युक्रेनचा 72 तासांत रशियावर पुन्हा मोठा हल्ला

0
33

>> 1100 किलो टीएनटी स्फोटकांद्वारे क्रीमियन पुलाखाली स्फोट; मोठे नुकसान झाल्याचा दावा

युक्रेनने 72 तासांच्या आत रशियावर काल दुसरा मोठा हल्ला केला. युक्रेनची गुप्तचर यंत्रणा एसबीयूने क्रीमियन पुलावर तिसऱ्यांदा हल्ला केला. पाण्याखाली स्फोटके लावून युक्रेनने मोठा हल्ला घडवून आणला. यासाठी एसबीयूने 1100 किलोग्रॅम टीएनटी स्फोटकांचा वापर केला. या स्फोटामुळे पुलाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनकडून केला जात आहे. याआधी रविवारी एसबीयूने रशियाच्या पाच हवाई तळांवर द्रोन हल्ले करत 41 लढाऊ विमाने पेटवली होती.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे पावणे पाचच्या सुमारास एसबीयूकडून हल्ला घडवून आणण्यात आला. यासाठी अनेक महिन्यांपासून योजना आखण्यात आल्याचे एसबीयूकडून सांगण्यात आले आहे. क्रीमियन पुलाच्या खांबाला लक्ष्य करुन पुलाचा आधारच कमकुवत करण्याच्या हेतूने युक्रेनने हा धाडसी हल्ला घडवून आणला. युक्रेनने केलेल्या हल्ल्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.

क्रिमियन पूल धोरणात्मकरित्या महत्त्वाचा आहे. हा रशियाने व्यापलेल्या क्रिमियाशी जोडणारा अतिशय महत्त्वाचा पूल आहे. त्याला केर्च सामुद्रधुनी पूल असेही म्हणतात. रशिया आणि क्रीमियाला रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. रशियन सैन्यासाठी या मार्गाने क्रिमिया आणि दक्षिण युक्रेनला शस्त्रे, सैनिक आणि रसद पाठवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. अशा परिस्थितीत, युक्रेनने या पुलाचे नुकसान करणे किंवा नष्ट करणे हे रशियन लष्करी पुरवठ्याचा कणा मोडण्यासारखे आहे. हा पूल 2018 मध्ये बांधण्यात आला. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कायमचा ताबा मिळवण्याचे प्रतीक म्हणून तो बांधला होता. पण, युक्रेन आणि पाश्चात्य देशांसाठी हा पूल बेकायदेशीर ताब्याचे प्रतीक आहे. त्याला लक्ष्य करणे हे रशियाचे मनोबल कमकुवत करण्याचे आणि जगाला संदेश देण्याचा मार्ग आहे. या पुलावर हल्ला केल्याने रशियाच्या आर्थिक आणि नागरी जीवनावरही परिणाम होणार आहे.

यापूर्वी देखील क्रीमियन पुलावर हल्ले
युक्रेनने याआधीही क्रीमियन पुलावर हल्ले केले आहेत. याआधी 8 ऑक्टोबर 2022 रोजी या पुलावर एका ट्रकमध्ये स्फोट झाला. त्यामुळे मोठी आग लागली होती. जुलै 2023 मध्ये दुसरा हल्ला झाला. या ऑपरेशनसाठी सागरी द्रोन ‘सी बेबी’चा वापर करण्यात आल्याची माहिती एसबीयूच्या प्रमुखांनी दिली होती.