फोफावलेल्या भ्रष्टाचारापासून भारताला मुक्त करणे हीच देशभक्ती आहे त्यासाठी युवकांनी सक्रिय झाले पाहिजे, असे आवाहन युथ अगेंस्ट करप्शनचे गोवा राज्य संयोजक ऍड. प्रवीण फळदेसाई यांनी केले. काल दिवसभर पणजीतील आझाद मैदानावर भ्रष्टाचार विरोधी झालेल्या ‘महाधरण्यात’ ते बोलत होते. या ‘महाधरण्यात’ गोव्यातील विविध महाविद्यालये, उच्च माध्यविद्यालयातील विद्यार्थी व देशप्रेमी युवक, नागरिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
यावेळी पुढे बोलताना ऍड. फळदेसाई म्हणाले की, गोव्यातील मंत्री व अधिकार्यांनी मिळून केलेल्या करोडोंच्या खाण घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठी शासन व संबंधित यंत्रणा गंभीर झालेली नाही. तसेच राज्यातील पोलीस यंत्रणेला राजकीय दबावापासून मुक्त केले पाहिजे, असे सांगितले. ‘भ्रष्टाचार करणार नाही आणि करायलाही देणार नाही अशी शपथ गोव्यातील विद्यार्थी व युवकांनी घेतली पाहिजे’, असे अभाविपच्या सौ. नीलांगी शिंदे यांनी सांगितले. तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी वाहनचालक परवाना काढण्यासाठी कोणालाही पैसे देऊ नये, असे आवाहन माहिती हक्क कार्यकर्ते सुदिप ताम्हणकर यांनी केले. १८६० च्या दशकापासून अभाविप भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करत आहे. तेव्हापासून आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. तसेच पोर्तुगीजांचे गोडवे गाणार्यांनी लक्षात घ्यावे की, पोर्तुगीज राजवट ही सगळ्यात भ्रष्ट होती. आज मातृभाषेच्या विरोधातील हे त्यांचे पाईक आहेत व तोही भ्रष्टआथारच आहे, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. दत्ता नाईक (अभाविप, राष्ट्रीय कार्यकारिणी निमंत्रित सदस्य) यांनी केले. अनेक सरकारी खात्यात चालणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी संघटित झाले पाहिजे, असे आवाहन अभाविप फोंडा शाखा मंत्री शौनक बेहरे यांनी केले. यावेळी इंडिया अगेंस्ट करप्शनचे ऍड. सतीश सोनक यांनी गोव्यातील युवाशक्तीला भ्रष्टाचाराच्या विरोधात दिर्घकालीन लढाई लढण्याची आवश्यकता व्यक्त केली. या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रा. सावर्डेकर, विलास सतरकर (मुख्याध्याप, के. बी. हेडगेवार हायस्कूल), आनंद शिरोडकर, ऍड. बाबूसो गावकर, विनायक च्यारी (बजरंग दल), प्रा. संजय नाईक, संजय वालावलकर (विभाग कार्यवाह, रा. स्व. संघ) उपस्थित होते.