‘राजबिद’ वाचवा!

0
16

गोवा सरकार एकीकडे पोर्तुगीजपूर्वकालीन वारसा जपण्याच्या बाता करते आहे आणि दुसरीकडे कदंबकालीन इतिहासाच्या खाणाखुणा मात्र दिवसेंदिवस नष्ट होत चालल्या आहेत. गोपकपट्टण बंदराला एला म्हणजेच आजच्या जुन्या गोव्याशी जोडणाऱ्या प्राचीन दगडी ‘राजबिद’ अथवा राजपथाच्या काही भागावर माती ओतून त्याचे सपाटीकरण करण्याचा प्रकार नुकताच उजेडात आला आहे. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि पोर्तुगीजपूर्व वारसा जपण्याबाबत राज्य सरकारला खरोखरच आस्था असेल, तर हा प्रकार कोणी केला ह्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत राज्य सरकारने दाखवणे गरजेचे आहे. गोपकपट्टण हे फार प्राचीन बंदर होते आणि तेथून दूरदूरच्या देशांपर्यंत व्यापार होत असे. ह्या गोपकपट्टणला एला म्हणजे जुने गोवे जोडण्यासाठी त्याकाळी हा राजपथ बांधला गेला. जांभ्या दगडांनी उभारलेला हा सरळसोट राजपथ अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत अस्तित्वात होता. ‘राजबिदी’ किंवा ‘राजबिद’ हे कानडी नाव आहे. ‘बिदी’ म्हणजे रस्ता. त्या कदंबकालीन महान वारशाच्या खाणाखुणा अगदी जुन्या गोव्याच्या आजच्या कदंब पठारावर विपुलतेने उपलब्ध होत्या. तत्कालीन दगडी तट, कमानी, तळघरे ह्या त्या प्राचीन वारशावर सत्ताधारी भ्रष्ट राजकारण्यांनी आणि बिल्डरांनी वरवंटा फिरवला. ह्या प्राचीन वारशाचे अक्षरशः भूखंड पाडून विकले गेले. तेथील प्राचीन इतिहासाच्या खाणाखुणा रातोरात नष्ट केल्या गेल्या. आज कदंब पठार हे केवळ नावापुरते राहिले आहे. तेथे धनिकांचे इमले उभे राहिले आहेत. तेथील राजबिदच्या काही भागाचे तर काही वर्षांपूर्वी बिल्डर लॉबीच्या आग्रहापोटी डांबरीकरण देखील केले गेले होते. काही इतिहासप्रेमींनी तेव्हा त्याविषयी आवाज उठवताच मग ते काम थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा त्या कदंबकालीन इतिहासावर घाला पडला असताना राज्य सरकार स्वस्थ बसून राहणार आहे काय? गोव्याचा इतिहास हा केवळ पोर्तुगिजांपासून सुरू होतो आणि पोर्तुगिजांपर्यंत जाऊन थांबतो असा काहींचा ग्रह दिसतो. परंतु पोर्तुगीज येथे येण्यापूर्वीपासून गोमंतकाला फार मोठा इतिहास आहे. पोर्तुगिजांनी आजच्या गोव्याच्या सीमा निश्चित केल्या असल्या, तरी त्याच्या आधी ह्या प्रदेशातील साम्राज्यांच्या सीमा ह्या सध्याच्या भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणाऱ्या होत्या. एकेकाळी गोवा हा सातवाहन साम्राज्याचा भाग होता. इसवी सनपूर्व दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात मौर्यांचे गोव्यासह संपूर्ण कोकणवर म्हणजेच ‘अपरान्ता’वर राज्य होते. भोजांपासूनचा गोव्याचा इतिहास तर ताम्रपट आणि शिलालेखांत नोंदवला गेलेलाच आहे. भोजांची राजधानी चंद्रपूर होती, परंतु त्यांचे साम्राज्य उत्तर कन्नड जिल्हा, वेणुग्राम म्हणजे आजच्या बेळगावचा काही भाग आणि आजूबाजूच्या प्रदेशांपर्यंत पसरले होते. त्यानंतर कोंकण मौर्य, चालुक्य, शिलाहार आणि कदंब अशा वेगवेगळ्या राजसत्ता गोव्यावर आल्या. बनवासी कदंबांपैकी पहिल्या गुहल्लदेवाने, म्हणजेच गोवा कदंब राजवंशाच्या संस्थापकाने चंद्रपूर ही आपली राजधानी केली, तेव्हा गोपकपट्टणमधून दक्षिण शिलाहारांचे राज्य चाले. मात्र, षष्ठदेव पहिला ह्या कदंब राजाने शिलाहारांवर विजय मिळवून गोपकपट्टण ही आपली राजधानी केली. अकरावे ते तेरावे शतक हा कदंबांचा कालखंड गोव्याच्या भरभराटीचा कालखंड मानला जातो. कदंब राजा पहिला जयकेशी याचीही गोपकपट्टण ही राजधानी तर अनिलापूर म्हणजे आजचे अळणावर ही उपराजधानी होती. इब्न बटुटानेही ह्या गोपकपट्टणचे वर्णन केले आहे. अनेक दशकांपूर्वी गोवा पुरातत्त्व संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ह्या गोपकपट्टण बंदराचे अवशेष शोधून काढले होते. तेथून एलापर्यंत जाणाऱ्या राजमार्गाचे अस्तित्व अगदी अलीकडेपर्यंत होते. एकीकडे राज्य सरकार पोर्तुगिजपूर्व वारशाच्या जतनाची बात करते. त्यासाठी कोट्यवधी रुपये ओतते. दिवाडीच्या कोटितीर्थासारख्या धार्मिक महत्त्व असलेल्या गोष्टींच्या संवर्धनास सरकारचे प्राधान्य दिसते, हातकातरो खांबाला वारसास्थळामध्ये समाविष्ट केले जाते, परंतु ज्याला धार्मिक महत्त्व नाही आणि हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी ज्याचा फायदा नाही अशा गोष्टींकडेे मात्र कानाडोळा चालला आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. एखाद्या परदेशात असा प्राचीन राजमार्ग सापडला असता, प्राचीन अवशेष आढळले असते, तर त्याचे जतन, संवर्धन करून, सुशोभीकरण करून त्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर प्रस्थापित केले असते. आपल्याकडचे करंटे मात्र हा वारसा बिल्डर लॉबीच्या हवाली करतात ह्यासारखे दुर्दैव ते काय! सरकारला पोर्तुगिजपूर्वकालीन वारशाची खरोखरच चाड असेल तर राजबिदीकडे तात्काळ लक्ष देऊन त्याची जपणूक करावी.