येस बँक खातेदारांना महिन्याला ५० हजारच काढता येणार

0
207

सातत्याने आर्थिक स्थिती खालावत असल्याचे कारण देत भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) खासगी क्षेत्रातील येस बँकवर गुरुवारी निर्बंध लागू केले. बँकेला भांडवल उभे करण्यात अपयश आल्याने, बँकेच्या प्रशासनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या निर्बंधांमुळे आता येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. दरम्यान, निर्बंधांंमुळे ग्राहकांमध्ये घबराट असून, काही ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी मध्यरात्रीच एटीएममध्ये धाव घेतली.

खातेदारांचे पैसे सुरक्षित;
केंद्र सरकारची ग्वाही
डबघाईला गेलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध आणले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन येस बँकेच्या खातेदारांना दिलासा देताना सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही दिली. अशातच रिझर्व्ह बँकेनेहे येस बँकेच्या फेररचनेची घोषणा केली. नवी योजना येस बँक आणि एसबीआयला पाठवली आहे. त्यावर त्यांचे मत मागवले आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. बँकेच्या कर्मचार्‍यांची नोकरी आणि पगार एक वर्षापर्यंत सुरक्षित असेल. ठेवीदार आणि कर्जदारांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे सीतारामन यांनी सांगितले. येस बँकेच्या कारभारावर २०१७ पासून रिझर्व्ह बँकेने नजर ठेवली होती.