येळ्‌ळूरमध्ये मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांकडून लाठीमार

0
281
कर्नाटक पोलिसांनी कारवाई सुरू केल्यानंतरही यळळूरमधील मराठी भाषकांनी न डगमगता पोलिसी कारवाईचा सामना केला.

घरात घुसून महिलांनाही मारहाण
येळ्‌ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढयाचे प्रतीक असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्‌ळूर’ हा फलक कानडी भाषकांनी उद्ध्वस्त केल्यानंतर तो तेथील मराठी भाषकांनी पुन्हा उभारल्यामुळे काल कर्नाटक पोलिसांनी तो फलक तोडण्याबरोबरच मराठी भाषकांना घरात घुसून मारहाण केल्यामुळे या भागातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
विरोध करणार्‍या मराठी भाषकांवर पोलिसांनी जोरदार लाठीहल्ला केला. महिलांनाही बेदम मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण येळ्‌ळूर गावात प्रचंड तणाव आहे. संपूर्ण मराठी लोकवस्तीचे वेळ्‌ळूर गाव हे अधिकृतरीत्या कर्नाटकात येते. येळ्ळूर गावच्या वेशीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमालढ्याचे प्रतीक असलेला ‘महाराष्ट्र राज्य येळ्‌ळूर’ हा फलक गेल्या अनेक वर्षांपासून होता. शुक्रवारी अचानक कानडी भाषकांनी पोलीस बंदोबस्तात हा फलक तोडला. त्याला तोडीस तोड प्रत्युत्तर देत हजारो मराठीजनांनी तो फलक पुन्हा उभा केला.
हा फलक पुन्हा उभा राहिल्याचे कळताच रविवारी सकाळी पोलिसांचा प्रचंड फौजफाटा येळ्ळूरमध्ये धडकला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेला हा फलक उघडून टाकला. या कारवाईला विरोध करणार्‍या गावकर्‍यांवर पोलिसांनी बेधडक लाठीहल्ला केला. कानडी पोलिसांच्या अत्याचारातून महिलाही सुटल्या नाहीत. पोलिसांनी घरात घुसून आंदोलकांना मारहाण केली. कर्नाटक सरकारच्या या अत्याचाराविरोधात सीमा भागातील मराठी भाषिकांमध्ये प्रचंड संताप खदखदत आहे. मराठी मनावर फिरलेल्या कानडी वरवंट्यानंतर येळ्ळूर गावात आज रात्रीपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. यामुळे या भागाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.