Home बातम्या रवींद्रनाथप्रणीत शिक्षणप्रणाली

रवींद्रनाथप्रणीत शिक्षणप्रणाली

0

डॉ. सोमनाथ कोमरपंत

विश्‍वविख्यात कवी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म कोलकातामध्ये ७ मे १८६१ रोजी जोडाशांको वाड्यात झाला. टागोरांचे घराणे जसे गर्भश्रीमंत तसेच कलाभिरुचिसंपन्न. रवींद्रनाथ टागोरांचे वडील देवेंद्रनाथ टागोर हे ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. ब्राह्मोसमाजाच्या अध्वर्यूंपैकी ते एक. जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रज्ञावंतांचे आणि प्रतिभावंतांचे त्यांच्याकडे येणेजाणे असायचे. काव्यशास्त्रविनोदाची निरंतर मैफल तेथे भरत असे. जोडाशांको वाडा हे विद्या, कला, संगीत यांचे मुक्तपीठ होते.

अजाणत्या वयात रविबाबूंवर झालेले संस्कार आणि संवेदनक्षम वयापासून त्यांनी केलेली जीवनसाधना पुढे कलासाधनेत परिणत झाली. प्रगल्भ चिंतन करणारे प्रज्ञावंत आणि असामान्य प्रतिभा लाभलेले प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र पसरली. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध डोळसपणे अनुभवलेले रवींद्रनाथ मनस्वी होते. परकीयांच्या राजवटीत आपल्या राष्ट्राची होणारी आत्मिक होरपळ ते पाहत होते. अवतीभवतीची राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मंथनप्रक्रिया ते जवळून पाहत होते. या मानसप्रतिक्रियेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत होते. रवींद्रनाथांचे समृद्ध व्यक्तिमत्त्व हे भारतीय प्रबोधनपर्वाचे अपत्य आहे असे मानायला कुठल्याही प्रकारचा संदेह बाळगण्याचे कारण नाही. रवींद्रनाथ प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामात उतरले नाहीत; पण त्यांचा राष्ट्रवादी मनःपिंड वेगळ्या प्रकारच्या मुशीतून घडलेला होता. या स्वप्नद्रष्ट्या कवीने आधुनिक भारताच्या नवनिर्मितीचे अभिनव स्वप्न रेखाटले होते. पण ते केवळ स्वप्न नव्हते; सर्जनशील आत्म्याच्या चैतन्यशील स्पंदनाची मिती त्याला लाभलेली होती. कृतिशीलतेची जोड होती. नवराष्ट्रनिर्मितीच्या ध्यासातून शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्‍वभारती विश्‍वविद्यालय या त्रिविध माध्यमांतून विधायक कार्याचा दृढ पाया रवींद्रनाथांनी घातला. या त्रिमितियुक्त दर्शनातून रवींद्रनाथांचा आत्मा प्रकट झाला.

७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वाईट वाटते ते या गोष्टीचे. भयशून्य चित्त, उन्नत माथा आणि प्रज्ञाप्रतिभेचे संगमतीर्थ असलेला भारत त्यांनी आराधनाया कवितेतून रेखाटला होता. त्या प्रिय देशाचे स्वातंत्र्य याचि देहीं याचि डोळांत्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले नाही. रवींद्रनाथ जन्मास येऊन १५० वर्षे लोटली. पण त्यांच्या अम्लान वाग्विलासाने आणि दुर्दम्य कर्तृत्वशक्तीने भावमंत्रित झालेले भारतीय मन त्याच तन्मयतेने आणि ममत्वाने रवींद्रप्रतिमेकडे आणि रवींद्रप्रतिभेकडे पाहत आहे. कविप्रतिभेला जरामरणाचे भय नाही असे म्हणतात ते यासाठी. महात्मा गांधींनी त्यांना गुरुदेवसंबोधले. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांना ऋतुराजम्हणत. या मर्मदृष्टीने उच्चारलेल्या गौरवात्मक नामाभिधानांतून रवींद्रनाथांच्या प्रतिमेच्या विभ्रमांचे इंद्रधनुष्य नेमकेपणाने टिपले गेले आहे असे वाटते. सुट्यासुट्या विशेषणांनी रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू परिपूर्णतेने आकळता येत नाहीत. ‘जे जे मानवी आहे; ते ते मला मननीय वाटतेअसे म्हणणार्‍या रवींद्रनाथांनी यत्र विश्‍वं भवती एक नीडम्हे विश्‍वभारतीचे बोधवाक्य केले. ‘साकल्याच्या प्रदेशाचे कल्याण कसे होईल याचा निदिध्यास रवींद्रनाथांनी सतत बाळगला. या राष्ट्राची विवेकशक्ती अक्षय स्वरूपात टिकावी आणि येथील मने गुलामगिरीच्या नादी लागू नयेत म्हणून त्यांची सारी धडपड होती. कविता, नाटक, कादंबरी, कथा, संगीत आणि चित्रकला या माध्यमांतून त्यांनी आत्म्याचे प्रकटीकरण उत्कटतेने केले.

आज गोमंतभूमीत प्राथमिक शिक्षणाचे माध्यम कोणते असावे हा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे. अशा वेळी स्मरण होते ते रवींद्रनाथांच्या शिक्षणविषयक विचारांचे. शतकापूर्वी मांडलेल्या या विचारांची महत्ता आजही पटते. आजच्या संदर्भात ती अधोरेखित करावीशी वाटते.

वास्तविक पाहता बालकांचे शिक्षण मातृभाषेतून व्हायला हवे. ते विश्‍वात्मक सत्य आहे. मातृभाषेमुळे मुलांच्या चरित्राची आणि चारित्र्याची जडणघडण होते. तिच्यामुळे आत्म्याचा विकास होतो. जन्मजात ऊर्जेला नवचैतन्य प्राप्त होते. मुलांच्या सर्जनात्मक ऊर्मी विकासक्षम होतात. व्यक्ती आणि समाज यांमधील अतूट अनुबंध उलगडले जातात. मातेच्या दुग्धपानाने बालकाचे पोषण होते; तसेच मातृभाषेमुळे मुलांचे हित होते. मनाची माती कोवळी असताना संस्कारांचे बीजारोपण सहजतेने होऊ शकते. संज्ञा आणि संकल्पना यांचे आकलन मातृभाषेतून जितक्या सहजतेने होते तितके ते परकीय भाषेतून होऊ शकत नाही. ‘लहान मुलांना संस्कृती म्हणजे काय हे कसे काय कळेल?’ अशी विधाने केली जातात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. नवनिर्माणाचा पाया बालवयापासून घालायचा असतो. या निर्मितिबीजाचा संस्कृतिरूपी महावृक्ष होतो हे काय सांगायला हवे? लोककल्याणकारी शासनाचे प्रथम कर्तव्य असते ते बालकांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे. याला दुसरा पर्याय असूच शकत नाही.

रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक चिंतन तत्कालीन परिस्थितीला अनुलक्षून होते. पण आजच्या परिस्थितीला ते लागू पडणारे आहे. यावरून त्यांच्या विचारांचे शाश्‍वत मूल्य कळून येते. रवींद्रनाथांच्या विचारांचे स्मरण आणि त्यांचे पालन हे खर्‍या अर्थाने रवींद्रनाथांचे स्मरण. आजवर आम्ही भारतीयांनी त्यांच्या प्रज्ञाप्रकाशात वाटचाल केलेली आहे. निसर्गाशी एकतान होऊन ती वृत्ती आत्मसात करणे हे खरे शिक्षण, हे भावसत्य रवींद्रनाथांना अभिप्रेत होते. पु. . देशपांडे रवींद्रनाथांच्या शिक्षणप्रणालीच्या संदर्भात म्हणतात ः ‘‘ज्ञान, विज्ञान, कला, चिंतनशीलता आणि प्रत्यक्ष कार्यप्रवणता हे सारे मानवजातीच्या देहाचे अवयव आहेत, आणि त्यातला कुठलाही अवयव गौण नाही हे तत्त्व रवींद्रनाथांच्या जीवनात फार खोल रुजले होते.’’

जीवनविकासप्रणालीची मर्मदृष्टी पु.लं.नी येथे अधोरेखित केली आहे. शिक्षण घेणे ही स्वाभाविक प्रक्रिया. ती आनंदमय अनुभूती. सक्तीने पठण करायला लावणारे शिक्षण हे शिक्षण नव्हे हे आपल्याला कळायला हवे.

रवींद्रनाथांनी मूलभूत प्रश्‍न उपस्थित केलेला आहे ः जीवनाचा एकतृतीयांश भाग ज्या या शिक्षणाच्या पायी आम्ही खर्च केला, ते शिक्षण जर असे आमच्या जीवनाशी सारा जन्म फटकून वागणारे ठरले, आणि त्याबरोबरच दुसर्‍या प्रकारच्या शिक्षणाची प्राप्ती करून घेण्याचा आम्हाला अवसरही शिल्लक राहिला नाही तर मग आमच्या जीवनाला यथार्थता यावी तरी कशाच्या बळावर?’

मुलांच्या पालकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असे हे उद्गार आहेत. मानसिक शक्तीचा र्‍हास करणार्‍या आनंदहीन शिक्षणाच्या तावडीतून बंगाली माणसाची सुटका कशी करावी यासंबंधी रवींद्रनाथांच्या मनात प्रश्‍न उभा राहिलेला आहे– ‘एक तर इंग्रजी भाषा आमच्या बाबतीत अतिशयच विजातीय भाषा आहे. शब्दरचनेच्या आणि पदरचनेच्या बाबतीत त्या भाषेचा आमच्या भाषेशी कोणताही मेळ नाही. त्याशिवाय त्या भाषेतील भावविन्यास आणि विषयप्रसंगही विदेशीच असतात.’

त्यामुळे होणार्‍या दुष्परिणामांविषयी ते पुढे म्हणतात ः विचार आणि कल्पना या दोन शक्ती मनुष्याला जगण्यासाठी अत्यावश्यक आहेत यात संशय नाही. म्हणजे, आपल्याला जर खरे खरे माणसासारखे व्हायचे असेल तर जीवनातून या दोन गोष्टींना वगळून काही चालण्यासारखे नाही. लहानपणापासून या विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीला वाढीला लावण्याची व्यवस्था जर झाली नाही तर पुढे प्रसंग आला म्हणजे त्या गोष्टी काही आपल्या हाताशी सापडणार नाहीत, हे तत्त्व फार पुरातन आहे.’

शिक्षण ही माणूस होण्याची निरंतर प्रक्रिया आहे हे पटवून देताना रवींद्रनाथ म्हणतात, ‘मुलाने पुढे मोठे होऊन मनुष्य बनावे असे जर आपल्याला वाटत असेल तर त्याला मनुष्य बनविण्याच्या क्रियेला आपण लहानवयापासूनच आरंभ करायला पाहिजे; तसे जर झाले नाही तर तो जन्मभर मूलच राहील. मुलाचा मनुष्य काही व्हायचा नाही. लहानपणापासून केवळ मुलाच्या स्मरणशक्तीवरच सारा भर न देता, त्याबरोबरच मुलाच्या विचारशक्तीला आणि कल्पनाशक्तीलाही स्वतंत्रपणे परिचालना मिळत राहील असा अवसर त्याला मिळाला पाहिजे.’

इंग्रजी भाषेतून शिक्षण घेताना निर्माण होणार्‍या मर्यादांविषयी रवींद्रनाथ म्हणतात ः इंग्रजी भाषेच्या भावसाम्राज्यात ज्यावेळी पुढे आम्ही प्रवेश करणे सुरू करतो त्यावेळी मग त्या ठिकाणी आम्ही काही खर्‍या अंतरंगाने विहार करू शकत नाही. त्या भावना एकप्रकारे आम्हाला कळत जरी असल्या, तरी त्यांना आम्ही आमच्या मर्मात काही ओढून घेऊ शकत नाही.’

स्वभाषा ही परिसराचे सांस्कृतिक संचित, जीवनादर्श आणि जीवनशैली यांच्याशी निगडित असते. परभाषेतील संज्ञासंकल्पना निराळ्या असतात. परभाषेतून शिक्षण घेण्याच्या मानसिकतेतून ज्या वास्तवाला तोंड द्यावे लागते त्याविषयी रवींद्रनाथ भाष्य करतात ः ज्या घरात आम्हाला मरेपर्यंत राहायचे आहे, त्या घराचे उन्नत चित्र आमच्या पाठ्यपुस्तकात आम्हाला पाहायला मिळत नाही. ज्या समाजातच आम्हाला आमचा जन्म काढावा लागणार आहे, त्या समाजाचा कोणताही उच्च आदर्श आम्ही प्राप्त करून घेतलेल्या कोणत्याही साहित्यात आम्हाला आढळून येत नाही. आमचे मातापिता, सुहृदबांधव, भाऊबहिणीचे दर्शन ज्यात आम्हाला घडत नाहीआमचे आकाश आणि आमची धरणी, आमची निर्मल प्रभात आणि सुंदर संध्या, आमची डवरलेली शेते आणि आमच्या देशाची लक्ष्मीस्रोतस्विनी यांचे कोणतेही संगीत ज्यामध्ये ध्वनित होत नाही, असे हे शिक्षण आहे.’

इंग्रजी ही आमच्या दैनंदिन कामकाजापुरती वापरायची भाषा आहे. ती आमच्या आत्माभिव्यक्तीची भाषा होऊ शकणार नाही याकडे रवींद्रनाथांनी अंगुलिनिर्देश केलेला आहे. ऐहिक सुखाच्या प्रलोभनांकडे लक्ष देऊन स्वभाषेकडे दुर्लक्ष करण्याच्या मनोवृत्तीतून काय निर्माण होते? रवींद्रनाथ म्हणतात, ‘एकीकडे स्वातंत्र्याच्या उज्ज्वल आदर्शांचा तोंडाने प्रचार करणारा माणूसच दुसरीकडे आधीनतेच्या शेकडो हजारो तंतुपाशांनी स्वतःला आणि आपल्याबरोबरच दुसर्‍यांनाही पावलोपावली बांधून घेऊन दुर्बल बनवीत असलेला आपल्याला दिसतो.’

सारांशरूपाने सांगायचे झाल्यास, स्वभाषेचा अभिमान न बाळगल्यामुळे आपण आत्मप्रतिष्ठा आणि स्वाभिमान गमावून बसलो आहोत असे रवींद्रनाथांना सांगायचे आहे. अनेक परकीय राजसत्ता येथे दृढमूल झाल्या. त्यांनी आपल्या भाषा येथील जनतेवर लादल्या. कारण त्यांना कारकून हवे होते. आज स्वातंत्र्य आणि लोकशाही जीवनपद्धती नांदत असलेल्या आपल्या राष्ट्रामध्ये, राज्याराज्यांतून आम्हाला हवे आहे माणूस बनविणारे शिक्षण. ती क्षमता मातृभाषेतच असते. रवींद्रनाथ आपल्या अमोघ वाणीत सांगतात, ‘…जीवनाची योग्य परिणती व्हावी म्हणून आणि त्यात सरसता यावी म्हणून सजीव भावना आणि नवनवीन कल्पनांचा पुरवठा व्हायला पाहिजे. नेमक्या त्या वयात जर साहित्याच्या आकाशातून चांगला मनमुराद पाऊस पडला तर धन्य राजा, पुण्य देशअशी परिस्थिती उत्पन्न होते. नवीनच उगवू लागलेले भावनेचे अंकुर ज्यावेळी अंधःकारपूर्ण भूमातेच्या उदरातून बाहेर पडून विस्तीर्ण पृथ्वीवर आणि अनंत निळ्या आकाशाकडे मान वर करून पाहायला लागलेले असतात, प्रच्छन्न अशा आपल्या जन्मकाळच्या अंतःपुराच्या दारात उभे राहून ते बाहेरच्या संसाराशी पहिली ओळख करून घेत असतात.’

रवींद्रनाथांसारखा तत्त्वचिंतक कवी केवळ स्वप्नभूमीत वावरणारा नव्हता. प्रज्ञावंताचे द्रष्टेपण त्यांच्याकडे होते. म्हणूनच निःसंदिग्ध शब्दांतून त्यांनी आपल्या देशातील मानसिक गुलामगिरीसंबंधी मर्मस्पर्शी भाष्य केले. रवींद्रनाथांच्या प्रसन्नता, सौंदर्य आणि आनंद निर्माण करणार्‍या शिक्षणप्रणालीसंबंधी खूप काही सांगण्यासारखे आहे, पण शिक्षण देणारे प्रभावी माध्यम मातृभाषाच असू शकतेया अंतःसूत्रासंबंधी सारांशरूपाने येथे विवेचन केलेले आहे.

आम्हा भारतीयांच्या आनंदपथावर एकला चलो रेअसे सूक्त गात मनःपूत आनंदाचे पाथेय पुरविणारा रवींद्रनाथ टागोरांसारखा थोर तपस्वी लाभला याहून कोणते भाग्य असू शकेल?

संदर्भ ग्रंथ ः १) निबंधमालाभाग १रवींद्रनाथ टागोर.

अनुवादशं. बा. शास्त्री, साहित्य अकादमी, दिल्ली

) रवींद्रनाथ ः तीन व्याख्यानेपु. . देशपांडे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे