Home Featured युनिटी मॉल प्रकल्पावर सरकार ठाम

युनिटी मॉल प्रकल्पावर सरकार ठाम

0

>> आतापर्यंत 25 कोटींचा खर्च
>> केंद्र सरकारचा प्रकल्प आता रद्द करणे अशक्य
>> बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
>> ग्रामस्थही मागण्यांवर कायम
>> बैठकीत कोणताही तोडगा नाही
>> प्रशासन स्तंभ रद्दविषयी विचार करू : मुख्यमंत्री

चिंबल येथील तोयार तळ्याजवळील नियोजित युनिटी मॉलच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल आयोजित केलेल्या खास बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. चिंबलचे ग्रामस्थ युनिटी मॉल रद्द करावा, या मागणीवर ठाम राहिले. दुसऱ्या बाजूला, चिंबल येथील नियोजित प्रशासन स्तंभ प्रकल्प रद्द करण्याविषयी विचार केला जाऊ शकतो; पण युनिटी मॉल प्रकल्पावर आत्तापर्यंत 25 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने तो प्रकल्प रद्द केला जाऊ शकत नाही असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती चिंबल जैवविविधता ग्राम समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली. तसेच, तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्र विषयाचा येत्या शुक्रवारपर्यंत नव्याने अभ्यास करून युनिटी मॉलच्या प्रश्नावर नागरिकांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याचेही त्यांनी सांगितले.

चिंबल येथील तोयार तळ्याजवळील नियोजित युनिटी मॉल प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांचे मागील 25 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 15 जानेवारीला गोवा विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चिंबल ग्रामस्थांचा मोर्चा मेरशी येथील जंक्शनवर पोलिसांनी अडविला होता. या मोर्चात सहभागी नागरिकांनी दिवसभर निदर्शने करून युनिटी मॉल प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलन करणाऱ्या नागरिकांची त्या दिवशी रात्री उशिरा भेट घेऊन युनिटी मॉल प्रकल्पावर मंगळवारपर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानुसार काल सकाळी आल्तिनो-पणजी येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी युनिटी मॉलच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामस्थांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित युनिटी मॉलच्या विषयावर चर्चा करून नागरिकांसमोर सरकारची भूमिका मांडली. युनिटी मॉल प्रकल्पावर आत्तापर्यंत सुमारे 25 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याने हा प्रकल्प रद्द केला जाऊ शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या प्रतिनिधींनी युनिटी मॉल रद्द करण्याची मागणी लावून धरली. मुख्यमंत्र्यांनी तोयार तळ्याच्या परिसराचे एनआयओ आणि इतर सरकारी खात्याकडून येत्या शुक्रवारपर्यंत नव्याने सर्वेक्षण करून नागरिकांना विश्वासात घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, असेही गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

चिंबल ग्रामस्थाशी युनिटी मॉलच्या विषयावर चर्चा करून आंदोलनाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असे गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सांताक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत युनिटी मॉलच्या विषयावर चर्चा केली.

युनिटी मॉल तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर : मुख्यमंत्री
युनिटी मॉल हा तोयार तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत नाही. हा प्रकल्प तळ्याच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्यास रद्द केला जाईल. चिंबलच्या नागरिकांनी युनिटी मॉलच्या विरोधातील आंदोलन मागे घ्यावे, चर्चेच्या माध्यमातून युनिटी मॉलच्या प्रश्नावर तोडगा काढला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

2.62 लाख चौरस मीटर जागा अधिसूचित करणार
चिंबल येथील तोयार तळ्याच्याजवळील सुमारे 2.62 लाख चौरस मीटर जागा अधिसूचित केली जाणार आहे. युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. युनिटी मॉल स्ट्रीलच्या स्ट्रक्चरने बांधला जात आहे. त्यामुळे या प्रकल्पावर आत्तापर्यंत 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे हा प्रकल्प आता रद्द केला जाऊ शकत नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.