राकेश झुनझुनवाला यांचे मुंबईत निधन

0
31

भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजारातील ‘बिग बुल’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे काल निधन झाले. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांना मुंबईतील ब्रीच कँन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गजांनी राकेश झुनझुनवाला यांना श्रद्धांजली वाहिली.

राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासूनच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. १९८५ साली भारतीय शेअर बाजारामध्ये त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करत आपली कारकीर्द सुरू केली होती. राकेश झुनझुनवाला यांनी सुरुवातीला १०० डॉलर्सची गुंतवणूक केली होती. त्यावेळी सेन्सेक्स निर्देशांक १५० अंकांवर होता, जो आता ६० हजारांवर पोहचला आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी नुकतीच ‘अकासा’ ही एअरलाईन सुरू केली होती. ‘फोर्ब्स’च्या यादीनुसार सध्या राकेश झुनझुनवाला यांची संपत्ती ५.५ बिलियन डॉलर्स एवढी आहे. शेअर बाजार हा मोजक्या अतिश्रीमंतांसाठी नसून समाजातील सर्व स्तरांतील लोक भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले.