युद्धामुळे राज्याच्या पर्यटनावर मोठा परिणाम

0
4

>> पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती; पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांशी केली चर्चा

पहलग्राम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांची केलेली हत्या व त्यानंतर भडकलेले भारत-पाकिस्तान युद्ध याचा राज्याच्या पर्यटनावर मोठा परिणाम झालेला असून, एप्रिल व मे महिन्यात गोव्यात पर्यटकांनी केलेले बुकिंग रद्द करण्याचे प्रमाण हे फार मोठे असल्याची माहिती काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी पर्यटन खात्याने रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पर्यटन क्षेत्रातील घटकांबरोबर बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

काल यासंबंधी माहिती देताना रोहन खंवटे हे म्हणाले की, मंगळवारी आम्ही पंचतारांकित, तसेच चार तारांकित हॉटेल व्यावसायिक, तसेच व्हिला, गेस्टहाऊस मालक, शॅकमालक, जलक्रीडा आणि होम स्टे व्यावसायिक आदींच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. दहशतवादी हल्ला व युद्ध या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी रद्द केलेले बुकिंग व त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती व या परिस्थितीला कसे तोंड द्यावे याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे खंवटे म्हणाले.
सध्याच्या परिस्थितीत पर्यटकांना राज्यात येण्यासाठी कसे आकर्षित करता येईल, याबाबतही चर्चा झाली. मॉन्सून पर्यटनाला चालना देण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. गोवा हे एक महागडे पर्यटन स्थळ आहे आणि त्याबाबत काय करता येईल यावरही चर्चा झाली.

काही गोष्टींमुळे गोव्याच्या पर्यटनाचे नाव बदनाम होऊ लागलेले असून टॅक्सीव्यावसायिकांची दादागिरी, किनाऱ्यावरील मोकाट श्वान आदींचा त्यात समावेश आहे. किनाऱ्यावरील श्वान पर्यटकांसाठी धोक्याचे ठरले असून, त्यांच्याकडून पर्यटकांचा चावे घेण्याच्या घटनाही घडल्या असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पशुसंवर्धन खात्याकडे संपर्क साधण्यात आला असल्याची माहितीही रोहन खंवटे यांनी दिली.

सोशल मीडियावरील काही इन्फ्लुएन्सर्स हे गोव्याच्या पर्यटनाची बदनामी करणारे पोस्ट टाकत असतात. त्यांचे हे प्रयत्न गोव्यातील माध्यमांनी हाणून पाडायला हवेत. त्यांचा खोटारडेपणा उघड करायला हवा, असेही खंवटे म्हणाले. मंगळवारी झालेल्या बैठका ह्या गोव्याच्या पर्यटनाला एक दिशा देण्याच्या प्रयत्नांचाही एक भाग होता, असेही त्यांनी
शेवटी स्पष्ट केले.