>> पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात म्हणतात, पूर येणार नाही याची हमी देणे अशक्य; स्मार्ट सिटीची 90 टक्के कामे पूर्ण
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पणजीतील 90 टक्के कामे पूर्ण झालेली असली, तरी यंदाच्या पावसाळ्यात पणजीत पूर येणार नाही, याची हमी आपण देऊ शकत नसल्याची कबुली काल खुद्द पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. पणजी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काल ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, पणजी स्मार्ट सिटीतील रस्त्यांचे काम निर्धारित वेळेत म्हणजेच आज (दि. 31 मे) पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पणजी स्मार्ट सिटीचे काम पूर्ण झाल्यानंतर पणजी शहरात पूर येणार नाही अशी आशा पणजीवासीय बाळगून असतानाच बाबूश मोन्सेरात यांनी हात वर केल्याने नागरिक चिंतेत सापडले आहेत. जेव्हा पणजी शहरात धो-धो पाऊस कोसळतो, तेव्हा 18 जून रोड आणि लगतचा परिसर पाण्याखाली जात असतो. आता पणजी स्मार्ट सिटीचे 90 टक्के काम पूर्ण झालेले असल्याने आता या पुराचा सामना करावा लागणार नाही अशी आशा 18 जून रोड परिसरातील व्यापारी व तेथे राहणारे लोक बाळगून असतानाच बाबूश मोन्सेरूात यांनी मात्र यंदाही या परिसरात पूर येऊ शकतो, असे अप्रत्यक्षरित्या सांगितल्याने नागरिक व व्यापारी यांची चिंता वाढली
आहे.
यासंबंधी अधिक माहिती देताना बाबूश मोन्सेरात म्हणाले की, आम्ही 18 जून रोड परिसरात स्मार्ट सिटीचे काम केलेले नाही. तेथील काम हे पावसाळ्यानंतर हाती घेण्यात येणार आहे. कुंडईकरनगर ते मांडवी नदी या दरम्यानच्या गटाराचे काम हे हाती घेण्यात आलेले नाही. या कामासाठीची निविदा ही काढण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट सिटीच्या कामांसंबंधी अधिक माहिती देताना मोन्सेरात म्हणाले की, पणजी स्मार्ट सिटीचे सुमारे 90 टक्के एवढे काम पूर्ण झाले आहे. काही मॅनहोल्सचे काम पूर्ण व्हायचे आहे, ते पूर्ण होण्यास आणखी 4-5 दिवस लागतील.
दरम्यान, सांतइनेज येथील ‘शीतल’हॉटेल हे सरकारी जमिनीत बांधण्यात आलेले असून, ते पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बहुतांश रस्त्यांचे काम आज पूर्ण होणार
पणजीतील बहुतांश रस्त्यांचे काम हे शुक्रवार दि. 31 मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आम्ही दिले होते, असे बाबूश मोन्सेरात म्हणाले. गटारांचे व त्यावर लाद्या बसवण्याचे काम पावसाळ्यात करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.