25 C
Panjim
Monday, January 18, 2021

योग विशेष… संकल्प- योगदिनानिमित्ताने…

  • प्रा. रमेश सप्रे

२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन. या दिवसापासून सुरू होते दक्षिणायन. म्हणजे हळूहळू दिवसाचा प्रकाश कमी नि रात्रीचा अंधार जास्त. आपण ठरवलं तर या भौगोलिक दक्षिणायनातही आध्यात्मिक उत्तरायण अनुभवू शकतो. योगाभ्यास करून, योगसाधना करून, संकल्पपूर्वक स्वतःलाच सांगत राहूया- ‘तमसो मा ज्योतिर्गमय| मृत्योर्मा अमृतं गमय॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

निसर्गरम्य वातावरणातील एका योग पाठशाळेला भेट देण्याचा योग आला. जीवनातील एक भाग्ययोग समजावा एवढा तो अनुभव स्वर्गीय होता. प्रवेश करताच गायींच्या नि वासरांच्या हंबरण्याचा, त्यांच्या गळ्यातील घंटांचा एक मिश्रमधुर ध्वनी प्रवासाचा शीण क्षणात घालवून गेला. वेळ झुंजूमुंजू म्हणजे पहाटेची. वृक्षवेलींवरून टपटपणारे दवबिंदू आम्हालाही अभिषेक करत असल्याचा भाव आतून खूप सुखावत होता. पठणकक्षातून वेदातील ऋचांची वातावरणाला चेतन बनवणारी स्पंदने तर खरोखर पृथ्वीच्या बाहेरील जगात नेणारी होती. आपण जमिनीवरच आहोत ना याची खात्री करून घ्यावी लागावी इतकी थंड ओली मखमली हिरवळ सर्वत्र पसरली होती. पक्ष्यांची किलबिल, वाहणार्‍या झर्‍यातूनही जणू मंत्रोच्चार ऐकू येत होते. समोरच्या वृक्षावर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रंग आणि छोट्या पिसार्‍याने शोभून दिसणार्‍या शुभसंकेतसूचक भारद्वाज पक्ष्यांची जोडी बसली होती. काही क्षण त्यांच्याकडे निरखून पाहत असतानाच स्वागतमंजूषेतून काही तेजस्वी कुमार-कुमारी आरती ओवाळण्यासाठी पुढे सरसावल्या. सुंदर आकाराच्या तबकात कुंकुम, अक्षता, फुलांच्या पाकळ्या आणि निरांजनं अशी सामग्री होती. त्यांचे धवलशुभ्र वेष आणि प्रसन्न मुद्रा पाहून नतमस्तक झालो. तेवढ्यात त्यांनी कपाळावर कुंकुम तिलक रेखलेसुद्धा. किती रेखीव होते ते! एकमेकांच्या कपाळावरचे तिलक, त्यावर चिकटलेल्या अक्षता, केसांत अडकलेल्या फुलांच्या पाकळ्या यातून सावरत असतानाच इतकं छान ओवाळलं गेलं की आपल्या डोक्याभोवती प्रकाशवलय निर्माण झाल्याचा भास झाला.

विशेष म्हणजे त्या आरती ओवाळणार्‍या बालक-बालिकांच्या ओवाळताना होणार्‍या हालचाली एवढ्या लयबद्ध होत्या की एकाच्याही तबकातील निरांजन तसूभरही हललं नाही. याचं कारण विचारल्यावर एका चिमुरडीनं दिलेलं उत्तर हे त्या पाठशाळेचा आत्मा व्यक्त करणारं होतं. ती म्हणाली, ‘‘कोणतीही कृती करताना लक्ष श्‍वासाकडे द्यायचं. श्‍वासाची लय सांभाळली की सर्व हालचाली सहजसुलभ होतात.’’ गमतीनं तिला विचारलं, ‘‘हे तुझं उत्तरही तुमच्या पाठांतराचा भाग आहे का?’’ ती उत्तर देणार एवढ्यात त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे आर्य (आचार्य) म्हणाले, ‘‘नाही महोदय, हा त्यांच्या सरावाचा नि अनुभवाचा भाग आहे. यावं आपण. स्वागतम्! सुस्वागतम्! शुभागतम्!!’’
अशा त्रिवार स्वागतानं इतके भारावून गेलो की शरीरापेक्षा मन अधिक टवटवीत नि प्रफुल्लित झाले. स्वागतकक्षात जायची घाई नव्हती, कारण हळूहळू उजाडत चाललेल्या प्रभातकाळी त्या आश्रमाच्या परिसरात जागोजागी अर्थासह लिहिलेली योगसूत्रं दिसू लागली… नव्हे आमच्याशी हितगुज करू लागली. रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यात वेताची काठी उभी करून, त्यावर विशिष्ट लेप चढवून जाड केलेल्या फलकावर ती सूत्रं सुंदर देवनागरीत लिहिली होती. त्याच्याखाली हिंदी आणि इंग्रजीत त्या सूत्रांचा सुगम अनुवाद लिहिला होता.

ती सूत्रं एका दृष्टीनं संपूर्ण योगविज्ञान होतं, तर दुसर्‍या बाजूनं त्या पाठशाळेचा पाठ्यक्रम नि आचारसंहिता होती. त्यांतील काही सूत्रांवर ‘योगदिवसा’च्या निमित्तानं सहचिंतन करूया. जीवनात प्रकाशाची मात्रा (प्रमाण) वाढवूया. प्रकाशामुळे इतर ऊर्जा जागृत होतात आणि वायुमंडल शुभशक्तीनं भारून जातं. या ऊर्जा म्हणजे उष्णता, किरणोत्सर्ग (रेडिएशन) आणि प्राणशक्ती (व्हायरल एनर्जी). ही भाषा काहीशी शास्त्रशुद्ध वाटेल म्हणून सूत्रांचा विचार नि मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात उपयोजन हे साध्यासोप्या शब्दांत पाहूया.
‘महर्षी पतंजलींची योगसूत्रं आणि भगवंतानी अर्जुनाला युद्धप्रसंगी सांगितलेली गीता या दोन ग्रंथांचा मुख्य आधार पाठशाळेतील सर्व व्यवहारांना आहे,’ हे प्रधानआर्यांचं (मुख्य आचार्यांचं) विधान विचार करण्यासारखं होतं. प्रार्थनासत्राची वेळ झाल्याने त्या कक्षात गेलो. इतकं दिव्य-पवित्र वातावरण सध्याच्या काळात क्वचितच अनुभवायला मिळतं. प्रार्थनेतील श्‍लोकही योगासंदर्भात जीवनप्रणालीचा संदेश देणारे होते. इतक्या मंद स्वरात (जस्ट ऑडिवल्) इतके छात्र कसे काय म्हणत होते याचं आश्‍चर्य वाटलं. तरीही प्रत्येक उच्चार स्पष्ट ऐकू येत होता. बहुतेक श्‍लोक नि मंत्र परिचित असल्याने त्यांचा आर्त आस्वाद घेणे सोपे जात होते. जीवन-मृत्यू या दोन टोकांचा जणू सेतू असलेले दोन मंत्र नवं दर्शन घडवून गेले. योगशास्त्रानुसार या मंत्रांचा संदेश आजच्या भयंकर परिस्थितीत आश्‍वासक होता. ॐ भूः म्हणजे भुवः स्वः| हे तीन प्रदेश- तीन लोक, याहीपेक्षा तीन अवस्था आहेत निरोगी जीवनाच्या.

भूः म्हणजे केवळ जमीन नव्हे तर धरती, जल, वनस्पती, सारे सजीव-निर्जीव पदार्थ. सृष्टी म्हणजे निसर्गमाता नि समष्टी म्हणजे समाजपिता. यांची संतानं (मुलं) म्हणजे आपण सारे जीवजंतू. परस्परांशी स्नेहमय संवादी वातावरणात राहाणं याची जबाबदारी आपलीच आहे. माणूस सोडून सारेजण आपापल्या प्रकृतीधर्मानुसारच वागतात. कोरोना विषाणूही त्याच्या प्रकृतीनुसारच कार्य करतोय. तो माणसाच्या विकृतीचा परिणाम आहे. म्हणून विषाणूवर विजय मिळवतानाच आपल्यातली विष्णुशक्ती जागी करूया. वैष्णव बनूया. कसे? केवळ विष्णूचे बाह्य उपासक नाही तर ‘वैष्णवजन तो तेणे कहिये रे, जी पीर परायी (दुसर्‍याची पीडा, वेदना) जाने रे|’ असे विष्णुभक्त बनूया. खर्‍या अर्थाने करुणायुक्त, माणुसकी असलेला ‘माणूस’ बनूया. यालाच रामकृष्ण परमहंस म्हणायचे- ‘तू कोण रे दया करणार? तूच दयेसाठी हात पसरतोस त्या दयाघन, दयासागर परमेश्‍वरासमोर. तू सेवा कर, सर्वांची सेवा. तीही कशी? ‘शिवभावे जीवसेवा’ म्हणजे प्रत्येक जीवात शिवाचं दर्शन घ्या अन् भावभक्तीने त्याची सेवा करा. यात त्याचं नि तुमचं सर्वांचंच कल्याण आहे.’ कळत-नकळत हाच मंत्र बनला महायोगी स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा.

जीवनोपयोगी योगसूत्रं ः
सध्याच्या भयग्रस्त नि तणावग्रस्त जीवनात शांत नि स्वस्थ कसं राहायचं, म्हणजे पूर्ण आरोग्यवान जीवन कसं जगायचं याबद्दल निरनिराळ्या समाजमाध्यमांतून प्रभावी मार्गदर्शन मिळतंय. नुकत्याच एका उगवत्या चित्रपट अभिनेत्याने केलेल्या आत्महत्येमुळे मनाच्या संतुलनाचा विषय पुन्हा एकदा महत्त्वाचा बनलाय. नाहीतर योग म्हणजे योगासनं एवढंच समीकरण झालं होतं. आता मनाचं व्यवस्थापन (माइंड मॅनेजमेंट), मनावर नियंत्रण (माइंड कंट्रोल), मनाचं नियमन (माइंड रेग्युलेशन) अशा शीर्षकांचे लेख, वाहिन्यांवर मालिका आणि छापलेली किंवा ई-बुक्स मोठ्या संख्येने सादर केली जात आहेत. त्यांना लोकांचा प्रतिसादही उत्तम आहे. कारण ‘रात्र नव्हे दिवसही वैर्‍याचा आहे, जागे रहा’ अशी परिस्थिती आहे. तुकोबांनी तर काही शतकांपूर्वी सांगितलंय- रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग| अंतर्बाह्य जग आणि मन॥
त्या पाठशाळेचा एकूणच कार्यक्रम फार प्रभावी आणि प्रेरणादायी होता. अशी कोणती जीवनसूत्रं होती त्या वेदपाठशाळेतील फलकांवर? एक गोष्ट आवर्जून सांगितली गेली- या संपूर्ण परिसरातील प्रत्येक गोष्ट नैसर्गिकरीत्या विघटन होऊन मातीत मिसळणारी (बायोडिग्रेडेबल) आहे. डिटर्जंट, सॅनिटायझर्स, जंतुनाशकं सारं नैसर्गिक आणि वनस्पतीजन्य (हर्बल) पदार्थांपासून बनवलेलं आहे.

‘याचा योगसाधनेशी काय संबंध?’
हा प्रश्‍न विचारल्यावर प्रधानआर्य हसतमुखाने म्हणाले, या प्रश्‍नाची वाटच पाहत होतो. योग जीवनशैली हा संपूर्ण विचार आहे. त्यात संपूर्ण आरोग्य- रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी), प्रतिबंधक क्षमता (प्रिव्हेंटिव्ह कपॅसिटी), शरीराची जडणघडण, वारंवार होणार्‍या संभाव्य व्याधी, त्यांची चिकित्सा नि उपचार, वैयक्तिक नि सार्वजनिक स्वच्छता अशा अनेक पैलूंचा समावेश होतो. मनःशांती आणि स्थिरवृत्तीच्या दृष्टीनं ज्या आध्यात्मिक उपासनेची गरज असते ते अध्यात्मशास्त्रही योगविज्ञानात येऊन जाते.
खरोखर, आजच्या प्रसंगात मानवजातीला शांत, आरोग्यवान, सशक्त मनाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने मार्गदर्शक अशा योगसूत्रांचा विचार करूया.

* अथ योगानुशासनम् ः योग आणि अनुशासन हे शब्द परस्पर पूरक आहेत. योग म्हणजे तनामनाचा कोणत्या तरी उच्च शक्तीशी- ध्येयाशी संयोग. अनुशासन म्हणजे शिस्त. ‘अथ’ म्हणजे आरंभ. (आपण ‘अथपासून इतिपर्यंत’ म्हणतोच ना!) मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली ही ज्ञानशाखा (डिसिप्लिन्) हळूहळू जगावर साम्राज्य गाजवू लागलीय. शारीरिक ‘फिट्‌नेस’साठी जिम्‌मधली कसरत आणि मानसिक-भावनिक ‘वेलनेस’साठी योगकेंद्रे असा विचार मान्य होऊ लागलाय.

* योगः चित्तवृत्तिनिरोध ः मनातून ज्या असंख्य वासना, वृत्ती उसळत असतात त्यांच्यावर नियंत्रण, त्यांचं नियमन म्हणजे योग. सध्याच्या चंगळवादाच्या नि भोगवादाच्या जमान्यात तर हे सूत्र कधी नव्हे इतके महत्त्वाचे बनलेय. कोरोनाग्रस्त आयुष्यात घरात बसावं लागण्याचा प्रमुख लाभ हाच आहे की, खाणं, पिणं, भटकणं, पार्टी, पिकनिक यांसारख्या स्वैर जीवनाला लगाम घातला गेलाय. बेलगाम जगताना चित्तवृत्तींवर नियंत्रण हे आतून केलं जातं. रथाचे घोडे बाहेर दौडतात किंवा उधळतात हे अवलंबून असतं आत (रथात) असलेल्या सारथ्याच्या हातात असलेल्या लगामांवर.
आपले श्‍वास हे आत-बाहेर जोडलेले लगामच आहेत. यावर नियंत्रण बुद्धी नावाच्या सारथ्याकडे आहे. मनाला लगाम आणि इंद्रियांना रथाचे घोडे म्हटलेय. अर्जुन भगवान कृष्णाला हाच प्रश्‍न विचारतो, ‘मन कसं आवरायचं? ते अतिशय चपळचंचल आहे.’ आकाशात वार्‍याला बांधून घालू शकेन, नदीचा प्रवाह वळवू शकेन, पण मनाला आवरणं-सावरणं अवघड जातंय. याला भगवंतांनी दिलेलं उत्तर हे पुढचं योगसूत्र.

* अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध ः त्या मनाचा, चित्तवृत्तींचा निरोध (म्हणजे नियंत्रण) करायचा असेल तर दोन साधनं- अभ्यास नि वैराग्य. एकच गोष्ट अंगवळणी पडेपर्यंत पुनः पुन्हा करत राहाणे म्हणजे अभ्यास. धनुर्धारी बनण्यासाठी, लक्ष्याचा वेध घेण्यासाठी सहस्रावधी बाण मारावे लागतात. अभ्यासातील महत्त्वाचा भाग आत्मसात करण्यासाठी परत परत आवृत्ती-उजळणी करावी लागते. अभ्यास करेल त्याला अशक्य काही उरणार नाही. सायास-प्रयास, आस नि ध्यास हा अभ्यासाचा मुख्य प्रकार आहे.
वैराग्य ही कृती नसून मनाची वृत्ती आहे. याला विवेकाची गरज असते. भावनेच्या भरात आललं वैराग्य हे स्मशानवैराग्यासारखं तात्कालिक असतं. टिकाऊ नसतं. विवेक ही शक्ती आहे जी मिळवण्यासाठी ज्ञान-चिंतन-ध्यान यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची गरज असते. ‘ज्ञानस्यैव पराकाष्ठा वैराग्यम्’- ज्ञानाची अंतिम सीमा किंवा अवस्था म्हणजे वैराग्य. ‘नुसते वैराग्य हेंकाडपिसे’ असं समर्थ रामदास म्हणतात. त्याचा अर्थ आहे भावनेच्या भरात घर सोडून गेला तर हे मूर्खासारखं वैराग्य. अशी व्यक्ती पुन्हा आपल्या संसारात परतेल किंवा नवा संसार बसवेल.

* समत्वं योग उच्यते ः शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने कफ-वात-पित्त या मूळ त्रिदोषांतले साम्य म्हणजे आरोग्य. हे साम्य ढळणं म्हणजे रोगांना निमंत्रण. मनाच्या दृष्टीनं मानसिक तोल बिघडवणारे जे काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर यांसारखे विचार आहेत, त्यांवर नियंत्रण, त्यांच्यात संतुलन असणं म्हणजे योग.
योगः कर्मसु कौशलम् ः हीसुद्धा गीतेत भगवंताने सांगितलेली गीतेतली एक व्याख्या आहे. जी विविध कर्मं आपण दैनदिन जीवनात नित्यनियमाने करतो, त्यात एकप्रकारचा सहज तोल असणे आवश्यक असते. तसेच नैमित्तिक प्रसंगी आपल्याला कराव्या लागणार्‍या आपल्या कर्मांतही संतुलन हवे. यासाठी हवं असतं कौशल्य. स्वतःला आवरायचं, सर्वांना सावरायचं कर्तव्यकर्म करण्यात आपली कसोटी असते. यातूनच सर्वांचं कुशलमंगल म्हणजे कल्याण साध्य होणार असतं.

* ‘उद्यानं ते पुरुष नावयानं जीवातुं ते दक्षतातिं कणोमि|’ हे अथर्ववेदातलं सूत्र आकर्षित करणारं आहे. ‘उद्यान’ म्हणजे इथं बाग, वाटिका असा अर्थ नाहीये तर उत् यान म्हणजे वरच्या दिशेनं गती म्हणजेच प्रगती किंवा उन्नती. सार्‍या मानवजातीला हा उपदेश आहे की, हे मनुष्या (पुरुष), जीवनात (सर्व क्षेत्रांत) सदैव उन्नती झाली पाहिजे; अधोगती नाही. आपला देह हा एक यान (वाहन) आहे. तो सतत मृत्यूच्या दिशेनं चालतच आहे. पण मधला काळ (जन्म-मृत्यू यांच्यातील मधला काळ) म्हणजे जीवन हे वरच्या दिशेने विकसित होत राहिले पाहिजे. स्वतःचा उद्धार आपण स्वतःच केला पाहिजे, नाहीतर आपल्या अधःपातालाही आपणच जबाबदार असतो. ‘उद्धरेत् आत्मन् आत्मानम्, न आत्मानं अवसादयेत्’ म्हणजे अधोगती नको.
योगशास्त्राची एक मान्यता आहे की या विश्‍वाचं संचालन करणारी एक अत्यंत सूक्ष्म पण प्रभावी शक्ती आहे. ती अदृश्य, अमूर्त, अनंत आहे. पृथ्वी- आप (पाणी)- तेज (अग्नी)- वायू नि आकाश ही पंचमहाभूतं या विश्‍वव्यापिनी महाशक्तीची रूपं आहेत.

योगाद्वारे या परमशक्तीशी जोडलं जाणं नि जोडलेलं राहाणं हे शरीरमनाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे. यासाठी त्या शक्तीला जोडण्यासाठी जी साधना आवश्यक आहे तिची काही सूत्रं-
* तस्य वाचकः प्रणवः ः त्या शक्तीची, परब्रह्माची खूण आहे प्रणव म्हणजे ॐ! प्रत्येक क्षणाला, म्हणजेच प्रत्येक श्‍वासाला नवा असतो म्हणून याला ‘प्रणव’ म्हणतात. ॐ कधी शिळा होत नाही. नित्यनूतन म्हणूनच सत्यसनातन नि चिरंतन अशी जी शक्ती आहे तिची आराधना ॐकाराने करता येते. पिंडी (शरीरात) आणि ब्रह्मांडी (विश्‍वात) ॐ ध्वनी अंतर्नादासारखा व्यापून आहे. ॐकार साधना हा तना-मनालाच नव्हे तर जीवनाला जोडणारा नि व्यापणारा योगाभ्यास आहे. हा ॐकारासाठी अभ्यास कसा करायचा? याला एक मार्ग म्हणजे प्राणाचा प्रणव करायचा म्हणजे श्‍वासाश्‍वासावर ॐकाराची नाममुद्रा उमटवायची. हे कसं साध्य करायचं?
* तत्‌जपः तदर्थभावनम् ः त्या ॐचा किंवा कोणत्याही पवित्र नामाचा जप करायचा म्हणजे जो मंत्र आपण जपतो त्याचा अर्थ, त्यातला भाव लक्षात येऊन अखंड अनुभव घेत राहायचा- जीवन समृद्ध, शरीर आरोग्यसंपन्न आणि मन आनंदानं ओतप्रोत भरून राहिल्याचा अनुभव. ‘मननात् त्रायते’ म्हणजे मनन केल्यावर जे आतून मार्गदर्शन मिळते, त्यामुळे जीवनातील कोणत्याही परिस्थितीत तारून नेणारा (मंत्र). ‘गायत्री’ म्हणजे ‘गायनात् त्रायते.’ गायत्री हा चोवीस अक्षरांचा छंद आहे. प्रत्यक्षात त्या मंत्राचं नाव सावित्री मंत्र आहे. ‘तत् सवितुर्वरेण्यं’ असा मंत्र आहे ना? आकाशात दिसणारा सूर्य ज्या सूर्याच्या (आत्मसूर्य, चैतन्यसूर्य) तेजानं तळपतो त्या सूर्याच्या कधीही न मावळणार्‍या, ग्रहण न लागणार्‍या तेजाचा उदय आमच्या बुद्धीत होऊ दे, हा त्या मंत्राचा अर्थ आहे. यावर मनन-चिंतन तसेच त्याला भाव आणि अनुभव यांची जोड दिली तर योगसाधना सफल होते. त्या शक्तीला आत्मसात करण्यासाठी शरणही जायला हवे.
* ईश्‍वरप्रणिधानात् ः म्हणजे ईश्‍वर नावाच्या विश्‍वव्यापी शक्तीला शरण जाणं. प्रणाम, प्रणिपात करताना शरणागतीचा भाव मनात असणं. यासाठी उपयोगी पडतात त्या गोष्टी म्हणजे-
ध्यानधारणा
प्राणायाम (श्‍वास नियंत्रण)
स्वयंसूचना (ऑटोसजेशन)
प्रार्थना
हे सारे आपल्या नित्यनेमाचा, दैनंदिन कार्यक्रमाचा भाग असणे आवश्यक असते. एक दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ ठीक आहे; पण या दिवशी काळाची अत्यंत गरज असलेल्या परिपूर्ण अशा योगसाधनेला पुनःसमर्पण करायचं असतं. प्रार्थनेच्या जोडीला प्रतिज्ञाही करायची असते.

२१ जून हा सर्वात अधिक लांबीचा दिवस (द लॉंगेस्ट डे) असतो. प्रकाश सर्वाधिक असतो. सध्याच्या ‘कोविड १९’चे अंधाराचे जाळे फिटून भयाने व्याप्त झालेले आकाश मोकळे व्हायला हवे. दशदिशांनी योगाचा महाप्रकाश सर्व चराचराला व्यापून टाकणारा पसरायला हवा असेल तर आपण स्वतःपुरती तरी प्रतिज्ञा करायला हवी. प्रार्थनेला प्रतिज्ञेची जोड असेल तरच ती जमिनीवर उतरते, रूजते, फुलते नि आपलं जीवन आरोग्यसुगंधाने भरून टाकते. नाहीतर फक्त घोषणा-भाषणांचे बुडबुडे!

२१ जूनपासून सुरू होतं दक्षिणायन. म्हणजे हळूहळू दिवसाचा प्रकाश कमी नि रात्रीचा अंधार जास्त. आपण ठरवलं तर या भौगोलिक दक्षिणायनातही आध्यात्मिक उत्तरायण अनुभवू शकतो. योगाभ्यास करून, योगसाधना करून, संकल्पपूर्वक स्वतःलाच सांगत राहूया-
तमसो मा ज्योतिर्गमय| मृत्योर्मा अमृतं गमय॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

मागणी मान्य

अखेर मेळावलीवासीयांची मागणी मान्य झाली. त्यांनी स्थानिक आमदार विश्वजित राणे यांना नमवले. विश्वजितनी सरकारला नमवले आणि मेळावलीतून आयआयटी प्रकल्प अन्यत्र हलविण्यास सरकार...

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचे

>> मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार शेळ-मेळावली येथील आयआयटी प्रकल्पाला स्थानिक लोकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

आजपासून देशात कोरोना लसीकरण

>> गोव्यात ७०० जणांना लस आज शनिवार दि. १६ जानेवारीपासून देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र...

पंतप्रधानांनी फोनद्वारे केली श्रीपादभाऊंची विचारपूस

अंकोल्याजवळ अपघातात जखमी झालेले व सध्या गोमेकॉमध्ये उपचार घेणारे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून...

ALSO IN THIS SECTION

आर्थिक २०२० ः सिंहावलोकन

शशांक मोहन गुळगुळे एक महिन्यानंतर केंद्रीय अर्थमंत्र्यांना २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करावा लागणार. हा अर्थसंकल्प सादर...

उद्याचा काय नेम?

डॉ. सोमनाथ कोमरपंत माणसाने कसे वागावे याची संथा कवीने दिलेली आहे. तुला आज जे काय वाटतं ते तू...

कोरोनाने विश्‍वच बदलले!

श्रीशा वागळे (जीवनशैलीच्या अभ्यासक) रेस्टॉरंट्‌स, कॅङ्गेज्‌मधली मेनूकार्डस्, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पेये, खाद्यपदार्थांनी सजली आहेत. लग्नं अगदी कमी खर्चात उरकली...

स्वीकार

डॉ. फ्रान्सिस फर्नांडिस ‘‘दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी लग्न केलं. डॅनी हँडसम, प्रामाणिक व सरळ स्वभावाचा म्हणून मी...

भोबे, ‘मासे आणि मी’ आणि… मी!

सखाराम शेणवी बोरकर केवळ अठ्ठेचाळीस वर्षांच्या भोबे यांच्या आयुष्यातील शेवटची दहा वर्षे हा त्यांचा लेखनकाळ होता. या दहा...