Home बातम्या योगमार्ग- राजयोग (योगसाधना – १३१) (अस्तेय-१४)

योगमार्ग- राजयोग (योगसाधना – १३१) (अस्तेय-१४)

0

डॉ. सीताकांत घाणेकर

सृष्टिकर्त्याने सुंदर अशी सृष्टी सर्व प्राणिमात्रांसाठी तयार केली. मानव त्याची उत्कृष्ट कलाकृती आहे. ह्या मानवाला उत्कृष्ट बुद्धी दिली आहे. मानवाने ती बुद्धी सत्कारणी लावावी, सृष्टीचे संवर्धन करावे अशी त्याची अपेक्षा. शेवटी परमेश्‍वराने सृष्टीतील प्रत्येक घटक सर्वांच्याच उपयोगी पडावा म्हणूनच केला आहे. ह्या घटकांचा योग्य प्रमाणांत वापर करावा अशी इच्छा आहे. उगाचच स्वतःच्या मौजेसाठी ह्या घटकांचा दुरुपयोग करू नये. त्यांचा नाश करू नये.

सृष्टीत काही घटक असे आहेत की, ते विविध तर्‍हेने, विविध रूपाने सृष्टीला आपण परत करू शकतो. सुजाण माणसाने ते करावेत. म्हणजे परत एकदा सर्वांसाठी उपयोगी पडेल. तसे केले नाही तर ते चौर्य ठरेल. ह्या घटकात एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजेपाणी.

पाणी म्हणजेच जीवन. ज्यांना भरपूर पाणी मिळते त्यांना त्याची किंमत कळत नाही. पाण्याची किंमत कळण्यासाठी अशा ठिकाणी जायला लागेल जिथे पाणी आणण्यासाठी मैल मैल चालावे लागते. उदा. राजस्थान, कच्छ. भारतात व जगात असे अनेक प्रदेश आहेत जिथे पाण्याचा दुष्काळ आहे.

भगवंताची किमया म्हणजे आश्‍चर्यच, अवर्णनीय खार्‍या समुद्राचे पाणी सूर्य वाफेच्या रूपाने वर आकाशात खेचतो. त्याचे ढगात रूपांतर होते. तेच ढग विशिष्ट ऋतूत जगभर पाऊस म्हणून गोड पाण्याचा वर्षाव करतात. किती हृदयगम्य गोष्ट आहे ही?

हेच पाणी डोंगरातून झर्‍यांच्या रूपाने नाल्यात, नद्यांत मिसळते. काही पाणी जमिनीत जिरते. त्यामुळे विहीर, तळी ह्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध होते. सृष्टीचे हे चक्र सुंदररित्या बिनबोभाट करोडो वर्षे चालू आहे.

मानव, सर्व प्राणी, वृक्षवल्ली ह्या पाण्याचा स्वतःच्या जीवनासाठी उपयोग करतात. मानव तर धुण्यापिण्यासाठी, शेतीसाठी, विद्युत तयार करण्यासाठी, उद्योगधंद्यासाठीअशा विविध तर्‍हेने पाणी वापरतो. अनेक वेळा अनेकांना हे अमूल्य पाणी सांभाळून वापरावे ही कल्पनाच सूचत नाही. एवढेच नव्हे तर पाणी जिरवून जमिनीखालील पाण्याचा स्तर वाढवावा हा साधा विचार देखील अनेकांच्या मनात येत नाही. उलट पंप लावून भारतात अनेक गावात ट्यूबवेल बनवतात व जमिनीतील पाणी शोषून घेतात. त्यामुळे सुरुवातीला पाचसहा मीटरवर मिळणारे पाणी आता पुष्कळ खोल गेले तरी मिळत नाही. अनेकवेळा फक्त चिखलच येतो. अशी दयनीय व भयानक स्थिती पुष्कळ ठिकाणी आहे.

आता थोड्या प्रमाणात मानवाला ह्याबद्दल जाणीव झाली आहे. ह्याबद्दल संशय नाही. पण अपेक्षित तेवढ्या प्रमाणावर कृती दिसत नाही.

आपल्या पूर्वजांनी ह्या विषयावर पुष्कळ विचार केला होता म्हणून ते पाणी अडवत असत. पाणी जमिनीत जिरवत असत. अनेक ठिकाणी तळे बांधत असत. उदा. अनेक मंदिराच्या आसपास तळी आहेत. ह्यामुळे जमिनीखालच्या पाण्याचा स्तर राखला जात असे. आता देखील काही संस्था ह्या विषयात सक्रिय आहेत. परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले म्हणतात, की मानवाने जमिनीतून घेतलेले पाणी जमिनीला परत करायला हवे. आपली हीच संस्कृती आहे. ऋषींचा तसा आग्रह होता. ह्याबद्दल समजवताना शास्त्रीजी एक छान उदा. देतात. वासरू व गोचीड ह्यांचे. वासरू गायीचे म्हणजे आपल्या आईचे दूध पिते. रक्त शोषण करत नाही. ह्याउलट गोचीड गायीच्या आंचळावर बसतो व रक्त शोषण करतो. त्यामुळे गायीला अशक्तपणा येतो व त्रास होतो.

सुज्ञ माणसाने विचार करायला हवा की मी वासरू व्हायचे की, गोचीड व्हायचे. म्हणूनच शास्त्रीजींचा स्वाध्याय परिवार विविध योजना राबवतोशोषखड्डा (सांड पाणी जमिनीत परत जिरवण्यासाठी), विहीर रिचार्ज (विहिरीत पाणी जिरवण्याचे प्रकल्प), निर्मल नीर (पावसाचे पाणी साठवण्यासाठी तयार केलेली मोठी तळी). अशा प्रकल्पांमुळे भरपूर पाणी साचून राहते व आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याचा स्तर वाढतो. त्यामुळे विहिरीत देखील भरपूर पाणी मिळते.

इथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सर्व प्रकल्प कृतज्ञता व कृतीभक्ती म्हणून केले जातात. स्वाध्यायी व गावातील काही इतर लोक श्रमदान श्रमभक्ती म्हणून करतात. आपली कर्तृत्वशक्ती भगवंताच्या चरणी अर्पण करतात. ह्यात मुख्य हेतू हाच की, ज्या धरणीमातेकडून पाणी घेतले ते परत करावे.

त्यामुळे आपण चोर ठरत नाही. तसेच गावात सर्वांना मुबलक पाणी मिळते. शेतीला, गुरांना, लोकांना. शिवाय कृतज्ञता हा संस्कार आपोआप रुजला जातो.

खरे म्हणजे आपण प्रत्येकाने असा विचार करून सार्वजनिकरित्या पाणी जिरवायला हवे. पण बहुतेकजण असा विचार करत नाही. उलट आपण म्हणतो, मी पाणी कां जिरवावे. आमच्या गावात भरपूर पाणी आहे. पण असा विचार करणे बरोबर नाही. मला गरज असू दे किंवा नसू देकुणाचीही घेतलेली वस्तू परत करणे हे आपले कर्तव्य आहे. ही आपली भारतीय संस्कृती आहे. नपेक्षा ती चोरी ठरते.

आपण वरवर बघतो तेव्हा ही चोरी असू शकते हे पटत नाही. कारण आपण अनेकवेळा पाण्याचे पैसे भरतो. पण सूक्ष्म विचारांती त्यामागील तत्त्वज्ञान समजून घेतले तर पटेल की हीदेखील नकळत केलेली धरणीमातेची, नैसर्गिक संपत्तीची चोरीच आहे.

घेतलेली वस्तू परत केली नाही तर ती चोरी ठरतेह्याबद्दल विचार करताना माझ्या लक्षात येते ते म्हणजे आमच्या लहानपणी वडीलधार्‍या माणसांनी सांगितलेला एक मुद्दा. ते म्हणत की, पूजेसाठी आपण वापरलेली फुले निर्माल्य होतात. एकच दिवस त्यांनी भगवंताची शोभा वाढवलेली असते. फुलांमुळे आमचे मन प्रसन्न झालेले असते. त्यांचा सुवास आम्ही घेतलेला असतो. म्हणून कृतज्ञतेपोटी ती फुले अशीच रस्त्यावर फेकून देऊ नये. ती सुकलेली, कोमेजलेली फुले परत झाडांच्या मुळांत टाकावी. त्यामुळे खत होऊन परत एकदा चांगली फुले उगवतील.

खरेच किती सूक्ष्म भावनिक व आध्यात्मिक विचार आहे हा? एवढीशी कृती पण कितीतरी तत्त्वज्ञान इथे सामावलेले आहे.

भारतीय संस्कृती अशीच आहे. सखोल चिंतनाने प्रगत पावलेली उच्च संस्कृती.

मी देखील खोल चिंतन करतो तेव्हा लक्षात येतो तो आजकाल ज्वलंत समस्या बनलेलाघरोघरी असलेला ओला कचरा. हा कचरा भाज्या, फळे व इतर जेवण ह्यामुळे प्रत्येक घरात आपोआप तयार होतो. आम्ही तो तसाच रस्त्यावर फेकून देतो. तिथे तो कुजतो, सगळीकडे पसरतो. आजूबाजूला घाण होते व दुर्गंधी पसरते.

सुशिक्षित मानवाने असे वागणे शोभादायक नाही. प्रत्येकाने जर हा आपल्या घरचा ओला कचरा जमिनीत गाडला तर त्यामुळे खत तयार होते. जमिनीची सुपीकता वाढते. फुले व फळे ह्यांचे उत्पादन वाढते. ह्यासाठी अनेक तर्‍हेचे लहान मोठे प्रकल्प उपलब्ध आहेत. आपल्या फ्लॅटमध्ये वापरण्यासाठी कुंड्या वापरता येतात.

माझ्या घरी गेली वीस वर्षे मी माझ्या घरचा ओला कचरा अशा कुंड्यात ठेवून खत तयार करतो. ते खत माझ्या बागेतील झाडांना घालतो. फुलेफळेभाज्या मिळतातच पण त्याचबरोबर एक समाजोपयोगी कृती केल्याचे मानसिक समाधान देखील मिळते.

प्रत्येकाने अशा प्रकल्पांचा फायदा घेतला तर ते सर्वांच्या हिताचेच ठरेल.

असा आहे हा यमअस्तेय. विचार करतो तेवढा त्याचा विस्तार वाढतच जातो. अनेक पैलू लक्षात येतात. प्रत्येकाने चिंतन करण्यासारखा विषय आहे हा.