– डॉ. सीताकांत घाणेकर
जगांत अनेक समस्या आहेत ज्यांच्यामुळे मानवाची मनःशांती बिघडते. त्याला चिंता होते. त्यातील एक फार मोठी समस्या म्हणजे चोर्या. हल्ली तर चोरांचा सुळसुळाट फारच वाढला आहे. म्हणून भारतीय संस्कृतीत अस्तेय (अचौर्य) ह्या विषयावर विविध विचार, तत्त्वज्ञान, साहित्य उपलब्ध आहे. जगाच्या कल्याणासाठी ह्या महत्त्वाच्या विषयावर चिंतन हवे.
आपण शिजवलेले अन्न भगवंताला अर्पण न करता खाणारा देखील चोर आहे. भगवद्गीतेत असे सांगणारे श्रीकृष्ण स्वतःच एक फार मोठे चोर होते, असे शास्त्रकार मस्करीने म्हणतात. असे विचित्र विधान त्यांच्यावरील प्रेमामुळे व भक्तिभावामुळेच केले जाते हे लक्षात असायला हवे.
लहानपणात तर बालकृष्ण माखन-चोर म्हणूनच प्रसिद्ध होता. यशोदेला त्याच्या ह्या उपद्व्यापाबद्दल गोकुळांतील स्त्रियांकडून वारंवार तक्रारी यायच्या. आपल्या सवंगड्यांबरोबर हळूच स्वतःच्या व इतरांच्या घरी जाऊन उंचावर टांगलेल्या मडक्यांमधून हा चोर लोणी चोरीत असे. पण मुख्य म्हणजे आजच्या चोरांसारखा स्वतःच सर्व लोणी न खाता सर्व मित्रांनादेखील वाटत असे. त्याच्याबद्दल विविध सुंदर सुंदर गोष्टी आम्ही बालपणी वडीलधार्यांकडून ऐकत असू. पुस्तकांतून देखील वाचत असू.
कृष्णाच्या चोर्यांचा अतिरेक झाला म्हणून एक दिवस यशोदामैया फारच रागावली. त्याला तिने उखळाला बांधले. पण तो बालक अगदी निरागसपणे मातेला सांगत होता की, ‘मी काही लोणी चोरले नाही’. यशोदेने तोंड उघडायला सांगितले तेव्हा म्हणे, तिला सर्व ब्रह्मांडाचे दर्शन घडले. त्यावेळी तिला ज्ञान झाले- हा देवकीपुत्र कोण आहे ते. आम्हां लहान मुलांना देखील त्याचे फार कौतुक वाटायचे.
आणखी एका गोष्टीत तर यशोदा त्याला फार बोलते. तेव्हा तो सहज म्हणतो- ‘आई मी तर पहाटे उठून गायींना चरण्यासाठी जंगलात घेऊन गेलो आणि आताच सर्व गोपांबरोबर तिन्हीसांजा झाल्या तेव्हा घरी परतलो. मी लोणी केव्हा चोरणार? ह्या स्त्रिया उगाच माझ्याबद्दल तुझ्याकडे तक्रारी करतात’.
तरीपण यशोदा काहींसुद्धा ऐकायला तयार होत नाही. तेव्हा तो म्हणतो- ‘आई, आता मला कळले की, तू माझ्याकडे असे कां वागतेस ते. कारण मी तुझा मुलगा नाही, मग तुझे माझ्यावर प्रेम कसे असणार?’
असे म्हटल्याबरोबर यशोदेच्या डोळ्यात अश्रू येतात. तिला वाटते की, चौकशी न करता इतरांवर विश्वास ठेवून मी ह्या छोट्या बालकावर उगाच अन्याय करते. हा एवढासा पोर खोटे कशाला बोलेल? यशोदा लगेच त्याला मिठीत घेऊन म्हणते- ‘बाळा, मला माफ कर. मी उगाच तुझ्यावर लोणी चोरल्याचा आरोप केला. मला असले पाप करायचे नाही’.
यशोदा माता रडते हे पाहून खट्याळ कान्हा लगेच हसायला लागतोे. आईला कवटाळतो व म्हणतो, ‘माते, ह्या गोपी सांगतात ते अगदी सत्य आहे. मीच लोणी चोरले होते. मी तुझ्याकडे मस्करीने खोटे बोललो. मला शिक्षा कर’.
अशा कृष्णाच्या ह्या बालपणीच्या लीला आम्हाला फार आवडायच्या. त्याच्याबद्दल राग येत नव्हता. कौतुक मात्र वाटत होते. यशोदामातेबरोबर इतर गोकुळवासी देखील कृष्णावर हृदयापासून प्रेम करत होते. सर्वांचा तो लाडका हृदयसम्राट होता.
आज हजारो वर्षांनंतर देखील जन्माष्टमीच्या नंतर एक फार मोठा सोहळा सर्व भारतभर मजेने साजरा केला जातो- दहीहंडी-गोपालकाला.
श्रीकृष्णाचे नंतरचे तरुणपणातील जीवन बघितले तर आपल्या सवंगड्यांबरोबर दुधाच्या मडक्या दुसर्या गावात नेताना फोडताना दिसतो. वरवर बघितले तर ही घटना घृणास्पद वाटते. निव्वळ दरोडाच आहे असे वाटते. मनांत सहज विचार येतो, की राक्षसांना मारणारा हा कृष्ण इतका दुष्ट कसा?
गोकुळवासी आपले पोट भरण्यासाठी दूध जवळच्या गावात नेत असत. मग त्यांना तो सतावतो कां?
असा विचार आमच्या मनात येणे साहजिकच आहे. कारण ह्या तत्त्वज्ञान क्षेत्रात आपला अभ्यास नाही. आपली बुद्धी देखील अल्प आहे.
शास्त्रकार म्हणतात, की ह्या अशा वागण्यामागे श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान होते. गोकुळात भरपूर दूध तयार होत असे. पण त्या दुधाला तेवढी किंमत तिथे मिळत नसे. म्हणून शेजारच्या संपन्न राज्यात दूध विकले जात होते. तिथे दुधाला जास्त किंमत मिळत असे. हीच गोष्ट कृष्णाला पटत नव्हती. त्याचे मत होते की, दूध हा अत्यंत पौष्टिक आहार आहे. त्यावर प्रथम हक्क गाईच्या वासराचा आहे. त्या वासराला सर्वारंभी आवश्यक तेवढे भरपूर दूध पाजावे. त्यानंतर गोकुळातील गरीब मुले तसेच तरुण व इतरांना दूध द्यावे. त्यांच्या गरजा भागल्यानंतर जर दूध राहिले तर जास्त पैसे घेऊन बाजूच्या गावांत विकू शकतो.
सूक्ष्म दृष्टीने बघितले तर ह्या विचारांमागे श्रीकृष्णाचे सखोल चिंतन दिसते. पण आपण कुणी असा विचारच करत नाही. श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यासच करत नाही. म्हणून त्याच्यावर मिथ्या आरोप करतो.
आज देखील आपल्या भारतात अशीच परिस्थिती आहे. आपली सामान्य जनता उपाशी आहे. लाखो टन धान्य गोदामात ठेवले आहे. तिथे उंदीर ह्या वस्तू खात आहेत. तसेच अनेक वस्तू शेजारच्या गावात जास्त भाव मिळतो म्हणून तिथे विकल्या जातात. किंवा परकीय चलन मिळते म्हणून बाहेरच्या देशात निर्यात केल्या जातात.
आपल्या निसर्गाने नटलेल्या गोव्यात आंबे, काजू, फणस, अननस… असली सुंदर फळे भरपूर पिकतात. तसेच नद्या-समुद्राने वेढलेल्या गोव्यात भरपूर मासळी मिळते पण जास्त पैसे मिळतात म्हणून पंचतारांकित हॉटेलमध्ये बाहेरच्या यात्रींना किंवा आपल्यातीलच श्रीमंतांना भरमसाट किमतीत ह्या वस्तू विकल्या जातात. तसेच परदेशी चलन मिळते म्हणून ह्या सर्व वस्तू व्यवस्थित प्रोसेसिंग व पॅकेजिंग करून निर्यात केल्या जातात.
योग्य चिंतन केले की, लक्षात येईल की, आपल्या गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना ह्या जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित करून जास्त नफा कमवण्यासाठी त्यांची अशी विक्री करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे चोरीच आहे. म्हणून एक म्हण देखील प्रचलित झाली, ‘जिथे पीक तिथे भीक’.
श्रीकृष्णासारखा क्रांतिकारी विचार कुणालाही येत नाही म्हणूनच अस्तेय ह्या विषयावर विचार करताना महान तत्त्ववेत्ता पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण ह्यांचे तत्त्वज्ञान शिकायला हवे. सध्याच्या परिस्थितीत देशाच्या हितासाठी ह्या यमावर व्यवस्थित अभ्यास हवा. ही गोष्ट सर्वांच्या व देशाच्या हिताचीच आहे. सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.