राजीव गांधींच्या मारेकर्‍यांच्या सुटकेचे आदेश

0
9

>> सर्वोच्च न्यायालयाचा आदेश; जवळपास ३० वर्षांनंतर नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रनसह सर्व ६ दोषींची सुटका होणार

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या सर्व ६ दोषींची सुटका करण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले. दोषींमध्ये नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन यांच्यासह रॉबर्ट पायस, सुतेंत्र राजा संतान, श्रीहरन मुरुगन आणि जयकुमार यांचा समावेश आहे. या प्रकरणातील सातवा दोषी ए. जी. पेरारिवलन याची याआधीच सुटका करण्यात आली आहे. या दोषींवर अन्य कुठलाही खटला सुरू नसेल, तर त्यांना मुक्त करण्यात यावे. हे सर्व दोषी गेल्या ३० वर्षांहून जास्त काळ मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दोषी पेरारिवलन याला जो न्याय लावला, तोच या प्रकरणातील या दोषींसाठीही लावायला हवा, असे मत न्यायमूर्तींनी व्यक्त केले.

२१ मे १९९१ साली निवडणुकीच्या प्रचार फेरीवेळी तामिळनाडूमध्ये आत्मघाती हल्ला घडवून आणत राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) ७ जणांना आरोपी म्हणून दोषी ठरवण्यात आले होते. टाडा न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती; मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने दयेचा अर्ज स्वीकारत फाशीची शिक्षा रद्द करत दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

याआधी राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी ए. जी. पेरारिवलन याची १८ मे रोजी सुटका करण्यात आली होती. पेरारिवलन याने राजीव गांधींच्या हत्याप्रकरणात ३० वर्षे शिक्षा भोगलेली आहे. त्याने संविधानातील कलम १४२ चा आधार घेत आपल्या सुटकेची मागणी केली होती. नलिनी हिने पेरारिवलनच्या बाबतीत घेण्यात आलेल्या याच निर्णयाचा दाखला देत आपली देखील सुटका करावी, अशी मागणी पहिल्यांदा मद्रास उच्च न्यायालयात केली होती; मात्र न्यायालयाने तिची याचिका फेटळाली होती. त्यानंतर तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी तिच्या याचिकेवरील सुनावणीवेळी राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व ६ दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. दरम्यान, नलिनी ही सध्या पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर आहे.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी दोष सिद्ध झाल्यानंतर गेल्या ३० वर्षांपासून शिक्षा भोगत असलेल्या या सर्व कैद्याचे तुरुंगातील वर्तन समाधानकारक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. काल सुटका करण्याचे आदेश दिलेल्या सहांपैकी रॉबर्ट पायस या दोषीविषयी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, त्याचे तुरुंगातील वर्तन खूप चांगले आहे. तसेच तो अनेक आजारांनी त्रस्त आहे. एवढेच नाही तर कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याने शिक्षण घेत वेगवेगळ्या पदव्याही संपादित केल्या आहेत. दुसरा दोषी जयकुमार यानेही तुरुंगातील शिक्षेच्या कालावधीत अभ्यास करत अनेक पदव्या मिळवल्याचे निरीक्षण न्यायालयाने सुटकेच्या आदेशात नोंदवले आहे. या खटल्यात दोषींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ संजय हेगडे आणि गोपाल शंकरनारायणन यांनी काम पाहिले, तर सरकारी पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ राकेश द्विवेदी यांनी काम पाहिले.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरांबुदूर येथे आत्मघाती स्फोटात हत्या करण्यात आली होती. या हत्येसाठी १९९८ मध्ये टाडा न्यायालयाने तब्बल २५ जणांना फाशीची शिक्षा सुनावली होती. टाडा न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोहोचल्यावर न्यायमूर्ती के. टी. थॉमस यांच्या खंडपीठाने २५ पैकी १८ दोषींची सुटका केली होती; मात्र पेरारिवलन, नलिनी श्रीहरन, सुतेंत्र राजा संतान आणि श्रीहरन मुरुगन या चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. अन्य तिघांची फाशी जन्मठेपेत बदलण्यात आली होती. २००० साली तामिळनाडू सरकारने नलिनीची फाशीची शिक्षा बदलून जन्मठेप करण्याचा प्रस्ताव संमत केला आणि मद्रास उच्च न्यायालयाने त्याला संमती दिली. २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अन्य तीन दोषी पेरारिलवन, श्रीहरन आणि संतान यांची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा बदलून दिली. २०१८ मध्ये तत्कालीन अण्णाद्रमुक सरकारने या सातही दोषींना फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याचा ठराव संमत केला होता.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अस्वीकारार्ह : कॉंग्रेस
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. कॉंगेसेचे नेते जयराम रमेश यांनी या आदेशाला दुर्देवी आणि अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अस्वीकारार्ह आणि अयोग्य आहे. कॉंग्रेस पक्ष या निर्णयानंतर आपली नाराजी व्यक्त करत असून, हा निकाल असमर्थनीय आहे, असे जयराम रमेश म्हणाले.