मुख्यमंत्र्यांकडून घोषणा; मेरशीत सहकार सेवा भवनच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन
राज्यातील फ्लॅट मालकांना दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या मालकी हक्काशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी येत्या 15 दिवसांत ‘माझा फ्लॅट योजना’ सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केली. मेरशी येथे सहकार सेवा भवनच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यात सुमारे 30 ते 40 हजार फ्लॅट्सची खरेदी अनेक वर्षांपूर्वी होऊनही काही कारणांमुळे ते अधिकृतपणे खरेदीदारांच्या नावावर हस्तांतरित झालेले नाहीत. अनेक फ्लॅटधारकांकडे केवळ शेअर प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्रे किंवा अपूर्ण कागदपत्रे आहेत. माझे घर योजनेच्या धर्तीवर तयार करण्यात आलेली ‘माझा फ्लॅट योजना’ कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या हजारो फ्लॅट नियमित करण्यास मदत करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, मूळ जमीनमालकाच्या संमतीशिवाय पुनर्विकास, दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याचे अधिकार गृहनिर्माण सोसायट्यांना देण्याची तरतूदही योजनेत आहे. बिल्डरांनी राज्य सोडले असेल, मूळ जमीनमालक सहकार्य करण्यास नकार देत असतील किंवा इमारती अनेक दशके जुन्या असूनही जमीन अजूनही मूळ मालकाच्या नावावर असेल, अशा प्रकरणांचे निराकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार, गृहनिर्माण सोसायटीच्या बहुसंख्य सदस्यांनी घेतलेल्या निर्णयांना कायदेशीर मान्यताही दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले
गोव्यात सुमारे 5,600 नोंदणीकृत सहकारी संस्था आहेत, त्यामध्ये साधारणपणे 3 हजार गृहनिर्माण सहकारी संस्था, 1,450 बचत गट, 189 दुग्धोत्पादन सहकारी संस्था, 164 सेवा सहकारी संस्था आणि 90 ग्राहक सहकारी संस्थांचा समावेश आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात कृषी, मत्स्यव्यवसाय, औद्योगिक आणि उत्पादक क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अनेक सहकारी संस्थाही आहेत. राज्यातील लोकांचे जीवनमान सुधारण्यात आणि तळागाळातील विकासाला बळकटी देण्यात सहकारी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, जिल्हा पंचायत सदस्य गौरी कामत, सहकार निबंधक आशुतोष आपटे व इतरांची उपस्थिती होती.

