कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्ष व गोवा मुक्ती सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने कवळे येथील ‘श्री शांतादुर्गा शिक्षण समिती’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. अजय वैद्य यांनी ज्येष्ठ कवी व गीतकार मंगेश पाडगावकर यांची घेतलेली ही प्रकट मुलाखत….
शब्दांकन : अजय ज्यो. बुवा
वैद्य : कुठल्याही प्रश्नाने मुलाखतीची सुरुवात करावी लागते, आणि म्हणून तुमच्या नावापासूनच मी सुरुवात करतो. पाडगावकर, मला सांगा, तुमचं नाव मंगेश का ठेवलं गेलं?
पाडगावकर : आता माझं नाव मंगेश का ठेवलं माझ्या आईनं…? सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या जन्मापूर्वी माझा एक भाऊ होता. तो दीड वर्षाचा असताना त्याचं निधन झालं. त्या जुन्या काळात आईला ज्योतिषानं सांगितलं की तुझ्या नशिबात मुलगा नाही. त्या काळात… त्यात परत एकत्र कुटुंबपद्धती… बाईला मुलगा नाही म्हणजे घरामध्ये तिला जगणंच कठीण व्हायचं. जुना काळ होता तो… आईनं नवस केला मनातल्या मनात. आम्ही पाडगावकर. आमचं कुलदैवत शांतादुर्गा. पण आईचा जन्म कुलकर्ण्यांच्या घरात. तिचं कुलदैवत होतं मंगेश. तेव्हा स्वाभाविकपणे तिनं मंगेशाकडं नवस केला की, मला मुलगा होऊ दे… तो पाच वर्षांचा झाल्यानंतर- म्हणजे त्याच्यात हुशारी बघा- पाच वर्षांचा झाल्यानंतर मी त्याला घेऊन गोव्याला तुझ्या दर्शनाला येईन व तुझ्या पायांवर ठेवीन. नंतर माझा जन्म झाला, आणि तोपर्यंत पाच वर्षे माझं नावच ठेवलेलं नव्हतं. पाच वर्षे पूर्ण झाली तेव्हा मला मंगेशच्या दर्शनाला आईवडिलांनी आणलं. त्याच्यासमोर ठेवलं आणि माझं नाव मंंगेश असं ठेवलं.
वैद्य : तुम्ही कवी केव्हा झालात? पहिली कविता तुम्ही केव्हा लिहिलीत?
पाडगावकर : मी कवी केव्हा झालो…? एक गंमत अशी आहे की माझ्या घरामध्ये कविता होतीच. माझी आई कविता लिहीत असे आणि कविता उत्तम वाचत असे. तिचं लग्न होऊन ती जेव्हा पाडगावकरांच्या घरी आली तेव्हा तिची एक जुनी बॅग ती घेऊन आली होती. त्या बॅगेत तिने बालकवींच्या कवितांचे संग्रह ठेवलेले होते. आणि कधीकधी मला त्या कविता ती वाचून दाखवायची. म्हणजे तिला त्या वाचाव्याशा वाटायच्या. अशा तर्हेने ज्यावेळी मला काहीही कळत नव्हतं, त्यावेळी बालकवी, केशवसुत यांच्या कविता माझ्या कानावरून गेल्या. आणि दुसरी गोष्ट अशी की, माझ्या आईचे वडील म्हणजे आजोबा, हेही कविता लिहीत असत. ते नाटकंही लिहीत असत. त्यांचं एक नाटक १९१७ साली प्रकाशित झालं होतं. अन् गंमत म्हणजे त्यांचे वडीलही कविता लिहीत असत म्हणे. त्यामुळे लहानपणापासून हे संस्कार होऊन माझ्या मनावर छाप पडली.
वैद्य : पण तुम्ही पहिली कविता कुठली लिहिलीत आणि केव्हा?
पाडगावकर : माझी पहिली कविता मी १९४३ साली लिहिली. माझा जन्म १९२९ मधला आणि १९४३ साली मी पहिली कविता केली, म्हणजे त्यावेळी माझं वय १४ वर्षे होतं. कवितेची आईपासून आवड होती. त्यावेळी कुठल्याशा दिवाळी अंकामध्ये कवी बा. भ. बोरकर यांची एक कविता प्रसिद्ध झाली होती. बोरकरांनी ती कविता कवितेला उद्देशून लिहिली होती. त्या कवितेची पहिली ओळ अशी होती- ‘तव चिंतनी, मन भंगुनि, मी हिंडतो रानीवनी…’ मला ती ओळ इतकी भावली की खेळताना, आंघोळ करताना, जेवताना माझ्या डोक्यामध्ये फक्त ‘तव चिंतनी, मन भंगुनी, मी हिंडतो रानीवनी…’ असं सारखं चाललेलं.
त्यावेळी आम्ही पहिल्या मजल्यावर राहायचो. मी जिना चढून वर जात होतो त्याचवेळी माझ्याच वयाची- म्हणजे चौदा-पंधरा वर्षांची- मुलगी वरून खाली उतरत होती. आता गंमत अशी की मीसुद्धा चौदा-पंधरा वर्षांचा… पण चौदा वर्षांचा मुलगा म्हणजे काय? हॅ! आणि चौदा-पंधरा वर्षांची मुलगी म्हणजे इंग्रजी म्हणीप्रमाणे अ सळीश्र ळी पेींहळपस | लशीींरळपश्रू डहश ळी र्शींशीूींहळपस. हे तिचं ‘एव्हरिथिंग’ असणं- पावसातला एखादा मेघ कोसळावा टप् टप् टप्…- तसं माझ्या अंगावर कोसळलं… आणि बोरकरांची कविता ‘तव चिंतनी, मन भंगुनी, मी हिंडतो रानीवनी’ ही ओळ डोक्यात होतीच. त्या छंदातच त्या मुलीवर संपूर्ण कविता माझ्या मनात उभी राहिली.
तुझं पाहिले
तुझं वाहिले
नवपुष्प हे हृदयातले
कवटाळुनी अन् चुंबुनी तुझं शील का तुटे मनी…
ही माझी पहिली कविता. ही कविता लिहिल्यानंतर ती त्या मुलीला वाचून दाखवावी असं खूप वाटलं, पण धीर मात्र झाला नाही. अजूनही माझी ‘शुक्रतारा’ वगैरे नाना गाणी गाजतात. प्रेमकविता… त्यासुद्धा कोणाकोणाला वाचून दाखव्याशा वाटतात. पण खरं सांगू… अजूनही धीर होत नाही… कारण (हसत) आता बायकोचं लक्ष असतं!
वैद्य : तुमच्यावर बोरकरांच्या कवितेचा प्रभाव आहे… कुसुमाग्रजांच्या कवितांचा पण आहे… तुमची आणि बोरकरांची पहिली भेट कुठे झाली?
पाडगावकर : बोरकर आमच्या घरी येत असत. त्याचं कारण असं की, माझा आतेभाऊ म्हणजे वडिलांच्या धाकट्या बहिणीचा मुलगा… त्याचं नाव होतं पुरुषोत्तम मंगेश लाड… तो आयसीएस होता त्या काळचा. मला वाटतं, आय ऍण्ड बीचा सेक्रेटरी असताना तो वारला. त्याची आणि बोरकरांची जुनी ओळख होती. त्यामुळे बोरकर त्याला भेटण्याकरिता यायचे. बोरकर आले की, अजून मला आठवतंय… चॉकलेटी रंगाचा सूट, लाल रंगाची टाय अन् झुबक्या ढंगाचे किंचित कुरळे दाट केस… आणि अगदी आपल्याच मस्तीत, म्हणजे स्वतःवरच खूष असलेले… असे हे बोरकर आमच्या घरी येत असत. आणि त्यांना कविता म्हणून दाखवा म्हणून सांगितले की ते… अगदी लांब अशी वही होती त्यांची… त्यातून कविता वाचून दाखवायचे. मी तर चौदा वर्षांचा मुलगा… मला तिथे कोण घेणार? मी दारामागे लपून कविता ऐकत असे.
मी एके दिवशी धीर केला आणि ती कविता त्यांना नेऊन दाखवली. त्यांनी ती वाचली. त्यांना कळलं की या कवितेवर आपल्या कवितेची छाप आहे. आणि त्यांनी मला विचारलं, ‘ही कविता तू लिहिलीस?’ आणि सांगू इतके ते खूष झाले… त्यानंतर काय झाले, आमच्या समोर मामा ववेरकर राहत. त्यांच्याकडे आम्ही नेहमी जायचो. बोरकरांबरोबर मी एकदा त्यांना भेटायला गेलो तेव्हा मामा वरेरकर म्हणाले, ‘बोरकर तू या मुलाला ओळखतोस काय? याचं नाव मंगेश पाडगावकर. याला म्हाई म्हणजे काय ते अजून माहीत नाही आणि हा प्रेमगीते लिहितो…’ अशी माझी मामांनी थेट त्या वरेरकर स्टाईलने चेष्टा केली. ते ऐकल्याबरोबर बोरकर चिडले. माझं वय त्यावेळी चौदा वर्षे होतं. म्हणाले, ‘मामा, तुम्ही या मुलाची चेष्टा करू नका. एक काळ असा येणार आहे की मराठी कवितेमध्ये याच्या नावाचं नाणं पडणार आहे!’ …आता मी तुम्हाला सांगतो की त्या वयात ‘याच्या नावाचं नाणं पडणार आहे’ हेसुद्धा काय ते मला माहीत नव्हतं. नाणी मी फक्त घरी बघितली होती. आठाणे… रुपये… काय असेल ते. याचा अर्थ मी नंतर बोरकरांना विचारला. ‘मामांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाकडे तुम्ही कशी एकदम माझी बाजू घेऊन बोललात…? माझं काहीही तुम्ही वाचलं नाही, फक्त एकच कविता वाचली…’ बोरकर म्हणाले, ‘याचा अर्थ बोरकराला पुढचं दिसतं.’
वैद्य : बोरकरांनी त्यावेळी सांगितलेलं भविष्य पुढं किती खरं ठरलं ते तुम्ही पाहता आहातच… पाडगावकरांच्या कवितासंग्रहांची नावं मी वाचत नाही, पण त्यांचे कित्येक कवितासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. १९५० मध्ये पहिला ‘धारानृत्य’ प्रसिद्ध झाला आणि २००० मध्ये ‘फुलपाखरू निळंनिळं’ प्रसिद्ध झाला… पाडगावकरांच्या नावाने मराठी कवितेच्या क्षेत्रामध्ये फक्त नाणं पडलं नाही तर खणखणीत वाजणारं नाणं पडलं, हेही तितकंच सत्य आहे. कुसुमाग्रज आणि बोरकर या दोघांचा तुमच्या कवितेवर प्रभाव होता म्हणजे नेमकं काय होतं?
पाडगावकर : असं आहे, माणूस साधी गोष्ट आहे. कवितेतलं पुढं सांगतो… मी मराठीत बोलतो कारण लहानपणापासून मी मराठी ऐकतोय… कविता काय आकाशातून पडत नाही. तुम्ही कुणाची तरी कविता वाचलेली असते म्हणून तुम्हाला ती कविता म्हणून कळते. तसंच माझं झालं. त्यावेळी कुलकर्णी माझे मास्तर होते. पुढे ते मोठे टीकाकार झाले हे तुम्हाला माहीत आहेच. पहिलीपासून मॅट्रिकपर्यंत ते माझे शिक्षक होते. पहिल्यांदाच मी कविता करतोय असं कळल्याबरोबर त्यांनी मला एक पुस्तक वाचायला दिलं. कारण तोपर्यंत मी काही जास्त वाचलेलं नव्हतं. त्या पुस्तकाचं नाव होतं ‘विशाखा.’ तो कुसुमाग्रजांचा संग्रह हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. आणि गंमत अशी की कुसुमाग्रज नाशिकचे आणि बा. द. कुलकर्णी हेसुद्धा नाशिकचेच. दोघेही मित्र. त्यामुळे ते जे पुस्तक होतं त्यावर ‘पंडित कुलकर्णी यांना प्रेमपूर्वक’ असं कुसुमाग्रजांनी लिहिलं होतं. त्यावेळी कुसुमाग्रजांनी ते पुस्तक मलाच भेट दिलंय असं मला वाटलं आणि त्यांची कविता वाचून माझ्यावर छाप पडली.
आता पुढची गोष्ट… पुढे हळूहळू मी कविता लिहायला लागलो. १९५० साली ‘धारानृत्य’ हा वयाच्या एकविसाव्या वर्षी प्रसिद्ध झाला. तो फारसा गाजला नाही. दुसरा संग्रह ‘जिप्सी’ फार गाजला. मी कुसुमाग्रजांना त्यावेळी पोस्टातून त्याची भेट म्हणून प्रत पाठविली. मला वाटलं उत्तर येईल. मी अपेक्षा करत होतो. तीन महिने झाले, पण पुस्तक मिळाल्याची पावतीसुद्धा आली नाही. तेव्हा मी म्हटलं हे एवढे मोठे कवी अन् मी पोरकट… कवितेचं पुस्तक टाकून दिलं असणार! आणि आश्चर्य म्हणजे, एक दिवस एक कार्ड मला त्यांच्याकडून आलं. दोन ओळींच्या अभिप्रायामध्ये त्यांनी लिहिलं होतं- ‘मी आता कविता लिहिण्याचे थांबवले तरी चालेल.’ ज्यांना मी देवासारखा मानला, त्यांनी मला पत्रातून हा अभिप्राय दिला. ही फार विलक्षण गोष्ट होती. पुढे कुसुमाग्रज आणि बोरकर या दोघांचं मला खूप प्रेम मिळालं.
वैद्य : तुम्ही एक कवी पण आहात आणि एक गीतकार पण आहात. कवितेचं गाणं नेमकं कधी होतं किंवा कुठल्या कृतीला कविता म्हणावं व कुठल्या कृतीला गाणं म्हणावं?
पाडगावकर : मला विचाराल तर ज्या काळात मी गाणी लिहिली तो काळ असा होता की, कविता लिहिणं म्हणजे काहीतरी मोठं काम आणि गाणं लिहिणं म्हणजे कमी प्रतीचं काम. ग. दी. माडगुळकर कधीकधी चेष्टेने मला म्हणायचे, ‘अरे पाडगावकर, कवी म्हणून घ्यायला तू व बापट, माझ्याकडून काय घ्याल रे?’ पण मी पहिल्यापासून गाणं हे कमी प्रतीच असं कधीच मानलं नाही. मी नेहमी असं मानत गेलो की कवितेचे नाना प्रकार असतात. कथनात्मक कविता असते, तत्त्वज्ञानात्मक असते, तसा कवितेच्या प्रकारांमध्ये हाही एक प्रकार आहे. म्हणून मी गाणी लिहायला लागलो. आणि योगायोगाची गोष्टी अशी की गाणी चालायला लागली त्याला काही सुमारच नाही….
वैद्य : तुम्हाला मुद्दाम गाणं लिहावं लागतं, का कवितेला स्वरांचं कोंदण बसवलं म्हणजे ते गाणं होतं?
पाडगावकर : हे पहा, गाणं लिहायचं की नाही हे पहिली ओळ सुचल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं. कारण शेवटी काय आहे, कविता मी केली तरी तुम्ही ती वाचता. पण गाणं हा जरी कवितेचा फॉर्म असला तरी वेगळ्या प्रकारचा आहे. ज्याला टिमवर्क म्हणतात तसा फॉर्म आहे. समजा, मी गाणं लिहिलं आणि ते वहीत पडून राहिलं तर काय उपयोग? ते गाणं संगीतकाराच्या हातात पडलं पाहिजे. मग चाल, गायक… इतर सगळं टिमवर्क होऊन ते तुमच्या समोर येतं. एखादी ओळ मला सुचते… चालता चालता मनात ओळी येतात… ‘श्रावणात घन निळा बरसला… रिमझिम रेशीम धारा…’ ही ओळ मला सांगते की माझं गाणं कर किंवा एखादी ओळ येते ‘सलाम माझा सलाम… डावा हात गांडीवर ठेवून उजव्या हाताने सलाम…’ ही ओळ मात्र सांगते की कविता कर.
वैद्य : तुमच्या गाण्यांना अनेक संगीतकारांनी चाली दिल्या आहेत. त्या सगळ्या चाली तुम्हाला आधी ऐकवून दाखविल्या होत्या का? आणि समजा दाखवल्या असतील आणि तुम्हाला त्या आवडल्या नसतील तर तुमच्या सांगण्यावरून त्या बदललेल्या आहेत का?
पाडगावकर : मी अगदी खरं सांगतो, माझी जास्तीत जास्त गाणी श्रीनिवास खळेंनी केलेली आहेत. पन्नास-साठाहून अधिक असतील. मी त्यांना कधीही ‘ही चाल मला नको, ही चाल बदला’ असं सांगितलेलं नाही. कारण माझी कविता वाचून चाल सुचणं आणि ते संगीतबद्ध होणं यात त्या संपूर्णपूर्ण कलावंतांचं योगदान आहे. त्यामुळे मी त्यात लुडबुड करावी असं मला कधी वाटलं नाही.
वैद्य : ‘भातुकलीच्या खेळामधली’ हे जे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं, त्याची सुरुवातीची चाल तुम्हाला आवडली नव्हती म्हणे….?
पाडगावकर : होय, पण ते काय होतं… हे गाणं निराशावादी गाणं आहे. देवांची सुरुवातीची चाल मला चमत्कारिक वाटली. आशयाला धरून नाही असं वाटलं. र्हीदम व सगळं माझ्या मूळ भावनेशी सुसंगत नव्हतं असं मला वाटलं. पण माझ्या नेमाप्रमाणे ते मी देवांना बोलून दाखवू शकलो नाही. पण माझ्या चेहर्याकडे बघून यशवंत देवांना कळलं की हे गाणं पाडगावकरांना आवडलेलं नाही. ते म्हणाले, ‘पाडगावकर, तुमच्या चेहर्यावरून मला कळलं आहे की माझी ही चाल तुम्हाला आवडलेली नाही. पण मी तुम्हाला सांगतो की एक वेळ अशी येईल की तुम्ही मला सांगाल, देव, ही चाल मला अतिशय आवडली.’ त्यानंतर त्या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. मला वाटतं अरुण दातेंनी म्हटलंय ते. रेकॉर्डिंगला मी हजर होतो. देवांचं माझ्याकडं लक्ष होतं. पण नंतर हेच गाणं माझ्या आवडीचं झालं. त्यामुळे एका अर्थाने देव जिंकले.
वैद्य : एखादी कविता म्हणून दाखवता का?
पाडगावकर : जीवनाचा आनंद मोकळेपणानं घ्यावा; नुसता मनातल्या मनात नव्हे! तर दाद देऊन घ्यावा असं मला वाटतं. मी तर कधीकधी म्हणतो की, आईने किंवा बायकोने केलेली आमटी जर छान झाली असेल, तर तिचा भुरका मारतानाचा ‘भुर्रऽऽ’ असा आवाज येतो तो मला ओंकाराएवढाच सुंदर वाटतो.