आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना निवेदन देणार असल्याचे त्यानी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस हेही उपस्थित होते.