कॉंग्रेस ही बुडती नौका असल्याची टीका
योग गुरू बाबा रामदेव यांनी येत्या दोन ऑक्टोबरपासून कॉंग्रेसविरुद्ध पुन्हा आंदोलन उभारण्याची घोषणा काल केली. हे आंदोलन लोकसभा निवडणुकीपर्यंत चालेल असा इशारा त्यांनी दिला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणूक काळातही हे आंदोलन चालेल असे ते म्हणाले. कॉंग्रेस ही बुडती नौका असल्याची टीका त्यांनी केली.
कॉंग्रेस पक्ष आपल्याला लक्ष्य करू पाहात असून त्याची पर्वा न करता आपण सत्ता आणि व्यवस्था परिवर्तनासाठी कार्यरत राहू असा इशाराही रामदेव यांनी दिला. ‘‘लोकच कॉंग्रेसचा चोख प्रत्युत्तर देतील. ते स्वतःच अस्तंगत होण्याच्या वाटेवर आहेत, अशावेळी आमचे काय बिघडवू शकतील?’’असा सवाल रामदेव यांनी केला.
आपले आंदोलन कुठून सुरू होईल त्याचा तपशील रामदेव यांनी दिला नाही, परंतु बहुधा हिमाचल प्रदेशातून हे आंदोलन सुरू करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका हे नजीकचे लक्ष्य असल्याचे ते म्हणाले. टीम अण्णाशी आपले बिनसले आहे का या प्रश्नावर आपण कोणाच्या स्पर्धेत नसून त्यांना आपला पाठिंबा देणार की नाही यावर आपण भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अण्णा हजारे हे एका सर्वेक्षणात रामदेव यांच्यापेक्षा लोकप्रिय असल्याचे आढळून आले आहे त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता हे सर्वेक्षण विदेशी संस्थेने केल्याचे ते म्हणाले. ‘‘मी आलो तेव्हा लोक आले आणि मी गेल्यावर लोक गेले’’ असे जंतरमंतरवरील अण्णांच्या आंदोलनासंदर्भात माध्यमेच म्हणत होती याची आठवण बाबा रामदेव यांनी करून दिली.
कोळसा घोटाळ्यातील महालेखापाल अहवालात भाजपाची राजवट असलेल्या काही राज्यांचाही उल्लेख आलेला असताना आपण भाजपाविरुद्ध आवाज का उठवत नाही या प्रश्नावर ते म्हणाले की अनेक पक्ष यामध्ये गुंतलेले आहेत, पण कॉंग्रेसने सर्वांचे नेतृत्व केले आहे. घोटाळ्यांत त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाल्याची टीका रामदेव यांनी केली. कोळसा घोटाळ्याची खरी रक्कम १.८६ लाख कोटींहून बरीच अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. सरकार आपल्या छळणुकीसाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असून आपले सहकारी बाळकृष्ण यांनाही लक्ष्य केले जात असल्याचे ते म्हणाले. आपल्याला व आपल्या चळवळीला बदनाम करण्यासाठी काही शक्ती पैसे खर्च करीत आहेत असेही रामदेव म्हणाले. माझ्या चालकालादेखील मला बदनाम करण्यास सांगण्यात आले. काही बातम्या त्यांनी पसरवल्या, असे ते पुढे म्हणाले.