रशियावर युक्रेनचा आतापर्यंतचा मोठा हल्ला

0
11

युक्रेनच्या द्रोन हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू

युक्रेनने काल रविवारी रशियावर युद्ध सुरू झाल्यापासूनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यात किमान 6 लोकांचा मृत्यू झाला. या ड्रोन हल्ल्यांमध्ये मॉस्कोजवळच्या रशियन ई-कॉमर्स कंपनी वाइल्डबेरिजच्या वितरण केंद्राला आग लागली. हे गोदाम सुमारे 2 लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. या इमारतीचा मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी दिसला. आकाशात दूरवर काळा धूर वर जाताना दिसला.
युक्रेनने रविवारी रशियाच्या अनेक भागांवर शेकडो ड्रोनच्या माध्यमातून मोठा हवाई हल्ला केल्याचा दावा रशियन अधिकाऱ्यांनी केला. युद्ध सुरू झाल्यापासूनचा हा युक्रेनचा सर्वात मोठ्या हवाई हल्ल्यांपैकी एक आहे. या हल्ल्यानंतर रशियातील अनेक भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली असून यामुळे रशिया-युक्रेन युद्धातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गेल्या 24 तासांत 9 युक्रेनियन क्रूझ क्षेपणास्त्रे आणि एकूण 1,478 ड्रोन पाडले असल्याचा दावा केला. सुमारे 600 ड्रोन राजधानीच्या दिशेने डागण्यात आले असून हा गेल्या दोन वर्षांतील मॉस्कोवरील सर्वात मोठा हवाई हल्ला म्हटले आहे.
याच दरम्यान, रशियाने रविवारी युक्रेनवरही ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान 7 लोकांचा मृत्यू झाला. राजधानी कीववरही बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. यात 6 लोक जखमी झाले आणि राजधानीत अनेक ठिकाणी आग लागली. कीवच्या ओबोलोंस्की जिल्ह्यात पेट्रोव्का बुक मार्केटचा मोठा भाग जळून खाक झाला. द गार्डियनच्या अहवालानुसार, आगीत त्यांच्या पुस्तकांचा संपूर्ण साठा नष्ट झाला. युक्रेनच्या हल्ल्यांमध्ये सुमारे 20 गोदामांना आणि इतर इमारतींना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे.
युक्रेन रशियाच्या गोदामांवर, तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर, बंदरांवर आणि लष्करी तळांवर हल्ले करत आहे. यामुळे युद्धात पहिल्यांदाच रशियाच्या लांब पल्ल्याच्या हल्ला करण्याच्या क्षमतेला मोठे आव्हान मिळत आहे.