– डॉ. सीताकांत घाणेकर
योगशास्त्राचा सखोल अभ्यास केला तर कळते की ‘ब्रह्मचर्य’ म्हणजे सर्व इंद्रिये व मनावर नियंत्रण करणे. हा विषय विस्ताराने समजण्यासाठी चिंतन व भारतीय संस्कृतीतील विविध उदाहरणे बघणे फार आवश्यक आहे. तेव्हा लक्षात येते की हा विषय किती गहन आहे ते.
योगेश्वर श्रीकृष्ण गीतेत अनेक अध्यायात इंद्रियनियंत्रणावर उदाहरणासहित सुंदर मार्गदर्शन करतात-
‘सांख्ययोग’ ह्या दुसर्या अध्यायात ते कासवाचे उदाहरण देतात…
* ‘कासव जसे आपले अवयव सर्व बाजूंनी आखडून घेतो, त्याप्रमाणे जेव्हा स्थितप्रज्ञ पुरुष आपली इंद्रिये त्यांच्या विषयांपासून आवरून घेतो तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होते’.- (गीता २-५८)
पुढे लगेच विद्वानाच्या मनाबद्दल विवेचन करतात….
* ‘प्रयत्न करणार्या विद्वानांचे मनही उच्छृंखल इंद्रिये बळेच ओढून नेतात. म्हणून बुद्धियोगाने युक्त होऊन ती सर्व इंद्रिये उत्तम प्रकारे आपल्या ताब्यात ठेवून माझ्याकडेच मन स्थिर करावे. ज्याची इंद्रिये वश म्हणजे स्वाधीन झाली त्याची बुद्धी स्थिर झाली’.- (गीता २-६१)
सामान्य मानवाचा सहज कल विषयांकडे असतो. त्यामुळे त्याला तिथे जास्त आकर्षण असते. पण अशा व्यक्तीची स्थिती काय होते ते देखील भगवंत लगेच सांगतात-
* ‘विषयांचे चिंतन करणार्या पुरुषाच्या ठिकाणी त्या विषयांबद्दल संग उत्पन्न होतो. त्या संगापासून काम (इच्छा, वासना) उत्पन्न होतो. कामापासून क्रोध, क्रोधापासून संमोह (अविवेक), संमोहापासून स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमापासून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशापासून सर्वस्वाचा नाश होतो’.- (गीता २-६२,६३)
प्रत्येक सूज्ञ व्यक्तीने विचार करायला हवा की, इंद्रिये व मनावर नियंत्रण नसल्यामुळे किती भयानक परिणाम होतात ते. आजच्या स्वैराचारात लोळणार्या जगाकडे बघितले की, लगेच लक्षात येईल की आपली वाटचाल विनाशाकडेच आहे.
श्रीकृष्ण उदाहरणे देण्यात फारच पटाईत आहेत. ते पुढे नाव व वारा ह्यांचे संयुक्तिक व उत्कृष्ट उदाहरण देतात.
* ‘इंद्रिये विषयात संचरत असता जे मन त्यांच्यामागे जाते ते, वारा ज्याप्रमाणे नाव ओढून घेतो त्याप्रमाणे पुरुषाची बुद्धी खेचून नेते (हरण करते).’- (गीता-२-६७)
तद्नंतर लगेच ते अर्जुनाला मानव हिताचा मार्ग दाखवतात.
* ‘हे महाबाहो, विषयांपासून ज्याची इंद्रिये सर्व प्रकारे आवरली जातात त्याचीच बुद्धी स्थिर झाली.’- (गीता २-६८)
तद्नंतर ह्या सर्व ज्ञानाचा परिणाम (मोक्षप्राप्ती) सांगतात….
* ‘हे पार्था, बाह्मी स्थिती हीच. ही स्थिती प्राप्त झाली असता प्राणी मोह पावत नाही. अंतकाळीही ही स्थिती प्राप्त झाली तरीही त्याला ब्रह्मनिर्वाण म्हणजे ब्रह्मात मिळून जाण्याचा मोक्ष मिळतो.’- (गीता २-७२)
महामुनी शुकांचे चरित्र अभ्यासले की, ही गोष्ट सहज लक्षात येते.
अर्जुन आपल्यासारखाच आहे- त्याला अनेक शंका-कुशंका. म्हणून गीतेतील तिसरा अध्याय-‘कर्मयोग’ ह्यामध्ये देखील पुढे ज्ञान देतात. कारण विषय, इंद्रिये व कर्म ह्यांचे परस्परातील नाते किती दृढ आहे हे त्यांना विश्वाला सांगायचे आहे.
* ‘इंद्रिये व त्यांचे विषय ह्यांच्यामधील प्रीति व द्वेष ही ठरलेली आहेत. त्यांच्या ताब्यात मनुष्याने जाऊ नये कारण ते त्याचे शत्रू होत.’- (गीता ३-३४)
मानवाच्या रजोगुणापासून काम उत्पन्न होतो त्यामुळे मानवाला सर्वदा विषयांमध्येच रमण्याची इच्छा होते. मग त्याचा ज्ञानावर परिणाम कसा होतो हे सत्य भगवंत सांगतात-
* ‘हे कौंतेय, कधीही तृप्त न होणारा अग्नि, ज्ञान्यांचा नित्य वैरी अशा ह्या कामाने ज्ञान झाकून टाकले आहे.’- (गीता ३-३९)
ह्यामुळे मानव नकळत मोहात पडतो हे समजण्यासाठी पुढील श्लोक-
* ‘इंद्रिये, मन आणि बुद्धी ही ह्यांचे अधिष्ठान (आश्रयस्थान) होत. ह्यांच्या आश्रयाने हा ज्ञान झाकून टाकतो आणि मनुष्याला मोहात पाडतो.’- (गीता.३-४०)
काम या विकाराबद्दल पुढे सांगतात-
* ‘हे भरतश्रेष्ठा, तू ह्या इंद्रियांचे प्रथम नियमन करून ज्ञान (शास्त्रीय ज्ञान) आणि विज्ञान (अनुभव ज्ञान) ह्यांचा नाशक जो हा काम त्याला मारून टाक.’- (गीता.३-४१)
तद्नंतर विविध घटकांचे तत्त्वज्ञानात काय स्थान आहे ह्याबद्दल भगवंत सूक्ष्म असे मौलिक ज्ञान देतात.
* ‘इंद्रिये ही (देहापेक्षा) सूक्ष्म म्हणून श्रेष्ठ आहेत असे म्हणतात. इंद्रियांपेक्षा मन सूक्ष्म (श्रेष्ठ), मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ, आणि बुद्धीपेक्षा आत्मा श्रेष्ठ’.- (गीता. ३-४२)
तिसर्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात कामरूपी शत्रूला कसे मारावे ह्याचे गूढ ज्ञान श्रीकृष्ण देतात.
* ‘हे पराक्रमी अर्जुना, ह्याप्रमाणे बुद्धीहून श्रेष्ठ असलेल्या आत्म्याला जाणून आपणच आपल्याला (बुद्धीने मनाला) आवरून धरून अजिंक्य अशा कामरूपी शत्रूला मारून टाक.’- (गीता. ३-४३)
असे आहे हे इंद्रिये, मन बुद्धी, आत्मा व ब्रह्मचर्य ह्यांचे सूक्ष्म ज्ञान. ह्या सर्व गोष्टी सामान्य व्यक्तींना समजाव्या म्हणून श्रीकृष्ण कमळाला जीवनाचा आदर्श मानतात. व तसे जीवन जगावे असे समजावतात.
* ‘जो आसक्तीरहित तसाच ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करतो तो पाण्यापासून अलिप्त राहणार्या कमळाप्रमाणे पापापासून अलिप्त राहतो.’
स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्रोत परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले सांगतात-
‘‘भारतीय तत्त्वज्ञान कमळाचे गुणगान करताना थकत नाही. अनासक्तीचा आदर्श म्हणजे कमळ. संसारात राहूनही संसाराच्या दोषांपासून मुक्त राहण्याची जीवन-दृष्टी कमळ देते. जलकमलवत् संसारात राहण्याची कला कमळाकडून शिकण्यासारखी आहे. करूनही न करण्याची किमया ही गीतेची अकर्मण्यावस्थेची पराकाष्ठा आहे’’.
(संस्कृती पूजन – प्रतीक दर्शन – कमळ)
पुराणात ह्या बद्दल एक छान बोधप्रद दंतकथा आहे-
एकदा गोपी दुर्वास ऋषींचे भोजन बनवायला जात होत्या. त्यावेळी यमुनेला पूर आला होता. त्यांनी ह्यातून मार्ग काढण्यासाठी श्रीकृष्णाला विनंती केली.
श्रीकृष्ण म्हणाले, ‘यमुनेच्या तटावर राहून म्हणा – ‘‘जर श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर हे माते, आम्हाला मार्ग दे’’ आणि काय आश्चर्य!! नदी दुभंगली व गोपींना मार्ग करून दिला.
दुर्वास ऋषींना आकंठ भोजन देऊन परत येताना गोपींना तीच समस्या होती. तेव्हा दुर्वासाने सांगितले नदीला सांगा, ‘‘दुर्वास पूर्णतः उपाशी असेल तर आम्हाला मार्ग दे’’. परत तेच आश्चर्य!! नदीने गोपींना जाण्यासाठी रस्ता करून दिला’.
शास्त्रीजी म्हणतात- क्रीडा करूनही क्रीडा न करणारा कृष्ण, जेवूनही न जेवलेेले दुर्वास आपल्याला संसारामध्ये जलकमलवत् राहण्याचे शिक्षण स्वतःच्या जीवनाद्वारे देतात.
श्रीकृष्ण आणि दुर्वास ऋषी समजण्यासाठी आपल्या संस्कृतीचा व तत्त्वज्ञानाचा योग्य अभ्यास आम्हाला करावा लागेल.
ब्रह्मचर्य ह्या यमाच्या संदर्भात श्रीकृष्णाच्या जीवनांतील एक घटना जाणण्यासारखी आहे. ती महाभारतातील अश्वमेध पर्वात आहे.
सर्व कौरवांचा नाश होतो. शेवटी कौरव सेनेचा सेनापती अश्वत्थामा असतो. सूडाच्या भावनेने तो द्रौपदी पुत्रांना रात्री शिबिरात जाऊन मारून टाकतो. एवढेच नव्हे तर उत्तरेच्या गर्भाचा नाश करण्यासाठी तो ब्रह्मास्त्राचा प्रहार करतो.
ही भयानक, दुःखद व त्याज्य घटना कळल्यावर सर्व दुःखी होतात. पण त्यावेळी श्रीकृष्ण सर्वांचे सांत्वन करतात व म्हणतात-
‘‘माझ्या जीवनात जर मी आजपर्यंत खोटे बोललो नसेन, युद्धभूमीतून केव्हाही पळून गेलो नसेन व ब्रह्मचर्य व्रताचे कटाक्षाने पालन केले असेल तर उत्तरेचा गर्भ जिवंत व्हावा’’.
आणि गर्भ जिवंत झाला.
आपण विचार करतो की, कृष्ण तर गृहस्थाश्रमी होते. त्याला रुक्मिणी व सत्यभामा अशा दोन पत्नी होत्या, मुले होती आणि हा ब्रह्मचारी कसा? ह्याचे कारण आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल व ब्रह्मचर्य ह्या शब्दाबद्दल आपले अगाध अज्ञान.
खरेच भारतीय तत्त्वज्ञान फार खोल, गुढ आहे. प्रत्येक शास्त्र, महाकाव्य ज्ञानाने परिपूर्ण भरलेले आहे. गरज आहे ती म्हणजे स्वतःच्या मातृभूमीबद्दल, संस्कृतीबद्दल प्रेम, अभ्यासू वृत्ती व जीवन विकासाची इच्छा.
म्हणून तर शास्त्रशुद्ध योगसाधना हवी.