वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस; स्मार्ट मीटर काळाची गरज; अफवांना बळी न पडण्याचे ग्राहकांना आवाहन
राज्यात स्मार्ट मीटर बसवणे ही काळाची गरज आहे. वीज खात्यातर्फे बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांना त्यांचा वीज वापर आणि व्होल्टेज पातळी यासारखी महत्त्वाची माहिती अचूकपणे मिळणार आहे. तसेच वीज विभागाला अचूक डेटा मिळविण्यात मदत होईल. तथापि, काही लोकांकडून केवळ राजकीय फायद्यासाठी स्मार्ट मीटर प्रकल्पाला विरोध केला जात आहे. वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरसंबंधीच्या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी केले. संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) काल येथील आयएमबी सभागृहात आयोजित केलेल्या सार्वजनिक सुनावणीमध्ये ते बोलत होते.
181 कोटींची महसुली तूट
वीज खात्याला आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 181 कोटी रुपयांची महसुली तूट झाली आहे. राज्य सरकार ही तूट भरून काढणार असून, ग्राहकांवर कोणताही बोजा टाकण्यात येणार नाही. राज्यातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे मंजूर अंदाजापेक्षा भांडवली खर्चात वाढ झाली आहे, असेही स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.
वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरविषयीच्या अफवांना बळी पडू नये. राज्यात काही लोक केवळ राजकीय फायद्यासाठी स्मार्ट मीटरला विरोध करत आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज दर वाढतील, वापर वाढेल किंवा चुकीचे मीटर रीडिंग येईल या दाव्यांत कोणतेही तथ्य नाही. हे दावे दिशाभूल करणारे आहेत. कारण स्मार्ट मीटर प्रत्यक्षात वापरकर्त्यांना त्यांच्या वीज वापराचे चांगले निरीक्षण आणि नियंत्रण करण्यास मदत करतील, असेही स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.
वीज खात्याने स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला सुरुवात केली असून, सुमारे सात लाख स्मार्ट मीटरची खरेदी केली आहे. राज्यात ऑगस्ट 2027 पर्यत स्मार्ट मीटर बसविण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. सध्या 1020 फीडर आणि 5800 सरकारी इमारतींमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने स्मार्ट मीटर बसविले जाणार आहे, असेही स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.
राज्यात वीजविषयक साधनसुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले असून, भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. भूमिगत वीजवाहिन्यांमधील दोष त्वरित शोधण्यास मदत होणार आहे. भूमिगत वीजवाहिन्यांमुळे वीज वितरणात भरपूर सुधारणा होणार आहे. पूर्वीचा बंच केबल हा प्रकल्प अपयशी ठरला आहे. बंच केबलमध्ये दोष शोधन काढण्यात वेळ खर्ची होत होता, असेही स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले.
ग्राहकांनी विचारले प्रश्न
या जनसुनावणीमध्ये वीज ग्राहक आणि ग्राहक संघटनांनी वीज बिलामधील वाढ, चुकीचे बिलिंग, विलंबाने होणाऱ्या दुरुस्त्या आणि सेवा गुणवत्तेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले. वीज दर निश्चित करताना ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, घरातील वीज मीटर घराबाहेर बसविण्याबाबत जाहिरातीद्वारे जागृती करण्यात आली होती. त्याच पद्धतीने स्मार्ट मीटरबाबत जागृती करणे आवश्यक आहे, असे रोलंड मार्टिन्स यांनी सांगितले.