युनिटी मॉलविरोधात तीव्र आंदोलनाचा निर्णय

0
14

स्थानिक एकवटले; आज सरपंच, सचिवांना घेराव घालणार

चिंबल येथील पर्यावरणीयदृष्ट्‌‍या संवेदनशील क्षेत्रात युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ या सरकारी प्रकल्पांविरुद्ध स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय काल जाहीर केला. काल युनिटी मॉलचे काम सुरू असलेल्या ठिकाणी स्थानिकांनी आंदोलन छेडले होते. चिंबल ग्रामपंचायतीवर शुक्रवार दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी मोर्चा नेऊन सरपंच, पंचायत सचिवांना घेराव घालण्यात येणार आहे. तसेच, रविवार दि. 28 डिसेंबर रोजी प्रकल्प स्थळी बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती स्थानिक नागरिक अजय खोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

तसेच, युनिटी मॉल प्रकल्पाच्या विरोधात 1 जानेवारी 2026 रोजी चिंबल गावात जनजागृतीसाठी मशाल फेरी आणि 4 जानेवारीला जाहीर सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही खोलकर यांनी सांगितले.

चिंबल येथील पर्यावरणीयदृष्ट्‌‍या संवेदनशील टोयार तलावाच्या परिसरात युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले असून, युनिटी मॉल प्रकल्पाच्या प्राथमिक कामाला सुरुवात केली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे टोयार तलावाला धोका संभवतो. टोयार तलावाचे अस्तित्व नष्ट झाल्यास पाण्याची समस्या निर्माण होणार आहे, अशी माहिती जैवविविधता व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी दिली.
युनिटी मॉलचा विषय न्यायप्रविष्ट असताना कामाला सुरुवात करणे गैर आहे. या प्रकल्पाच्या विरोधात उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, जिल्हा न्यायालयाने सद्यःस्थिती कायम ठेवण्याचा निवाडा दिला आहे, तरीही युनिटी मॉलच्या कंत्राटदाराकडून बेकायदा काम सुरू केले आहे, असा आरोप शिरोडकर यांनी केला.

स्थानिक ग्रामस्थांनी चिंबल तलावाजवळील बेकायदा सुरू असलेले बांधकाम सरकारी यंत्रणेच्या नजरेस काल आणून देण्याचे काम केले. तिसवाडीच्या मामलेदारासमोर स्थानिक ग्रामस्थांनी प्रकल्पाचे काम बेकायदा सुरू असल्याची तक्रार करून काम बंद करण्याची मागणी केली. चिंबल ग्रामपंचायतीने दिलेल्या बांधकाम परवान्याचा विषय न्याय प्रविष्ट आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.