गोवा प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष वालंका आलेमांव यांना पक्षाने प्रदेशाध्यक्षपदावरून निलंबित केले आहे. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राजीव साठव यांनी त्यांना तसा आदेश पाठवला आहे.
गत लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांसाठी प्रचार केला नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत वालंका यांचे वडील चर्चिल आलेमांव यांनी तृणमूल कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्यासाठी प्रचार न करता वालंका यांनी वडलांचा प्रचार केल्याचा आरोप होता. याप्रकरणी कॉंग्रेस शिस्तपालन समितीनेही त्यांना पाचारण केले होते. दरम्यान, त्यांना पद सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यांनी तसे न केल्याने निलंबित केल्याचे कळते.
काही दिवसांपूर्वी वालंका यांना प्रदेशाध्यक्षपदापासून अलिप्त ठेऊन हंगामी कार्यभार झेवियर ङ्गियालो यांच्याकडे देण्यात आला होता.

