राजरोस दरोडा

0
7

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास उडावा अशी घटना काल पुन्हा एकवार घडली. कोजागरी पौर्णिमेच्या चांदण्याच्या लखलखीत प्रकाशात काल म्हापशात एका डॉक्टरच्या बंगल्यावर दरोडा पडला. पहाटे तीन वाजता पाच – सहा दरोडेखोर गज कापून बंगल्यात काय शिरतात, घरातील सगळ्यांना सुऱ्याचा आणि लोखंडी रॉडचा धाक दाखवून, मारबडव करून त्यांच्याच घरातील चादरी फाडून बांधून काय घालतात आणि सगळे पैसे आणि दागदागिने घेऊन त्यांच्याच गाडीने बेधडक पसार काय होतात! सगळेच अचंबित करणारे आणि राज्यातील जनतेच्या सुरक्षेविषयी फार मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. ह्या दरोडेखोरांनी लुटलेल्या मालासह पलायन करताना डॉक्टरची कार कुठे आडजागी नव्हे, तर अगदी राजधानी पणजीत मांडवी पुलावर राजरोस उभी केलेली सापडली आहे. म्हणजे एका अर्थी हा दरोडा म्हणजे गोवा पोलिसांना ह्या दरोडेखोरांच्या टोळीने दिलेले खुले आव्हानच आहे. पोलीस यंत्रणेच्या नाकावर टिच्चून हा दरोडा घातला गेला आहे. सर्वांत कमाल वाटते ती ह्या गुन्हेगारांच्या धाडसाची. त्यांनी शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा तर घातलाच, परंतु नुसता दरोडा घातला नाही. पहाटे तीन वाजता घरातील वृद्धेने स्वतःसाठी केलेला चहा आरामात पिऊन, फ्रीजमधली सफरचंदे वगैरे खाऊन हे दरोडेखोर अगदी निवांतपणे निघून गेले आहेत. गुन्हेगारी समूळ रोखता येत नसते हे खरे. ती अचानक, अकल्पितरीत्या घडते हेही खरे, परंतु जे घडले ते एवढ्या राजरोसपणे घडणे आणि त्या दरोडेखोरांच्या मनात पोलीस यंत्रणेविषयी यत्किंचितही भीती वा धाक दिसून न येणे हे नक्कीच अतिशय धक्कादायक आहे. ज्या निवांतपणे कोजागरीच्या चांदण्यात ते बंगल्यात प्रवेशले, घरात तब्बल दोन तास त्यांनी धुमाकूळ घातला आणि मुख्य म्हणजे पळून जाताना देखील घरमालकाचीच कार घेऊन थेट राजधानी पणजीत दाखल झाले आणि अगदी रहदारीच्या ठिकाणी कार उभी करून पळून गेले म्हणजे कमालच म्हणायला हवी. पोलिसांची यत्किंचितही भीती ह्या दरोडेखोरांना असू नये? ना आपसातील टोळीयुद्धे लढणाऱ्या, सामाजिक कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ला चढवणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांना पोलिसांचा धाक, ना मटका जुगारवाल्यांना धाक, ना अमली पदार्थ विक्रेत्यांना, ना दरोडेखोरांना. मग ही अशी कुचकामी पोलीस यंत्रणा केवळ सर्वसामान्यांना आपल्या वर्दीची गुर्मी दाखवायला आणि राज्यातील राजकीय नेत्यांच्या सरबराईपुरती उरली आहे काय? शिवाय अशा प्रकारच्या दरोड्याची ही काही राज्यातील पहिलीवहिली घटना नव्हे. दोनापावल येथे वृद्ध दांपत्याला बांधून घालून सगळे दागदागिने आणि पैसाअडका लुटून पसार झालेले दरोडेखोर त्या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना महिने उलटले तरी अजूनही सापडलेले नाहीत. ते दांपत्य अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आता म्हापशातील ह्या घटनेने जनतेच्या मनामध्ये पुन्हा एकदा दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. राज्याचे गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन स्वतः घडलेल्या घटनेची दखल घेतली हे ठीक झाले. निदान पोलीस यंत्रणेला ह्या गुन्ह्याचा तपास लावावाच लागेल ही जाणीव तरी ह्यातून होईल. हा दरोडा म्हणजे खरे तर गोवा पोलिसांची आजवरची प्रतिष्ठा पणाला लावणारी घटना आहे. राज्यामध्ये रात्रीची गस्त, नाकाबंदी हा प्रकार बंदच झालेला दिसतो. कोणीही यावे, लुटावे आणि पसार व्हावे हा नित्याचा शिरस्ता बनला आहे. ठिकठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे मग काय कामाचे? आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात अशा प्रकारच्या गुन्ह्याचा तपास लावणे जरी अगदीच सोपे नसले तरी तसे कठीणही नसते. त्यात ज्या उघडपणे हा दरोडा घातला गेला आहे, ते पाहता ठिकठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासली, कॉल रेकॉर्ड तपासले, तर हे दरोडेखोर म्हापशात कसे आले, पणजीत का आले आणि कुठे पळून गेले हा सगळा माग काढता येईलही, परंतु त्यांना त्यांच्या गुन्ह्याची कठोरातील कठोर सजा न्यायव्यवस्थेकडून मिळवून देण्यात पोलीस सफल ठरतील का हाही कळीचा मुद्दा आहे. अशा प्रकारचे दरोडे टाकून पळून जायचे प्रकार गोव्यात सातत्याने वर्षानुवर्षे होत असतात. क्वचित दरोडेखोर पकडलेही जातात, परंतु त्यांना जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा झाल्याचे क्वचितच कानी येते. अनेक प्रकरणांच्या तपासकामात विलक्षण ढिलाई दिसते. परिणामी गुन्हेगार मोकळे सुटतात. हे यापुढे तरी होऊ नये. म्हापशातील दरोड्यातील गुन्हेगारांचा वेगाने शोध लावून पोलीस यंत्रणेने अलीकडच्या काळात गमावलेली आपली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करावी आणि जनतेच्या मनातील डळमळीत झालेला विश्वास पुन्हा मिळवून द्यावा.