Home बातम्या रंगभूमीचा मुकुटमणी

रंगभूमीचा मुकुटमणी

0

डॉ. अजय म. वैद्य

मराठी रंगभूमीच्या इतिहासात मा. दत्ताराम यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. नानासाहेब फाटक, दुर्गाबाई खोटे, मामा पेंडसे अशा दिग्गजांबरोबर मुंबई मराठी साहित्य संघ निर्मित सवाई माधवरावांचा मृत्यूया नाटकाच्या तालमी घेताना, ‘‘या सगळ्या बगळ्यांत मी कावळा आहे असे मला वाटते’’ असे भीतीदायक उद्गार प्रांजळपणे काढणार्‍या दत्तारामबापूंनी नंतर आपण मराठी रंगभूमीवरचा कावळा नसून राजहंस आहे हे स्वकर्तृत्वाने सिद्ध केले.

गोव्यातील वळवईसारख्या गावात जन्मलेल्या आणि नंतर नाटकाच्या वेडापायी अनेक नाटक मंडळीतून भ्रमंती करणार्‍या दत्तारामबापूंची अभिनयसाधना अतिशय प्रखर व कठोर होती. नटश्रेष्ठ चिंतामणराव कोल्हटकरांनी आपल्या बहुरूपीया आत्मचरित्रात अभियनसाधना म्हणजे काय व ती कशी असावी याचे विस्तृत वर्णन केले आहे. ते म्हणतात, ‘‘नाटककाराचे प्रचलित विचार समजून घेण्याची दिग्दर्शकाची जशी पात्रता पाहिजे, तशीच ते पेलण्याची, समजावून घेण्याची नटाचीही पात्रता पाहिजे. एवढ्यासाठीच दिग्दर्शक व नट हे दोघेही बहुश्रुत असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे जे नट व दिग्दर्शक होते, त्यांचाच प्रेक्षकांवर अपेक्षित परिणाम झाला. सर्वच विद्वानांच्या ठिकाणी सर्वच विषयांच्या ज्ञानाची अपेक्षा कोणी करीत नाही. पण नटाच्या ठिकाणी तो करीत असलेल्या भूमिकेची, त्याला प्रतिपादन कराव्या लागणार्‍या विषयाची सर्वसाधारण रूपरेषा तरी माहीत असल्याशिवाय रसनिष्पत्ती करणे त्याला साधणारे नाही. म्हणून दिग्दर्शक व नट बहुश्रुत असायला पाहिजेत. एरवी योग्य प्रकारे भूमिका वठवणे, तिच्याशी समरस होणे ही साधना सहजसाध्य नाही.’’

चिंतामणरावांना अभिप्रेत असलेली बहुश्रुतता येण्यासाठी जो वाचनाचा, चिंतनाचा व्यासंग लागतो, तो आपल्या अल्पशिक्षणावर, तुटपुंज्या आर्थिक परिस्थितीवर मात करून बापूंनी अंगी भिनवला तो केवळ त्यांच्या अपरिमित कष्टांनी, रंगभूमीच्या ध्यासाने, पारदर्शी वर्तनाने, निरागस प्रामाणिकपणाने, अविचल निष्ठेने व सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरहंकारी वृत्तीने आणि निर्मळ मनाने. त्यांचे अनेक गुरू व मित्रमंडळी यांच्याकडून त्यांनी जे मिळेल ते आपल्या संवेदनशील मनावर टीपकागदाप्रमाणे टिपून घेतले व अंगभूत असलेल्या अभिनयाच्या जाणिवेने सर्व कौशल्य पणाला लावून ते प्रकट केले. म्हणूनच त्यांचा अभिनय कोठल्याही भूमिकेत, कधीही कृत्रिम वाटला नाही. परकायाप्रवेशाबरोबरच भूमिकेलाच आपल्या कुडीत ठेवून तिला आपल्या तालावर नाचविणारा हा बहुतेक एकमेव नट.

त्यांच्या नाट्यकारकिर्दीने कळस गाठला तो रायगडाला जेव्हा जाग येतेयातील त्यांच्या शिवाजीने आणि मत्स्यगंधामधील भीष्माने. ऐतिहासिक व्यक्तिरेखांना कौटुंबिक परिमाणात सादर करून वसंत कानेटकरांनी मराठी रंगभूमीवर एक नवीन प्रयोग केला होता. दत्तारामबापूंसारख्या पारंपरिक ऐतिहासिक नाटकातील भूमिका पारंपरिक पद्धतीने केलेल्या कलाकाराला या नाटकाचे दिग्दर्शन करून त्यातील प्रमुख भूमिका करावयाची होती. या नाटकाची हाताळणी सामाजिक असली तरी बाज पूर्ण ऐतिहासिक होता. त्या बाजाची भाषा बापूंच्या तोंडावर सतत खेळत होती. डॉ. काशिनाथ घाणेकर, ललिता जोगळेकर, सुधा करमरकर, भिकू पै आंगले अशा समजदार कलाकारांना घेऊन एक वेगळे नाटक प्रेक्षकांसमोर आणायची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर एका मातब्बर संस्थेने टाकली होती. परंतु कुठल्याही दबावाला न जुमानता बापूंनी आपला संपूर्ण अनुभव पणाला लावला व रंगमंचावर आत्मशोधक भूमिकांचे एक सुंदर शिल्प साकारले. बापूंच्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेचे इतके कौतुक झाले की त्यानंतर बापू म्हणजे शिवाजी महाराजहे समीकरणच होऊन बसले. हीच कथा मत्स्यगंधानाटकातील भीष्माची. भीष्मप्रतिज्ञेच्या वेळचा बापूंचा अभिनय म्हणजे सर्वांगसुंदर. दामू केंकरे एकदा म्हणाले होते की एरवी पाच फूट दोन इंच उंचीचे दत्ताराम भीष्म म्हणून रंगमंचावर अवतीर्ण झाले की सहा फुटांचे वाटत असत. भूमिकेशी तद्रूप होणे किंवा भूमिका जगणे म्हणजे नेमके काय त्याचे ते उत्कृष्ट उदाहरण होते.

कलाकाराने केलेला कायिक, वाचिक, आहार्य आणि सात्त्विक अभिनय म्हणजे नाट्यकलेच्या मूलभूत तत्त्वांची फलश्रुती होय. शरीर, मुद्रा आणि शब्दोच्चार या साधनांनी कलाकाराला नाटकातले पात्र सजीव करायचे असते. म्हणून त्याच्या इच्छाशक्तीचे या तीनही अंगांवर जबरदस्त नियंत्रण असावे लागते. एखाद्या भूमिकेत अभिनयाच्या एखाद्या प्रकाराने अमाप यश मिळाले तरी तेच तेच नक्षीकाम करीत न बसता, नवीन भूमिकेचे काय मागणे आहे, प्रसंग कोणता आहे आणि आपल्या भांडारात काय काय आहे याची जाणीव ठेवून त्यांचा उपयोग करायचा असतो. कलाकाराने आपण करावयाची भूमिका जगायची असते. प्रेक्षकांना ती सजीव वाटावी अशी साकार करायची असते. हे सारे करताना मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्याला त्या भूमिकेचा अभिनय करायचा आहे, वास्तव नव्हे. भूमिका ही जर निर्मिती असेल तर तिचा निर्माता तिच्यापासून अलिप्त असला पाहिजे.

आभास, सत्याभास हाच नाटकाचा आत्मा आहे. नाटकाचा खेळ खेळियाने खेळायचा आणि खेळ संपला की दैनंदिन जीवनाची वाटचाल सुरू करायची. मुखवटा उतरवायचा आणि स्वतःचे आयुष्य जगायचे.

बापूंचे आयुष्य असेच होते. त्यांचा रंगमंचावरील वावर आणि स्वतःच्या जीवनातील वावर यांची छाया एकमेकांवर कधीच पडली नाही. किंबहुना त्यांनी पडू दिली नाही असेच म्हणावे लागेल. प्रयोग संपल्यावर इतक्या सहजतेने ते मुखवटा उतरवायचे की भल्याभल्यांना त्याचे आश्‍चर्य वाटे. आजचे अनेक प्रशिक्षित, कुशल नटसुद्धा हे करायला असमर्थ ठरतात. शरीर, मुद्राभिनय व शब्दोच्चारांवर तर बापूंची विलक्षण हुकमत होती, पकड होती. म्हणूनच त्यांनी केलेल्या विविधांगी भूमिकांमध्ये बापू स्वतः कधीच डोकावलेले दिसत नव्हते. अनेक वेळा ही भूमिका करणारा नटच शिवाजीची भूमिका करणारा आहे यावर लोकांचा विश्‍वास बसत नव्हता. वाचिक आणि कायिक अभिनयाच्या विशिष्ट कसबींमध्ये ते कधीच अडकून राहिले नाहीत. या लकबींच्या चक्रव्यूहातून स्वतःला सहजपणे सोडवून घेण्याची त्यांची कला नाट्यशास्त्राच्या उच्चआंग्लविद्याविभूषितांनाही साध्य करणे अशक्यप्राय ठरलेले आपल्याला दिसून येते.

हे कसब बापूंना साध्य झाले ते परकायाप्रवेश करण्याऐवजी भूमिकेलाच स्वतःच्या कुटीत घालण्यामुळे. हा गोमंतकाच्या मातीचा परिणाम होता, की स्वतःच्या भोवताली वावरणार्‍या उत्तमोत्तम कलाकरांचा आपल्या अचूक निरीक्षणशक्तीने त्यांनी अभ्यास केला होता, का हा नियतीचा एक अपूर्व असा चमत्कार होता, हे नक्की सांगणे कठीण आहे.

मा. दत्ताराम तसे जेमतेम शिकलेले. पण त्यांच्या रंगभूमीविषयक जाणिवा भल्याभल्यांना आश्‍चर्यचकित करतील अशा होत्या. एक काळ असा होता की बापू एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या प्रकृतीच्या भूमिका करीत असत. सकाळी शिवाजी, दुपारी भीष्म तर रात्री कांचनभट. कधी सकाळी रामशास्त्री, दुपारी शकार तर रात्री शिवाजी. एका नटाने अशा भूमिका करणे हे अनाकलनीय होते. संधी साधून दामू केंकरेंनी बापूंना विचारले की, ‘हे कसे शक्य होते?’ बापू वरमले. त्यांना त्याची प्रक्रिया सांगता येत नव्हती. ‘असू दे, असू देकरता करता केंकरे म्हणाले, ‘तुमच्या भाषेत सांगा!’ त्यावेळी बापू म्हणाले, ‘हांव नाटक वाचता. मागीर म्हजी भूमिका काडून म्हज्या कुडींत घालतां. मागीर कूड करता तें!’ परकाया प्रवेशाच्या जागतिक सिद्धांताला छेद देणारी ही संकल्पना. भूमिकाच आपल्या कुडीत घालण्याइतकी अलौकिक शक्ती या लौकिकार्थाने अशिक्षित कलाकारात होती.

मराठी संगीत रंगभूमीच्या प्रवासात अनेक गोमंतकीय कलाकारांचा हातभार लागलेला आहे. यांतील कित्येकांनी आपली नाममुद्रा या इतिहासावर उमटविलेली आहे. परंतु गद्य रंगभूमीच्या वाटचालीत मात्र गोमंतकीयांचे नाव अभावानेच आढळते. स्वतःच्या असामान्य अभिनयाने आणि निरागस निर्मलतेने रसिकांच्या मनात ध्रुवतार्‍यासारखे अढळ स्थान निर्माण करणारे मा. दत्ताराम यांनी मराठी रंगभूमीवर गोमंतकाचे नाव चिरकाल मुद्रित करून ठेवले आहे.

बाप्पांचे एटीकेट

बाप्पा घरी असोत, दौर्‍यावर असोत, त्यांचा एक कार्यक्रम अगदी ठरलेला असे. सकाळी नागवेलीची पाने आणायची, स्वच्छ धुवून पुसून कात, चुना आणि सुपारी एवढेच पदार्थ टाकून पानाची वळकटी करून त्याला दोरा बांधून ठेवायचा. हे सगळे विडे एका चांदीच्या डबीत व्यवस्थित लावून ठेवायचे आणि दिवसभर या डबीतले विडे खायचे. हा क्रम गेली कित्येक वर्षे चालू आहे. त्यांच्या या विड्याचा प्रसाद त्यांच्या मर्जीतल्या माणसांखेरीज कुणाला सहसा मिळत नाही. एकदा मी आणि माझे गुरू पद्मश्री दाजी भाटवडेकर बाप्पांबरोबर एका दौर्‍यात होतो. आम्हाला आकस्मिकरीत्या त्यांच्या या प्रसादाचा लाभ झाला. आम्ही दोघांनी पाने तोंडात टाकली. माझ्या तोंडात दोरा अडकला. मी तो काढून टाकला. पण आमच्या गुरूंच्या तोंडात जेव्हा दोरा आला तेव्हा गुरूंनी बाप्पांना चक्क विचारले, ‘काय हो, अहो पानात दोरा आला!’ बाप्पांनी हसून उत्तर दिले, ‘अहो, तो दोर नाही, ते आमच्या पानाचे एटीकेट आहे.’

–  नाना ओक

अन्नदाता सम्राट

बर्‍याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सातारच्या कूपर इंजिनिअरिंग वर्क्सच्या रौप्यमहोत्सव प्रसंगी होनाजी बाळाचा प्रयोग होता. प्रयोग सुरू झाला. ‘श्रीरंगा कमलाकांताझाले आणि वरुण राजाने उग्र स्वरूप धारण करून पावसाची झोड उठविली. विजा कडाडू लागल्या. वादळ सुटले. सगळीकडे हाहाकार उडाला. त्यातच वीज गेली. गोंधळात आणखीच भर पडली. प्रयोग अर्थातच अर्धवट बंद पडला. काळोखाचे इतके साम्राज्य होते की कुणाचा कुणाला पत्ता लागेना. आम्ही नाट्यमंडळी कसेबसे अर्ध्या मैलावरील आमच्या राहण्याच्या जागी जाऊन पोहोचलो. प्रयोग बंद पडलाच होता, आता पोटापाण्याची सोय करायला हवी होती. वास्तविक प्रयोगानंतर सर्व कामगारांना मेजवानी असल्याने हंडे भरून अन्न शिजवले होते. पण पावसाने कहर केल्याने त्याचाही सत्यानाश झाला होता. कलाकार मंडळीच्या पोटात कावळे कोकलत होते, पण कुणीही जेवणाची व्यवस्था करू शकत नव्हता. अखेर बापू सरसावून उठून म्हणाले, ‘चला नाना, जेवणाची काही सोय होते का पाहूया!’ लगेच ते आणि मी दोघेही अंधारात स्वयंपाकघर शोधू लागलो. अखेर बर्‍याच प्रयत्नांनी ते आम्ही शोधले. बाप्पा आत गेले. आचार्‍याला विचारून त्यांनी पुर्‍या, भाजी, भात, उसळ असे सामान जमविले. पत्रावळी, पाण्याची घागर भरून घेतली. घागर आणि पत्रावळी माझ्याजवळ दिल्या आणि स्वतः एका टोपलीत सगळे अन्न भरले आणि चक्क ती टोपली आपल्या डोक्यावर घेऊन वसतिगृहाकडे चालू लागले. एखाद्या सम्राटाने राजमुकुट घालावा अशा थाटात बाप्पा ती अन्नाची टोपली घेऊन चालत गेले. सर्वांना स्वतःच्या हातांनी त्यांनी खाऊ घातले आणि मगच स्वतः जेवले. त्यावेळचा बाप्पांचा आनंद, उत्साह मी कधीच विसरणार नाही.

–  नाना ओक