राजस्थानमध्ये ईदच्या दिवशी हिंसाचार

0
17

>> झेंडे फडकवण्यावरून वाद; दगडफेकीत पाच पोलीस जखमी

देशभरात काल ईदचा सण साजरा करण्यात आला; परंतु तत्पूर्वी ईदच्या पूर्वसंध्येला सोमवारी रात्री उशिरा राजस्थानमधील जोधपूर शहरात धार्मिक तणाव निर्माण होऊन त्याची परिणिती हिंसाचारात झाली. यावेळी झालेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र मंगळवारी सकाळी नमाज पठण झाल्यानंतर पुन्हा तेथे काही लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे या भागात पुन्हा तणाव वाढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोधपूरमधील हा वाद सोमवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाला. मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी जोधपूरमधील जालोरी गेटजवळ धार्मिक झेंडे फडकवले. चौकात बसवलेल्या स्वातंत्र्यसैनिक बालमुकुंद बिस्सा यांच्या पुतळ्यावर या नागरिकांनी झेंडा लावला. त्याला हिंदू समाजातील काही लोकांनी विरोध केला. याबरोबरच परशुराम जयंतीनिमित्त लावलेल्या भगव्या ध्वजावरून दोन्ही समाजाचे लोक समोरासमोर आले. त्यानंतर याच तणावातून दोन्ही गटात मारामारी झाली. दरम्यान, या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.