युरी आलेमाव, क्रूझ सिल्वा यांची जबानी नोंदवली

0
6

मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्याचे प्रकरण; नाईक, तेलेकरांचीही चौकशी

कलम 39 अ विरोधात आमदार वीरेश बोरकर यांनी छेडलेल्या आंदोलनादरम्यान, दोनापावल येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या निवासस्थानाला घेराव घातल्या प्रकरणात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार क्रूझ सिल्वा, आपचे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि उपाध्यक्ष संदेश तेलेकर यांची काल पणजी पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली.
सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी नगरनियोजन खात्याच्या कलम 39 अ च्या विरोधात पणजीतील आझाद मैदानावर आयोजित धरणे आंदोलन छेडले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी जनआंदोलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी संतप्त नागरिकांनी दोनापावल येथे नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी निवासस्थानावर मोर्चा काढून त्या ठिकाणी ठिय्या मांडला होता.

मंत्री राणे यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलन प्रकरणात पणजी पोलिसांनी विरोधी पक्षांतील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पणजी पोलिसांनी या प्रकरणात आंदोलनात सहभागी मनोज परब आणि अन्य काही नेत्यांच्या जबान्या नोंदवून घेतल्या आहेत.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांना चौकशीसाठी सोमवारी संध्याकाळी 4 वाजता पणजी पोलीस स्थानकात हजर राहण्यासाठी त्याच दिवशी सकाळी नोटीस पाठविण्यात आली होती. काल युरी आलेमाव यांची पंधरा-वीस मिनिटांमध्ये जबानी नोंदवून घेतली. आमदार क्रूझ सिल्वा, वाल्मिकी नाईक व संदेश तेलेकर यांचीही जबानी नोंदवून घेण्यात आली. यावेळी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर आणि आमदार एल्टन डिकॉस्टा यांची उपस्थिती होती.

भाजप सरकार विरोधी पक्षांतील नेत्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करीत आहेत. आपण आणि विरोधी पक्षातील नेते भाजपच्या दडपशाहीला घाबरणार नाही, असे युरी आलेमाव यांनी पोलीस चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार वीरेश बोरकर यांना 39 अ च्या विरोधात जनआंदोलन करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार नाही, ग्वाही दिली होती. तथापि, मुख्यमंत्र्यांनी आपल्या आश्वासनाचे पालन केलेले नाही. कलम 39 अच्या विरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे, असे आलेमाव म्हणाले.
राज्यातील जमीन, शेती आणि पर्यावरण नष्ट करण्याच्या प्रकारांना विरोध केला जात असल्याने भाजप सरकार विरोधी आमदारांना लक्ष्य करीत आहे, असा आरोप आमदार क्रूझ सिल्वा यांनी केला.