जम्मू काश्मीर तिबटेशन फ्रंटचा (जेकेएएएफ) प्रमुख महंमद यासिन मलिक याला काल त्याच्या श्रीनगरमधील घरी स्थानबध्द करण्यात आले. यासिन मलिक श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या मैसुमा येथील घरी आणले. गेल्या ९ फेब्रुवारी रोजी अफझल गुरू याला फाशी देण्यात आल्यानंतर यासिन प्रथमच श्रीनगरमध्ये आला आहे.
तो पाकिस्तानात आपली पत्नी व मुलीला भेटण्यासाठी गेला होता. २६/११ हल्ल्यातील प्रमुख आरोपी हफीज महंमद सईद याचा सहभाग असलेल्या पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात यासिनने उपस्थिती लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
श्रीनगरमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना यासिनने आपण वैयक्तिक भेटीवर पाकिस्तानात गेल्याचे सांगितले. तेथे असताना आपल्याला अफझल गुरूला फाशी देण्यात आल्याचे समजले. त्याची फाशी म्हणजे न्याय आणि न्याय प्रक्रियेचा खून केल्यासारखे असल्याचे तो म्हणाला. अफझल गुरूला योग्य न्याय मिळाला नाही व काश्मीरींची व्यथा मांडण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधण्यासाठी आपण पाकिस्तानात २४ तासांच्या उपोषणाला बसल्याचे त्यांने सांगितले.
पाकिस्तानमधून आपण भारतात आल्यानंतर दिल्लीत आपल्याला अटक झाली असती तरी त्यात नवीन झाले नसते. आपल्याला बंदिस्त करण्यात आलेले नाही असे भारतात एखादेच तुरुंग असेल असे मलिक म्हणाला.

