युद्धबंदीवरून लोकसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

0
13

पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धबंदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्धबंदीविषयीचे दावे या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने संसदेत चर्चा व्हावी, अशी मागणी होत होती. अखेर कालपासून लोकसभेत या मुद्द्यांवर चर्चेला सुरुवात झाली. सुरुवातीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन केले. ऑपरेशन सिंदूर कोणत्याही दबावाखाली थांबवण्यात आले नाही. पाकिस्तानने याचना केल्यानंतर युद्धबंदी करण्यात आल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. या चर्चेदरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि अन्य विरोधी पक्षांनी अनेक सवाल करत केंद्र सरकारला कोंडीत पकडले. राजनाथ सिंह यांच्या भषणानंतर काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी अनेक प्रश्न विचारून सरकारवर हल्लाबोल केला. संपूर्ण देश आणि सर्व विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या पाठिशी उभे होते; मग अचानक 10 मे रोजी युद्धविरामाचा निर्णय झाला. भारतासमोर पाकिस्तान झुकला होता, तर युद्धविराम का केला, युद्ध का थांबवले, कोणासमोर सरकार झुकले, असे सवाल गोगोई यांनी केले.

राजनाथ सिंह यांनी काल संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेचा उद्देश काय होता, भारतीय सैन्याने ही कारवाई कशा पद्धतीने केली आणि या संपूर्ण प्रक्रियेत सरकारची भूमिका काय होती? यावर त्यांनी स्पष्टपणे प्रकाश टाकला. या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. विशेष म्हणजे, भारतीय सैन्याने हे ऑपरेशन केवळ 22 मिनिटांत पूर्ण केले. ही कारवाई 6 ते 7 मे 2025 दरम्यान पार पडली. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.

पाकच्या याचनेनंतरच युद्धबंदी
10 मे च्या सकाळी पाकिस्तानच्या हवाई तळावर हल्ला केला तेव्हा पाकिस्तान गुडघ्यांवर आला. आता तरी हे हल्ले थांबवा अशी याचना आपल्या देशाकडे केली. त्यावेळी आम्ही पाकिस्तानला बजावले की आम्ही ऑपरेशन सिंदूर स्थगित केले आहे. पाकिस्तानने यापुढे चुकूनही कुठलीही आगळीक केली तर त्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गतच उत्तर दिले जाईल, असे भारताने त्यांना ठणकावून सांगितले, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्र्याकडून ‘शहीद’ दहशतवादी
उल्लेख; मसूद अझहरला म्हटले, ‘साहेब’

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू असताना केंद्रीय मंत्री लल्लन सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख ‘शहीद’ असा केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दहशतवादी मसूद अझहर ‘साहेब’ असा उल्लेख केला.

‘त्यावेळी’ मोदी-ट्रम्प यांच्यात संवाद नाही : परराष्ट्रमंत्री
भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर दोन्ही देशांत युद्धबंदी झाली होती; मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांनी ही युद्धबंदी त्यांच्या मध्यस्थीने ही झाल्याचे म्हटले होते. त्यावरून विरोधकांनी सवाल उपस्थित केले होते. तसेच युद्धबंदीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद झाला होता का? असे सवालही उपस्थित करण्यात येत होते. त्यावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल संसदेत मोठा खुलास केला. 22 एप्रिल ते 17 जून या कालावधीत पंतप्रधान मोदी आणि ड्रोनाल्ड ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नसल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान बोलताना सांगितले.