राज्यातील रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचे काम 15 ऑक्टोबरनंतर हाती घेण्यात येणार असल्याची माहिती काल सार्वजनीक बांधकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत यांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.
सध्या पावसाळा असल्याने डांबरीकरणाचे काम हाती घेणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. मात्र, तसे असले तरी खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने यापूर्वीच हाती घेतले असल्याची माहिती मंत्री श्री. कामत यांनी दिली.
गणेश चतुर्थीचा सण जवळ आलेला असल्याने राज्यातील खड्डे पडलेल्या रस्त्यांचे दुरूस्तीकाम हाती घेतले असल्याचे मंत्री श्री. कामत यांनी स्पष्ट केले. लोकांना त्यांच्या गावातील खड्डे पडून खराब झालेल्या रस्त्यांविषयीची माहितीही सार्वजनिक बांधकाम खात्याला देता यावी यासाठी एक विशेष ॲप तयार करण्यात आले असल्याचे कामत यांनी सांगितले.
या ॲपवरून लोकांना आपल्या गावातील तसेच अन्य ठिकाणी खड्डे पडलेल्या तसेच डांबर उखडल्याने खराब झालेल्या रस्त्यांची माहिती देण्याबरोबरच स्पीड ब्रेकर्स तसेच खराब झालेले अथवा वाचता न येणारे फलक, तसेच पाणी अथवा सांडपाण्याविषयीच्या समस्या यासंबंधीची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याला देता येणार आहे. खराब झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती केली जात आहे. मात्र, हॉटमिक्स डांबरीकरण 15 ऑक्टोबरनंतर सुरू होणार असल्याने लोकांनी थोडी कळ सोसावी, असे मंत्री श्री. कामत यांनी म्हटले आहे.

