Home बातम्या येत्या ११ सप्टेंबरची अमेरिकेला पुन्हा भीती

येत्या ११ सप्टेंबरची अमेरिकेला पुन्हा भीती

0

अकरा सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत विश्व व्यापार केंद्रावर झालेल्या हल्ल्याला येत्या ११ रोजी दहा वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत पुन्हा एकवार दहशतवादी हल्ल्याची भीती असल्याने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

वॉशिंग्टन व न्यूयॉर्क शहरांना हल्ल्यांची भीती असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिलेला आहे. दोघा तिघा संशयितांचा शोध सध्या सुरू आहे. अफगाणिस्तानच्या एका व्यक्तीसंदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने सध्या त्याचा शोध घेतला जात आहे. ओबामा यांनी गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या अनुषंगाने दहशतवादविरोधी यंत्रणांना अतिदक्षता बाळगण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने काल दिली.

१९ दहशतवाद्यांनी चार विमानांच्या साह्याने अमेरिकेवर चढवलेल्या त्या सर्वांत मोठ्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाली असली तरी या कटाचे अनेक सूत्रधार अद्याप मोकळे आहेत. कटाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनसह काहींचा शोध घेऊन अमेरिकेने त्यांचा खात्मा केला असला, तरी अनेक आरोपी अद्याप अमेरिकेला सापडलेले नाहीत व त्यांच्यावर खटलाही उभा राहू शकलेला नाही. अयमान अल जवाहिरी या लादेनच्या सहकार्‍याजवळ सध्या अल कायदाची सूत्रे आहेत. त्याच्यावर अकरा सप्टेंबरच्या हल्ल्याचा आरोप ठेवला गेलेला नसला तरी ९८ साली केनिया व टांझानियातील अमेरिकी दूतावासांतील बॉम्बस्फोटांप्रकरणी आरोपपत्र ठेवले गेले आहे. अल जवाहिरी अद्याप फरार असून एफबीआयने त्याच्यावर पंचवीस दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले आहे.

अकरा सप्टेंबरच्या कटाची कल्पना ज्याने मांडली तो खालीद शेख महंमद याच्याविरुद्धचा खटला सध्या सुरू आहे. त्याला २००३ मध्ये पाकिस्तानात पकडले गेले. सध्या तो क्युबातील कुख्यात ग्वान्टानामो बे तुरुंगात आहे. अनेक आरोपी अद्याप विदेशांत दडून आहेत. त्यांचा थांगपत्ता अमेरिकेला आजतागायत लागलेला नाही.