रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांची गोव्यात घरासाठी वणवण

0
71

सपत्नीक गोव्यात परतलेल्या गुरुनाथ नाईक यांची काल भेट घेतली असता ते म्हणाले की, मला गोव्यात परतायचे होते. पण येथे माझे घर नसल्याने व घर खरेदी करण्याएवढे पैसे माझ्याकडे नसल्याने येथे आल्यास रहायचे कुठे हा प्रश्‍न होता. त्यामुळे ३ महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पर्वरी येथे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन भेट घेतली होती. या भेटीत सरकारी घर उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती.

पर्रीकर यांच्याबद्दल बरेच ऐकले होते आणि ते खरे असल्याचा प्रत्यय त्यांना भेटल्यानंतर आला. खूप चांगली वागणूक त्यांनी या भेटीच्या वेळी दिली. घर देण्याचे आश्‍वासनही दिले आणि शेवटी विनाविलंब घरही उपलब्ध करून दिले. गोवा सोडल्यानंतरच्या आपल्या ३० वर्षांच्या प्रवासाविषयी बोलताना गुरुनाथ नाईक म्हणाले की, १९८२ साली मी गोवा सोडला. गोव्यातून गेलो तो वसईला. ८५ सालापर्यंत वसईला राहून लेखन केले. नंतर ८५ साली लोकसत्ता दैनिकासाठी कायदा प्रतिनिधी म्हणून काम केले. नंतर ८७ साली औरंगाबादला गेलो. तेथे ८७ ते ८९ सालापर्यंत ‘अजिंठा’ या दैनिकात काम केले. ९० साली विलासराव देशमुख यांना लातूर येथे ‘एकमत’ दैनिक सुरू करायचे होते. त्यानी मला ऑफर दिली. मी या दैनिकाचा संपादक बनलो. पण पगार मिळायचा केवळ ४ हजार रुपये. नंतर वर्ष संपता संपता बीडला गेलो. तेथे ‘लोकआशा’ या दैनिकाचा संपादक बनलो. तेथे १३ हजार रु. पगार मिळायचा. तेथे कित्येक वर्ष संपादक म्हणून काम केले. मात्र, काही वर्षांपूर्वी मानेच्या रक्तवाहिनीत दोष निर्माण झाल्याने आजारी पडलो आणि नोकरी सोडावी लागली. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गोव्यात येऊन स्थायिक होण्याचा विचार करीत होतो, पण योग काही जुळून येत नव्हता. शेवटी एका मित्राने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना भेटण्याची विनंती केली आणि ३ महिन्यांपूर्वी येऊन त्यांना भेटलो आणि गोव्यात येऊन स्थायिक होण्याची वाट मोकळी झाली.

यंदा वयाची ७४ वर्षे पूर्ण केलेल्या गुरुनाथ नाईक यांना आता गोव्यात काय करणार असे विचारले असता स्मितहास्य देत ते म्हणाले की आता येथील वर्तमानपत्रांसाठी लेखन करणार आहे. पुन्हा रहस्यकथा लिहिण्याचा विचार आहे काय व तुमच्या रहस्यकथा आजच्या तरुण पिढीला आवडतील काय, असे विचारले असता नाईक व त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, २००४ साली २०० रहस्य कथांचे पुनर्मुद्रण करण्यात आले. एक-एक रहस्यकथा पुस्तकाच्या ११०० प्रती काढण्यात आल्या होत्या. आणि त्या सार्‍या संपल्या. अजब पुस्तकालय या प्रकाशन संस्थेने ही पुस्तके पुनर्मुद्रित केली होती. मला एका-एका रहस्यकथेमागे केवळ ५०० रु. मानधन देण्यात आले. प्रकाशकाने मात्र चिक्कार पैसे कमावले. ७५० रहस्यकथांसह १२०८ पुस्तके लिहिलेल्या गुरुनाथ नाईक यांच्याएवढी साहित्यिक पुस्तके कुठल्याही भारतीय साहित्यिकाने लिहिलेली नसून त्यामुळे लिम्का बुक ऑफ रेकॉडर्‌‌समध्ये सर्वाधिक साहित्यिक पुस्तके असलेला साहित्यिक असा त्यांचा उल्लेख आहे. ‘शास्त्रज्ञाच्या मृत्यूचं गूढ’ ही त्यांनी लिहिलेली पहिली रहस्यकथा. गुरुनाथ नाईक यांनी शेवटचे पुस्तक लिहिले ते २००९ साली. ‘उषा अनिरुद्ध’ असे या कादंबरीचे नाव असून ती भगवान श्रीकृष्ण यांच्या नातवावर असल्याचे नाईक म्हणाले. सध्या आपणाला ‘झाशीची राणी’ व ‘चाणक्य’ यांच्यावर कादंबरी लिहिण्याचा प्रस्ताव प्रकाशकाकडून असल्याचे ते म्हणाले. मात्र, आता प्रकृती तेवढीशी साथ देत नसल्याने कितपत लेखन होईल ते पहावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. नुकत्याच गोव्यात दाखल झालेल्या गुरुनाथ नाईक यांनी आपल्या पत्नीसह काल उसगाव-धारबांदोडा येथे अखिल गोमंतक मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाला हजेरी लावली.