काल झालेल्या कॉंग्रेस आमदार व पक्ष कार्यकारिणी यांच्या संयुक्त बैठकीत काहींनी आगामी विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षांबरोबर युती करण्याचा तर काहींनी युती न करण्याची मते व्यक्त केली. असे असले तरी पक्षाने अद्याप कोणत्याही पक्षाबरोबर युती करण्याचा निर्णय घेतलेला नाही. डिसेंबर पर्यंत निर्णय होऊ शकेल, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येस मध्यरात्रीचे अधिवेशन घेण्याचा निर्णय सरकारने घ्यायचा असतो, सरकार याबाबतीत निर्णय घेईल. गोव्याचे प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी अधिवेशन घेण्याची सूचना केली होती. लोकशाहीत सूचना करण्यास हरकत नसावी, असे शिरोडकर यांनी एका प्रश्नावर सांगितले. ब्रार यांनी २० उमेदवारांची यादी तयार झाल्याचे जाहीर केले होते. त्यावर विचारले असता प्रदेश अध्यक्षांनी अद्याप उमेदवारांची यादी तयार झाली नसल्याचे सांगितले.
बेकायदेशीर खनिज प्रकरणी पक्ष दि. ९ ते १० नोव्हेंबरपर्यंत माहिती उपलब्ध होणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. भाजपनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या जनचेतना यात्रेचा कॉंग्रेसवर कोणताही परिणाम नाही, गेल्या ३० वर्षांच्या काळात आपण अशा अनेक यात्रा पाहिल्याचे ते म्हणाले.
भाजपातील आमदारांना फोडण्याचे काम कॉंग्रेस करीत नाही. परंतु आपल्या पक्षाची तत्त्वे मान्य असल्यास कुणालाही दरवाजे खुले असल्याचे त्यांनी सांगितले.
बंडाळीवर टीका
काल झालेल्या कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीत उपसभापती माविन गुदिन्हो यांनी कॉंग्रेसमधील अंतर्गत बंडाळीवर सर्वांचे लक्ष वेधले व सदर प्रकार बंद करण्याची विनंती केली. भाजपचे राष्ट्रीय नेते गोव्यात येऊन पक्षावर टीका करतात व कॉंग्रेस नेते गप्प का बसतात, असा प्रश्न गुदिन्हो यांनी विचारला. मंत्री आपल्या मर्जीतील लोकांना नोकर्या देत असल्याबद्दलही बैठकीत नाराजी व्यक्त झाल्याचे कळते.