राज्यपालांची गोवा यात्रा

0
29

राज्यपाल हे संवैधानिक पद केवळ बुजगावणे नसून त्या पदावरील व्यक्ती सक्रिय राहिली, तर कितीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतात हे अनेकवेळा दिसून आले आहे. जे. एफ. आर. जेकब यांच्यासारखा राज्यपाल गोव्यात सक्रिय झाला, तेव्हा तर सरकार नको, राज्यपालांची राजवटच हवी अशी मागणी होण्याइतपत उत्कृष्ट कार्य त्यांनी त्यावेळी करून दाखवले होते. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आपल्या सत्यवादी बाण्याने तमाम गोमंतकीयांची मने जिंकली. विद्यमान राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे त्यांनी नुकत्याच यशस्वीरित्या पार पाडलेल्या गोवा संपूर्ण यात्रेमुळे स्मरणात राहतील. पिल्लई हे पहिलेच राज्यपाल आहेत, ज्यांनी संपूर्ण गोवा, म्हणजे तब्बल १९१ ग्रामपंचायतक्षेत्रांतील ४२१ गावांना भेट देऊन या यात्रेत पिंजून काढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राज्यपालांनी ग्रामीण, उपेक्षित जिल्ह्यांना भेट देऊन तेथील जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्याचे आवाहन केले होते, त्याला अनुसरून राज्यपालांनी ही यात्रा काढली. ते गावोगावी गेले, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू वगैरे ठिकाणांना त्यांनी भेट दिलीच, परंतु त्याच बरोबर सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना आणि कर्करोग, मूत्रपिंडविकार असणार्‍या रुग्णांना भरीव आर्थिक मदतही केली. या यात्रेतून आपण काय साध्य केले त्याचा अहवालही त्यांनी तत्परतेने प्रकाशित केला आहे. गोव्याचा जेवढा भाग राज्यपालांनी या यात्रेदरम्यान पाहिला, तेवढा गोमंतकीय जनतेनेही क्वचितच पाहिला असेल. राजकीय नेत्यांनी तरी ह्या एवढ्या ठिकाणांना भेटी दिलेल्या असतील का शंकाच आहे. हा दौरा पर्यटनासाठी नव्हता, तर गोवा, त्याची जनता, तिच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी होता अशी भूमिका राज्यपालांनी मांडली असल्याने आणि तिची फलश्रृती लक्षात घेता तिचे स्वागतच करायला हवे. गोवा सुंदर आहेच, पण येथील बहुतांशी जनताही सुंदर आहे, असे उद्गार त्यांनी या यात्रेनंतर मनापासून काढले. श्रीधरन पिल्लई हे स्वतः एक सिद्धहस्त साहित्यिक आहेत. त्यांची आजवर सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे आपल्या गोव्याच्या या दौर्‍यातून त्यांना जो गोवा दिसला, भावला, समजला, त्यावरही ते एखादे पुस्तक निश्‍चित लिहितील. त्यांनी ते जरूर लिहावे.
स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या मदतीनेच त्यांनी ही यात्रा पार पाडली असल्याने गोव्याच्या ग्रामीण भागाच्या समस्या कितपत त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील शंकाच आहे, परंतु तरीही वीज, पाणी, रस्ते अशा अत्यंत मूलभूत समस्यांबाबत जनतेने या यात्रेदरम्यान त्यांच्याकडे साकडे घातलेले दिसते. आता या समस्यांचे निराकरण काही त्यांच्या हाती नाही. परंतु आपल्या सरकारला ते त्या समस्यांबाबत अवगत तरी करू शकतात. आपण संबंधित खात्यांना, मंत्र्यांना व्यक्तिशः पत्रे लिहून या समस्या त्यांच्यापुढे मांडणार असल्याचेही राज्यपाल महोदयांनी समापन सोहळ्यातील आपल्या भाषणात सांगितले आहे.
यात्रेचा समापन सोहळाही राजभवनच्या दरबार हॉलमध्ये मंत्री, आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच आदींच्या भरगच्च उपस्थितीत झाला. मात्र, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी या समापन कार्यक्रमात पूर्णतः राजकीय भाषण करून म्हादई, राज्यातील बेरोजगारी आणि जनतेचा विरोध असलेले प्रकल्प या तीन विषयांत राज्यपालांनी सरकारला समज द्यावी असे आवाहन केले, ते औचित्यभंग करणारे होते. परराज्यातून आलेली, वैधानिक पदावरील व्यक्ती गोवा, गोव्याची जनता, तिच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करते, त्यासाठी स्वतःहून अगत्याने गावोगावी जाते, जनतेमध्ये मिसळते, नुसती भेटत नाही, तर मानवसेवा हीच माधवसेवा या भावनेने जमेल तशी आर्थिक मदतही करते, तेव्हा त्याचे स्वागत करायचे सोडून, त्याला राजकीय वळण देणे औचित्याला धरून नव्हते असे आम्हाला वाटते. राज्यपाल महोदयांनी राजभवनाला लोकभवन करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले आहे. सरंजामशाही परंपरेचे एक प्रतीक असलेले राजभवन हे लोकभवन करण्याच्या दिशेने आजवर काही राज्यपालांनी निश्‍चितपणे प्रयत्न केले. कोणी राजभवन जनतेला खुले केले, तर कोणी विविध समाजघटकांना आवर्जून राजभवनावर निमंत्रित करून, सन्मानित करून त्यांच्या कार्याची दखल घेतली. विद्यमान राज्यपाल तर त्याहीपुढे काही पावले गेले आणि ते स्वतः राजभवनाच्या हस्तिदंती मनोर्‍यातून बाहेर पडले, गावोगावी फिरले, जनतेत मिसळले. अशावेळी त्यामागील प्रांजळ भावना समजून न घेता केवळ विरोधासाठी विरोधाचे राजकारण करायचे हे नक्कीच योग्य नाही.