रविवारच्या मतदानासाठी मार्गदर्शक सूचना जारी

0
121

>> निवडणूक आयोगाकडून स्वच्छतेचे आवाहन

कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) पार्श्‍वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने येत्या २२ मार्च २०२० रोजी होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणूक मतदान आणि मतमोजणीच्या वेळी घ्यायच्या खबरदारीबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी स्वच्छतेच्या आवश्यक उपाय योजना आखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे सचिवांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतील सर्व निर्वाचन अधिकार्‍यांनी वितरण केंद्र, स्वीकृती केंद्र, मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रांवर घ्यावयाच्या आवश्यक सोयी सुविधेची माहिती जारी केली आहे. मतदान केंद्रे सॅनटाईज करण्याची सूचना करण्यात आली आहे. सुरक्षा उपाययोजनांसाठी आरोग्य विभागाची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर हात धुण्यासाठी आवश्यक व्यवस्था, मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांनी वरच्यावर हात धुण्याची सूचना करण्यात आली आहे.

बारा मतदान केंद्रे संवेदनशील
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी दोन्ही जिल्ह्यांत मिळून १२ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. उत्तर गोव्यातील ताळगाव मतदारसंघात २ आणि चिंबल मतदारसंघात ४ संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. तर, दक्षिण गोव्यात कुर्टी येथे १, दवर्ली ३ आणि नावेली येथे २ मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात एकूण १२१० मतदान केंद्रे आहेत. त्यात उत्तर गोव्यात ६४१ आणि दक्षिण गोव्यात ५६९ मतदान केंद्रांचा समावेश आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी एकूण ८ लाख ७ हजार २९२ मतदार आहेत. त्यात पुरुष ३ लाख ९२ हजार ५०१ आणि महिला ४ लाख १४ हजार ७९१ मतदारांचा समावेश आहे. उत्तर गोव्यात ४ लाख १८ हजार ९२१ मतदार आणि दक्षिण गोव्यात ३ लाख ८८ हजार ३७१ मतदार आहेत.

जिल्हा पंचायत मतदारसंघातील मद्यालये २१ ते २३ मार्च २०२० पर्यत बंद ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. बार ऍण्ड रेस्टॉरंटचा परवाना असलेले मालक खाद्यपदार्थ विक्रीसाठी रेस्टॉरंट उघडे ठेवू शकतात. मद्य विक्रीचा विभाग बंद ठेवावा लागेल. रेस्टॉरंट सुरू ठेवणार्‍यांनी मद्य विक्री बंदीबाबत सूचना फलक लावण्याची सूचना करण्यात आली आहे.