‘रजोनिवृत्ती’ तिच्या नजरेतून…

0
9
  • डॉ. मनाली महेश पवार

कधीकधी मासिक पाळी बऱ्याच दिवसांनंतर येते आणि खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत राहतो. अशावेळी ‘या वयात असे होतेच’ अशा गैरसमजुतीत राहू नका. तसेच एकदा वर्षभर पाळी बंद झाली आणि मग पुन्हा रक्तस्राव झाला तर ती धोक्याची घंटा समजावी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्त्रियांची पाळी बंद झाली म्हणजे काही स्त्रियांना आनंद वाटतो- ‘गेली एकदाची बया! दर महिन्याची चिडचिड, कटकट, नॅप्किन्सचा त्रास… सगळी झंजट संपली एकदाची!’ म्हणून त्यांना हायसे वाटते. तिथेच दुसऱ्या प्रकारच्या स्त्रियांमध्ये उदासीनता येते. पाळी बंद म्हणजे त्यांना स्त्रीत्व गेल्यासारखे वाटते. जणू काही त्यांच्या आयुष्यातला आनंदच संपला. पाळीबंद किंवा रजोनिवृत्ती त्यांच्या-त्यांच्या नजरेतून एक वेगळेपणा दाखवते.
स्त्री-बिजांडाग्रंथीत (ओव्हरीत) असलेला स्त्रीबिजांचा साठा संपला की पाळी बंद होते. कारण त्यापासून निर्माण होणारे स्त्रीसुलभ हार्मोन्स कमी कमी होत जातात. त्यामुळे गर्भाशयाच्या आतील अस्तर खूप पातळ होते आणि पाळी बंद होते. जन्मतः स्त्री-बिजांडाग्रंथीत साडेसात ते आठ लाख स्त्रीबिजे असतात. प्रत्येक पाळीत एक स्त्रीबीज पक्व होताना शेकडो स्त्रीबिजे मोठी होतात, पण सुकून जातात. असे करता करता चाळिशीच्या सुमारास ओहरीत जेमतेम 400-500 स्त्रीबिजे शिल्लक राहतात. हीसुद्धा पहिल्यासारखी हार्मोन्स तयार करण्याच्या अवस्थेत नसतात. त्यामुळे स्त्रीसुलभ हार्मोन्स- इस्ट्रोजेन व प्रोजेस्ट्रेरॉन हे कमी कमी होत जातात. त्याबरोबर पिच्युटरीतून तयार होणारे हार्मोन्स वाढतात. या सर्व हार्मोन्सच्या बदलांचा परिपाक म्हणजे स्त्रियांच्यात होणारे अंतर्बाह्य बदल म्हणजेच रजोनिवृत्ती.

  • नियमित येणारी पाळी अचानक बंद झाली व पुन्हा आलीच नाही तर पाळी कायमची बंद झाली असे समजावे.
  • कधीकधी पाळी नियमित येते, रक्तस्रावाचे प्रमाण हळूहळू कमी होते आणि शेवटी थांबते.
  • कधीकधी दोन पाळ्यांमधील अंतर वाढत जाते. दोनचार महिने करता करता जेव्हा वर्षभर पाळी येत नाही तेव्हा ती गेली असे गृहीत धरावे.
  • कधीकधी मासिक पाळी बऱ्याच दिवसांनंतर येते आणि खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होत राहतो. अशावेळी ‘या वयात असे होतेच’ अशा गैरसमजुतीत राहू नका. तसेच एकदा वर्षभर पाळी बंद झाली आणि मग पुन्हा रक्तस्राव झाला तर ती धोक्याची घंटा समजावी व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
    रजोनिवृत्तीच्या काळात जवळजवळ 30 टक्के स्त्रियांना काही ना काही त्रास होत राहतो. पण 70 टक्के स्त्रिया या काळात मोठा त्रास न होता पार पडू शकतात. रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीची त्वचा, केस, बांधा, स्तन, पुनरुत्पादक संस्था यांवर तत्कालिक परिमाण होऊ शकतात, तर हाडे, हृदय व मज्जासंस्था यांवर दूरगामी परिणाम होऊ शकतो.
    रजोनिवृत्ती आणि अस्थिभंगुरता
    हाडांवर रजोनिवृत्तीच्या काळात विशेष परिणाम होतो. कॅल्शियमचे शोषण या काळात कमी होते व अस्थिभंगुरता निर्माण होते. हाडांच्या आत कॉलॅजेन या पदार्थाच्या अस्थिमज्जेमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅगनीज, बोरॉन, सिलिकॉन इत्यादी खनिजे भक्कम तऱ्हेने गुंफलेली असतात, ज्यामुळे हाडाला मजबुती व ताकद मिळते. जेव्हा या कॉलॅजेनमध्ये विविध आकाराच्या पोकळ्या निर्माण होऊन हाड पोकळ बनते, त्याची घनता कमी होऊन ते नाजूक होते, तेव्हा त्याला अस्थिभंगुरता असे म्हणतात. हा विकार अगदी छुप्या चोरासारखा, पाऊल न वाजवता, कोणतीही सूचना न देता शरीरात पसरत असतो. त्यामुळे काहीही कल्पना नसताना अचानक क्षुल्लक कारणाने किंवा कधीकधी विनाकारणसुद्धा हाड जेव्हा मोडते, फ्रॅक्चर होते तेव्हाच ते लक्षात येते. योग्य काळजी पूर्वीपासूनच घेतली तर हा आजार पूर्णपणे टाळता येऊ शकतो.

बहुतेक वेळा हात-पाय, कंबर दुखणे अशा तक्रारींनी सुरुवात होते. मग विकार वाढल्यावर पाठीला पोक येते, उंची कमी होते आणि मग क्षुल्लक कारणाने होणारे अस्थिभंग, मनगटाचे हाड, मांडीचे हाड आणि मणके या जागी फ्रॅक्चर्स जास्त प्रमाणात दिसून येतात.
ऑस्टिओपोरॉसिस टाळण्याची तयारी वयाच्या तिशीपासूनच करायला हवी. दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, तीळ, खसखस, बदाम, जरदाळू, पालक, कोबी, मासे, अंडी, नाचणी, भगर या पदार्थांतून कॅल्शियम उत्तम प्रमाणात मिळू शकते. याबरोबर ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज रोज 400 युनिट्स एवढी आहे. सूर्यप्रकाशाने आपल्याला ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.
आहाराइतकेच विहारालाही महत्त्व आहे. चालणे, जॉगिंग, पळणे, सायकल चालवणे यांसारखे व्यायाम सातत्याने करावे.
हॉट फ्लशेस
रजोनिवृत्ती काळातले हे महत्त्वाचे व त्रासदायक लक्षण. यात अचानकपणे शरीरातील विशिष्ट भागांमध्ये, विशेषतः मान, चेहरा, डोके येथे गरम वाफा निघाल्याचा त्रास होतो. काही सेकंदापासून काही मिनिटांपर्यंत ही भावना राहते आणि मग खूप घाम येतो. मग लगेच थंडी वाजते. हा गरम वाफांचा प्रकार तसा तर शरीरातील कोणत्याही भागात होऊ शकतो आणि फार वेळा होऊ लागला तर अस्वस्थ व्हायला होते. कधीकधी रात्री झोपेतही हा त्रास होऊन तिची झोपमोड होते.
रात्री झोपताना थंड पाण्याने आंघोळ करून, सुती कपडे घालून, खाण्यापिण्यात पथ्य पाळून, प्रयत्नपूर्वक ताणतणाव कमी करून हे ‘हॉट फ्लशेस’ कमी करता येतात. काही स्त्रियांना शरीराच्या काही भागात मुंग्या येणे, बधिर होणे असेही त्रास होतात.
पुनरुत्पादन संस्था, मूत्रसंस्था व स्तन यांमध्येही इस्ट्रोजेनच्या अभावाची लक्षणे दिसून येतात. गर्भाशय, गर्भाशयाचे अस्तर, ओव्हरी हे अवयव लहान होतात, योनीमार्ग शुष्क होतो, सुरकुततो व लहान होऊ लागतो. लैंगिक संबंध आता त्रासदायक व दुःखद होऊ शकतो त्यामुळे तो नकोसा वाटतो. स्त्रियांचे शरीरसंबंधामधील स्वास्थ्य कमी होते. मूत्राशय व मूत्रमार्ग यांची अंतःत्वचा पातळ होते, त्यामुळे लघवीचे इन्फॅक्शन वारंवार होते. यावेळी खालील लक्षणे दिसून येतात-

  • लघवीवर ताबा न राहणे, वारंवार जावे लागणे, खोकल्यानंतर थोडीशी लघवी गळून जाणे इत्यादी विकार सुरू होतात.
  • स्तनांमधील दूध तयार करणाऱ्या ग्रंथी कमी होतात, त्यांचा आकार कमी होतो. गोलाई जाते व त्वचा सुरकुतते.
    या सर्व बाह्य परिणामांबरोबर अतिशय महत्त्वाचे परिणाम म्हणजे मानसिक परिणाम. या काळात झोप कमी होते.
  • छातीत धडधडणे, डोके दुखणे अशा तक्रारीही दिसून येतात.
  • स्त्रियांचा ‘मूड’ अगदी झोपाळ्यासारखा झुलत राहतो.
  • रागावणे, चिडणे, चिडचिड करणे या गोष्टी अगदी लक्षात येण्याइतक्या वाढतात.
  • काळजी करण्याचा स्वभाव वाढतो.
  • हळवेपणा खूप वाढतो.
  • वैफल्याची भावना येते. संसारासाठी राब राब राबले, पण कुणाला त्याचे कौतुक नाही, ही सल मनाला सलत राहते.
  • विस्मरण वाढायला लागते.
  • या सर्वात भर म्हणून तिला बदलत जाणाऱ्या रंगरूपाचे टेन्शन येते.
  • ‘मला बरे वाटत नाही आणि कुणाचे माझ्याकडे लक्षच नाही’ ही भावना प्रबळ व्हायला लागते. आणि त्यातून एकप्रकारचे नैराश्य येते.
    म्हणून प्रत्येक ‘ती’ने निरोगी, निरामय जीवनशैली अंगीकारायला हवी. या जीवनशैलीचे पैलू आहेत- समतोल आहार, विहार आणि मनःस्वास्थ्य.
    रजोनिवृत्तीच्या काळात या स्त्रियांच्या कुटुंबाचीही काही जबाबदारी आहे. पतीने आपल्या कामातून जमेल तितका जास्त वेळ आपल्या पत्नीबरोबर घालविला पाहिजे. तिच्या कामात घरातील सर्वांनी सहभाग घ्यावा. तिच्या तपासण्यांच्या वेळी बरोबर राहून तिला विश्वास द्यावा. ती एकटी नाही हा विश्वास द्यावा. कुणीही तिला गृहीत धरू नये.
    थोडेसे विश्लेषण स्वतः तिनेही करावे. ताणाचे मूळ शोधण्याचा प्रयत्न करावा. मैत्रिणींशी मनमोकळेपणी बोलावे. मनःशांतीसाठी योगोपासना करावी. नामजप, ग्रंथवाचनातून मनःशांती मिळेल असेल तर तसे करावे.
    रजोनिवृत्ती पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून निवृत्ती आहे; निरोगी, आनंदी जीवनापासून नाही हे लक्षात ठेवावे!