राजकीय शिमग्याचे पडघम् नि परिणाम!

0
133

राज्यात साजरा होणारा पारंपरिक शिगमोत्सवाचा ऐन मुहूर्त साधून जिल्हा पंचायत निवडणुकांची तारीख जाहीर झाली. आता एकीकडे पारंपरिक शिगमोत्सवानिमित्त विविध लोककला प्रकारांचे दर्शन घडविणारे चित्ररथ, मेळ यांच्या मिरवणुका अन् दुसरीकडे राजकीय शिगमोत्सवाची रणधुमाळी मिळून राज्यांतील सारा आसमंत दुमदुमून जाईल.
सरकारने जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घिसाडघाईने घेतला अशी जी टीका होत आहे ती अनाठायी नव्हे. पक्षीय पातळीवर निवडणुका घेण्यासाठी अध्यादेश काढून विरोधी पक्षाचा नि आम जनतेचा आवाज बंद करण्याचा राजकीय डाव सत्ताधारी भाजपाने खेळला आहे. त्यामागे भविष्यातील कुटिल राजकीय रणनीती (की अनीति) तर आहेच, शिवाय पंचायतीपासून विधानसभेपर्यंतची सारी अधिकारसूत्रे आपल्या पक्षाकडे कशी राहतील नि भाजपशाही राज्यांत तळागाळातील जनतेपर्यंत घट्ट होऊन अबाधित कशी राहील यासाठीही ही धूर्त राजकीय चाल आहे. लोकशाही सशक्त, निरोगी व सुदृढ व्हायची असेल तर त्यासाठी विरोधी पक्षालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. राज्यांबाबतचे निर्णय लोकशाही पद्धतीने घेणे आवश्यक आहे. राजकीय लोभापायी गरज नसताना अध्यादेश काढण्याचा मार्ग अनुसरून जर एखादा पक्ष सर्वेसर्वा नि सत्तांध होऊ पाहात असेल तर त्या पक्षाला त्याची किंमत मोजावी लागेल.राज्यातील जिल्हा पंचायत निवडणूक १८ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी २५-२५ मिळून एकूण ५० जिल्हा पंचायत मतदारसंघ रचना करताना जुन्या मतदारसंघाची आपणास हवी तशी मोडतोड करून फेररचना करण्यात आली आहे. ती करताना सत्ताधारी भाजपाकडे अधिकाधिक मतदारसंघात प्राबल्य कसे राहील याची खबरदारी घेऊन राजकीय गणिते केली गेली आहेत. ९ मतदारसंघ इतर मागास जातींसाठी राखीव आणि १७ मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित करून सरकारने आगामी २०१७ मध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी केली आहे. कोणत्याही पक्षाच्या कुबड्या न घेता अमर्याद सत्ता उपभोगण्यासाठी स्वबळावर आपले सार्वभौमत्व सिद्ध व्हावे म्हणून पूर्वतयारी चालविली आहे.
भाजपाला मगो पक्षाशी असलेली युती टिकवून ठेवण्यात आता स्वारस्य राहिलेले नाही. म्हणूनच तर काही आमदारांना पुढे करून मगो पक्षाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी करण्याचा डाव खेळला जात आहे. परंतु मगो पक्षाशी असलेली युती ठेवावी की संपुष्टात आणावी याचा निर्णय ना पक्षाध्यक्षांवर अवलंबून ना तो आमदारांवर! त्यासंबंधीचा निर्णय केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर अवलंबून राहील. मगो-भाजप युती ही ५ वर्षांसाठी होती. त्यामुळे ती २०१७ पर्यंत तशीच राहील असेही भाजपच्या काही पुढार्‍यांकरवी स्पष्ट केले जाते. मगोपची साथ घेऊन विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळविण्याची चाल यशस्वी झाली. आणि आता जिल्हा पंचायत निवडणुकीत युती अबाधित ठेवून अधिकाधिक मतदारसंघ स्वतःकडे खेंचून आणण्यासाठी युती कायम ठेवण्याचा धूर्त डाव भाजप खेळीलच यात शंकाच नाही. यावेळच्या जिल्हा पंचायत निवडणुका या पूर्णतः २०१७ मधील विधानसभा निवडणुकांवर डोळा ठेवून होत आहे हे नक्कीच!
मगोपला आता सावध चाल खेळावी लागेल. सत्ताधारी भाजपाशी असलेली युती कायम ठेवली तर त्याचा मगोपला भविष्यात विशेष फायदा होण्याची शक्यता कमीच आहे. भाजप नेत्यांना पत्र पाठवून जागा वाटपासंबंधीची मागणी करण्याची काहीच गरज नव्हती. त्यापेक्षा उभय पक्षनेत्यांनी समोरासमोर बोलणी करून प्रश्न निकालात काढावे.
मगो पक्षनेत्यांनी आता २०१७ मधील निवडणुकींवर डोळा ठेवून राजकीय रणनीती आखली नाही तर भविष्यात नुकसान होईल याचे भान ठेवावे. कारण हे कटू असले तरी सत्य आहे. आज राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती पाहता सत्ताधारी भाजप व विरोधी कॉंग्रेस पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जनतेला पटू लागले आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षावर टीकेची झोड उठवून मोठे वादळ निर्माण करून कॉंग्रेसला सत्ताभ्रष्ट करण्यात भाजपला गत विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले, ते स्वबळावर नव्हे तर मगो पक्षाशी युती झाली म्हणूनच. हे भाजपच्या नेत्यांना पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणूनच मगो पक्षाला दुर्बळ कसा बनविता येईल याची धूर्त चाल खेळली जात आहे.
मगो पक्षाने यापुढे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घ्यावा. त्याची पूर्वतयारी करून जिल्हा पंचायत निवडणुकीत आपले स्थान काय आहे हे आजमावण्याची संधी आहे ती सोडू नये. राज्याला आता तिसर्‍या पक्षाची किंबहुना तिसर्‍या आघाडीची गरज आहे. अजूनही किमान ७-८ जागा विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची ताकद मगोपक्षामध्ये आहे. शिवाय कॉंग्रेस व भाजपशी फारकत घेऊनही अपक्ष म्हणून जे आमदार झाले आहेत त्यांना आपल्या पक्षांत सामील करून घेण्यासाठी मगो पक्षनेत्यांनी आत्तापासूनच शर्थीचे प्रयत्न केले तर अमर्याद सत्ता भोगण्याची स्वप्ने बघणार्‍यांना थोडातरी काटशह बसेल. एकूण सध्याच्या परिस्थितीत मगो पक्षाची सत्ताधारी भाजपने गोची करून ठेवली आहे. युती टिकवून ठेवली तरी भाजपचा फायदा नि तोडून टाकली तरी भाजपाला सत्तेचे रान मोकळे. कॉंग्रेस पक्षाने पक्षशिस्तीचा बडगा उभारून ज्या आमदारांवर कारवाई केली त्यांना आपल्या पक्षात घेण्याची चाल भाजपा खेळेल. ही राजकीय गणिते मांडूनच तर सारे राजकारण खेळले जात आहे. आमदार बाबूश मोन्सेरात यांनी तर उघड उघड कॉंग्रेसच्या पणजी मतदारसंघाच्या उमेदवाराविरुद्ध प्रचारकार्य केले. तर दुसरीकडे आमदार माविन गुदिन्हो आपल्याविरुद्ध कारवाई करूनच दाखवा असा जाहीर इशारा कॉंग्रेसच्या राज्यप्रमुखांना देत आहे. यावरून विरोधी कॉंग्रेस पक्ष नेते हतबल झाले आहेत, ही वस्तुस्थिती जाणून घेण्याची गरज आहे. विरोधी कॉंग्रेस पक्षनेत्यांनी पक्षीय पातळीवर जिल्हा पंचायत निवडणुका घेण्याला शेवटपर्यंत विरोध केला. जनमताचा आवाज दाबून टाकण्यासाठी सरकारने अध्यादेश काढण्याचा मार्ग अनुसरून सरकारला एखादी गोष्ट करायची असेल तर ती करू शकते हे त्यावरून सिद्ध होते. आणखी वातावरण गढूळ बनू नये या इराद्याने राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना जिल्हा पंचायतीची निवडणूक जाहीर करण्याचे धाडस भाजपा सरकारने केले आहे. त्यामागे राजकीय धूर्तपणा असणारच. विरोधी पक्षांना पक्ष संघटना व प्रचारकार्य करण्यास अत्यावश्यक व पुरेसा वेळ मिळाला तर त्याचा आपणाला फटका बसू शकतो, असे मानून ही कृती केली गेली आहे.
जिल्हा पंचायत मतदारसंघाची फेररचना करताना वजनदार राजकीय नेत्यांना शह-काटशह देत यांचे पत्ते छाटून टाकण्याची धूर्त चालही खेळली गेली आहे. सत्ताधारी भाजपाने आपली पूर्वतयारी जोरात चालविली आहे. अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र सामसूमच आहे. कारण एवढ्या लवकर जिल्हा पंचायत निवडणुकांना सामोरे जाण्याची पाळी येईल असे त्यांना वाटले नव्हते. या एकूण पार्श्‍वभूमीवर एक प्रादेशिक पक्ष म्हणून मगो पक्षाला चांगले राजकीय भविष्य घडविण्याची संधी आहे. सावध चाल खेळत पक्षनेते कितपत यश मिळवितात ते कालांतराने दिसून येईलच! लोकशाहीच्या गप्पा मारणार्‍या सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या एकाधिकारशाही निर्णयाला होणारा विरोध मूळासकट संपुष्टात आणण्यासाठी अध्यादेश काढून मनमानेलशाही प्रचलीत करण्याचा पायंडा घातला जात आहे. ही बाब लोकशाहीला घातक आहे, याची जाणीव ठेवून बुद्धिवादी, लोकशाहीप्रेमी आम जनतेने तसेच ग्रामीण भागांतील लोकांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत मतपेटीद्वारा कुटिल राजकारण खेळणार्‍यांना अद्दल घडवावी! सत्ताधारी भाजपाशी युतीची सोयरीक करणार्‍यांनी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह इतरांनी हे आव्हान स्वीकारून सत्तेचा माज चढलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी.