Home बातम्या युवराज येत आहेत…

युवराज येत आहेत…

0

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची छबी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या या कार्यकाळात कधी नव्हे एवढी काळवंडली असल्याने भावी पंतप्रधान कोण या प्रश्नाने राजकीय वर्तुळात उचल खाल्लेली दिसते. कॉंग्रेसचे वाचाळ प्रवक्ते द्गिविजयसिंह यांनी त्याचे उत्तर देऊनही टाकले. ‘राहुल गांधी यांनी मुख्य प्रवाहात यावेअशी जोरदार मागणी त्यांनी नुकतीच केली. राहुल यांनी भाग्यविधातेबनावे अशी आरतीही त्यांनी ओवाळली. राहुल यांना खरोखरच कॉंग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या हालचालींनी दिल्लीत वेग घेतला आहे अशा बातम्या थडकत आहेत. पक्षाची आणि सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी राहुल हा हुकुमी एक्का ठरेल असे राजकीय निरीक्षकांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आपल्या आईकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यास राजी करण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळात देऊ केलेले स्थान नाकारून राहुल यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीकडे स्वतःचे लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्याकडे जी युवक कॉंग्रेस आणि एनएसयूआयची जबाबदारी पक्षाने सोपवली, ती व्यवस्थित पेलत त्यांनी युवक कॉंग्रेसच्या निवडणूक प्रक्रियेत शिस्त आणि पारदर्शकता आणून वाहवा मिळवली. त्यामुळे आता त्यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवायला काही हरकत नाही असे ढोल पिटायला बडव्यांनी सुरूवात केली आहे.

राहुल यांची पावले आजवर हुकमीपणाने पडताना दिसत आहेत. आईकडे सूत्रे असताना त्यांनी खालच्या स्तरातील कार्यकर्त्यांमध्ये स्वतःचा संपर्क वाढवला आणि पक्षावरील स्वतःची पकडही आपसूक घट्ट केली आहे. आता ते पक्षात उपरे राहिलेले नाहीत उलट खालून वर येणारे नेते ठरल्याने त्यांच्यावरील भावी जबाबदार्‍यांना अंतर्गत विरोध होण्याची शक्यताच राहिलेली नाही. स्वतःला आम आदमीशी जोडण्याची राहुल यांची कायम धडपड राहिली आहे. कधी त्याला नाटकबाजीचा वास आला तरीदेखील सातत्याने तळागाळातील जनतेमध्ये स्वतःची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी ते धडपडताना दिसतात. कोठे काही वादाला तोंड फुटले, गंभीर प्रश्न उपस्थित झाला की समेट घडवून आणण्यासाठी आणि वादळ शांत करण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानासारखे ते धावून जातात. मग तो एखाद्या प्रकल्पाच्या विस्थापितांचा प्रश्न असो वा अण्णा हजारेंचे आंदोलन सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळण्याचा विषय असो. राहुल गांधी चतुराईने तेथे टपकतात आणि आपण जनतेचे प्रतिनिधित्व करीत आहोत असा आव आणीत सफल मध्यस्थी करतात. विद्यमान सरकारचे गाडे ज्या दोन चाकांवर चालते आहे, ते म्हणजे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची विकासाभिमूख नीती आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सामाजिक कल्याणकारी योजना, त्या दोन्ही चाकांना जोडून सरकारची रिक्षा हाकणारे समोरचे छोटे चाक म्हणजे राहुल गांधी ठरले आहेत. सरकार अडचणीत येताना दिसले, एखाद्या धोरणाला वा भूमिकेला जनताविरोधी रंग चढताना दिसला की त्यासंदर्भात जनतेची कड घेणारी टिप्पणी करून तणाव निवळण्याचे काम राहुल करीत असतात. त्यामुळे दोन गोष्टी आपोआप साध्य होतात. एक तर तणाव निवळतो आणि राहुल यांची लोकप्रियताही वाढते. आता त्यांच्या या जनताभिमुख प्रतिमेचा फायदा पक्षाला मिळवून देण्यासाठी सोनिया गांधींच्या दुर्धर आजारपणाच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना पक्षाच्या केंद्रस्थानी आणण्याच्या हालचालींना वेग आला तर नवल नाही. उत्तर प्रदेशसह काही राज्यांतील निवडणुका व्हायच्या आहेत. त्या जिंकणे पक्षासाठी आवश्यक आहे. पुढच्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधानपदासाठी नवे नाव पुढे करणे आवश्यक ठरणार आहे. राहुल यांच्याबाबतीत त्यासाठी जसे एकमत पक्षात होऊ शकते तसे केवळ सोनिया वगळता अन्य कोणत्याही नेत्याच्या बाबतीत संभवत नाही. सोनियांच्या विदेशी असण्याचा मुद्दा जसा अडथळा ठरला, तसा राहुल यांच्या बाबतीत बिल्कूल संभवत नाही. त्यामुळे राहुल यांना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी आणण्याच्या या प्रयत्नांना येणार्‍या काही महिन्यांत वेग आला तर आश्चर्य वाटू नये. राहुलबाबा आता मोठे झाले आहेत. परिपक्व झाले आहेत की नाही हा भाग वेगळा, परंतु त्यांची पक्षाला नितांत गरज आहे असे मात्र दिसते.