योगमार्ग – राजयोग

0
469

– डॉ. सीताकांत घाणेकर
(योगसाधना: २७६)
(स्वाध्याय – २४)
सर्व मानव सुखाच्या शोधात असतात. हे सुख विविध प्रकारचे असते- मुख्यतः बाह्यसुख व आंतरिक सुख. बाह्यसुख म्हणजे इंद्रियसुख. ते क्षणिक असते. पण आंतरिक सुख दीर्घकाळ टिकणारे असते. पण बहुतेक जण बाह्यसुख हेच खरे सुख आहे असे मानून सर्व जीवनभर त्याच्याच मागे धावताना दिसतात. बाह्यसुख मिळवण्यासाठी प्रयत्न करू नये असे नाही. पण सर्वतोपरी त्याच्याच मागे जाणे हेसुद्धा बरोबर नाही. त्यामुळेच सुज्ञ माणसाने अंतर्सुखाचा थोडा थोडा अनुभव घेणे आवश्यक आहे. आणि एकदा का त्याला या सूक्ष्म सुखाचा अनुभव आला की बाह्य सुखात त्याला तेवढा रस राहात नाही.
आपली पाच इंद्रिये आहेत- डोळे (रूप), कान (शब्द), नाक (गंध), जीभ (रस), त्वचा (स्पर्श). या विविध इंद्रियांमुळे व्यक्तीला वेगवेगळे चांगले-वाईट अनुभव येतच असतात- सर्व आयुष्यभर चांगले अनुभव आले की त्याला वाटते की मी सुखात आहे. पण वाईट घटना वाढल्या तर त्याला दुःख होते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की सुखदुःख दोन्ही क्षणिक असतात. अनेक वेळा प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार म्हणजेच पूर्वसंचितामुळे त्याला दोन्ही भोगावेच लागतात. पण कोणत्याही गोष्टी दीर्घकाळ टिकत नाहीत, हे सत्य आहे. एक साधे उदाहरण घेतले तर क्षणिक इंद्रियसुख म्हणजे काय हे कळेल. समजा एखाद्याला जिलब्या खूप आवडतात. ती वस्तू बघितली की त्याला वाटायचे, ‘मला जिलबी मिळाली आणि मी जिलबी खाल्ली की मी लगेच सुखी होईन.’ मग त्याला जिलब्या मिळाल्या की तो खायला लागतो. त्या खाताना त्याला खूप आनंद होतो. त्याला वाटत असतं की आपण खूप भाग्यवान आहोत. एक..दोन..तीन अशा अनेक जिलब्या तो खातो व प्रत्येक जिलबीसोबत त्याचा आनंद द्विगुणित… त्रिगुणित होत राहतो. पण एक क्षण असा येतो की त्याला जिलब्या नकोशा वाटतात. त्या क्षणी त्याच्या ताटात जर जबरदस्तीने कुणी जिलबी वाढलीच व त्याला म्हटले – ‘अरे, तुला जिलब्या आवडतात नं, म्हणून मी तुला एक वाढतो. आता तुला खावीच लागेल.’ तर तो म्हणेल, ‘मला जिलब्या आवडतात हे सर्वतोपरी सत्य आहे. तुम्ही वाढलेली ही पहिली जिलबी नाही. त्याआधी मी थोड्या जिलब्या खाल्लेल्या आहेत. आता मला आणखी नकोत. आता आणखी एक जिलबी जरी मी खाल्ली तरी मला उलटी होईल.’
याचे कारण म्हणजेच हे इंद्रियसुख आहे ते क्षणिक आहे. त्या सुखाची एक विशिष्ट मर्यादा असते. पण आंतरिक सुख दीर्घकाळ टिकते. त्याला मर्यादा नाही. आता याचे उदाहरण पाहू.
* एक उदाहरण म्हणजे कृतज्ञतेपोटी इतरांची सेवा करणे. मग ती सेवा घरच्या लोकांची, आप्तेष्टांची, समाजाची, राष्ट्राची, विश्‍वाची… कुणाचीही असू दे. असे करताना अनेक वेळा कष्ट सहन करावे लागतात पण शेवटी सेवा करता करता आपला आनंद, सुख-समाधान वाढतच जाते. त्याला मर्यादा नाहीत. या सर्व भावना दीर्घकाळ टिकतात. म्हातारपणी ज्यावेळी इंद्रिये साथ देत नाहीत. त्यावेळी आपण या सर्व गोष्टी पूर्वीसारख्या प्रकर्षाने नियमित करू शकत नाही. पण इंद्रियांना वळण लागल्यामुळे आपल्याला जमेल तसे करतो. एवढेच नव्हे तर या सर्व घटनांची आठवण केली, उजळणी केली की मन प्रसन्न होते. एवढेच नव्हे तर मृत्युसमयीदेखील जिवाला आत्मानंद मिळतो. त्याला वाटते की मी अमूल्य अशा मानव जीवनाचे सार्थक केले. मी आता भगवंताकडे पोचल्यावर ताठ मानेने उभा राहू शकेन. कारण ‘जनसेवा हीच ईश्‍वरसेवा’ असल्यामुळे त्याचा लाडका होईन. म्हणूनच म्हणतात ना…
‘‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला.’’
हे उदाहरण झाले स्थूल रूपाचे. पण आणखी एक सूक्ष्म उदाहरण म्हणजे सूक्ष्म सुखाचे. या सुखाचा अनुभव सर्वांना येतो- जेव्हा त्यांना शांत झोप लागते. अशी झोप लागल्यावर मग त्या व्यक्तीला उठावे असे वाटतच नाही. याचे मूळ कारण म्हणजे त्यावेळी ती व्यक्ती अंतर्मनातील आंतरिक अशा आत्मिक सुखाचा अनुभव घेत असते. पण अनेकांना अशी शांत व दीर्घकाळ झोप लागतच नाही. याला कारणे अनेक आहेत. साधारणपणे जनमानसात एक समज आहे की झोप आठ तास घ्यावी पण एका म्हणीप्रमाणे-
* सहा तास पुरुषांना, सात तास महिलांना व आठ तास मूर्खांना झोप हवी.
आता यातील विनोद सोडून देऊ पण एक गोष्ट महत्त्वाची व ती म्हणजे माणूस किती तास झोपला यापेक्षा त्या झोपेचा गुणात्मक दर्जा महत्त्वाचा आहे. म्हणजे ती झोप शांत असली पाहिजे. जगातील अनेक महापुरुष तीन ते चार तासच झोप घेत असत. इतिहास सांगतो की महान योद्धा नेपोलियन युद्धाच्या वेळी घोड्याच्या पाठीवरच झोपत असे. याचे मुख्य कारण म्हणजे अशा व्यक्तींनी आपल्या अंतर्मनावर नियंत्रण मिळवलेलेच असते. दिवसभर कष्ट करून माणूस झोपला की त्याचे बाह्य मन लगेच झोपते. ते फक्त दहा टक्के आहे. पण ९० टक्के असलेले अंतर्मन शांत असेल याची शाश्‍वती नाही. कारण अंतर्मनातील अनेक समस्या, विकार, वासना त्यावेळी त्या व्यक्तीच्या नकळत उफाळून येऊ शकतात. त्यामुळे त्यांना शांत झोपेचा अनुभव येत नाही. हे असे का घडते हा विषयसुद्धा मोठा विस्तृत आहे.
एक गोष्ट सत्य आहे की जे नियमित योगसाधना – विविध मार्ग व पैलू – करतात त्यांना शांतझोप लागते. एवढेच नव्हे तर जागृतावस्थेत देखील या व्यक्ती अनेक समस्या पुढे असताना अत्यंत शांत राहू शकतात. यात अनेक व्यक्ती आहेत- संत, महापुरुष, भगवंताचे अवतार – मुख्यत्वे करून राम व कृष्ण. विविध वाईट प्रसंग समोर होते तरी राम शांत राहिले व संकटांचा सामना केला. आणि कृष्ण- कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीवरसुद्धा त्यांच्या मुखावरचे स्मित कायम होते.
प्रत्येक व्यक्तीला- ज्याला खरे सुख हवे – त्याने या विषयाचा थोडा थोडा पण सखोल अभ्यास करायला हवा. नाहीतर जन्मभर चुकीच्या मार्गाने जाऊन अज्ञानामुळे ते खर्‍या सुखाला मुकतील! एवढेच नव्हे तर जन्मोजन्मीही त्यांना सुखाचा सर्वतोपरी अनुभव येणार नाही. त्यामुळे खरे सुख कशात आहे… ते मिळवायचे कसे…ते नक्की काय आहे..? याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.
शास्त्रकार कस्तुरीमृगाची एक बोधात्मक गोष्ट सांगतात-
* हिमालयामध्ये अनेक तर्‍हेचे मृग आहेत. त्यात एक म्हणजे कस्तुरीमृग. एका विशिष्ट वेळी या मृगाच्या नाभीतून कस्तुरीचा सुंदर असा सुवास यायला लागतो. मृगाला तो फार आवडतो. पण त्याला माहीत नसते की हा सुवास आपल्या शरीराच्या भागातूनच येतो कारण बिचार्‍या प्राण्यांना तशी बुद्धी नसते. जीवनभर तो मृग त्या कस्तुरीच्या शोधात हिंडत असतो. ती काही त्याला सापडत नाही. तो अत्यंत बेचैन होतो. शेवटी मृत्युसमयी तो जमिनीवर कोसळतो. त्यावेळी त्याचे नाक नाभीजवळ जाते व त्याला दृष्टांत होतो की ज्या कस्तुरीच्या शोधात मी होतो ती तर माझ्याच जवळ होती. उगाच मी तिच्या शोधात वणवण फिरलो. पुष्कळ कष्ट घेतले. पण आता फार उशीर झालेला दिसतो.
मानवाचेदेखील असेच आहे. सुखाच्या शोधात तो जीवनभर सगळीकडे फिरतो. कदाचित त्याला बाह्यसुखाचा थोडा अनुभव येतोही. पण चिरकालीन आंतरिक सुख त्याला काही केल्या मिळत नाही. याचे कारण म्हणजे जे सुख आपल्या आत आहे ते त्याला बाहेर सापडणार कसे?
कस्तुरी मृगाची ही कथा यासाठी फारच बोधप्रद आहे. मानव तर भगवंताची उत्कृष्ट कलाकृती आहे. त्याला बुद्धीचे वरदान आहे. ती बुद्धी त्याने संपूर्णपणे भौतिक प्राप्तीसाठीच न वापरता त्याबरोबर अत्यावश्यक पैलूंसाठी वापरली तर त्याचे व विश्‍वाचेही कल्याण होईल. सुखशांतीची प्राप्ती तर होईलच. यासाठीच आवश्यक आहे – योगसाधना आणि स्वाध्याय!