– प्रा. रामदास केळकर, कोलवाळ
शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या विचाराने आणि कृतीने योगदान देणारे म्हापसा येथील ज्ञानप्रसारक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य एडवर्ड डिलीमा हे नाव सर्वांना सुपरिचित आहे. कोंकणी, पोर्तुगीज भाषेत विविध पुस्तके नावावर असलेल्या डिलीमा सरांनी नुकतेच ‘यशस्वी शिक्षक होण्यासाठी’ या शिर्षकाचे प्रेरक, मार्गदर्शक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांच्या अन्य पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही त्यांनी अतिशय रंजक, सहज, सोप्या शैलीत लिहिलेले आहे.
गिरीतील सेंट ऍन्थोनीमध्ये प्रारंभीचे शिक्षण घेतलेल्या मूळ पर्वरीस्थित डिलीमा सरांची बहुतांश कारकिर्द शिक्षक म्हणून घडली. आपल्या व्यक्तीमत्वाला साजेल अशा एनसीसी या निमलष्करी प्रशिक्षण देणार्या संघटनेचे अधिकारी म्हणून स्वतःहून जबाबदारी स्वीकारणार्या सरांचे व्यक्तीमत्व त्यामुळे आणखी प्रभावी ठरले. विशेष म्हणजे या वलयाचा लाभ त्यांनी आपले सहकारी आणि विद्यार्थ्यांवर उमटविला. त्यांचे अनेक विद्यार्थी याची साक्ष आहेत.
शिक्षणतज्ज्ञ व मुरगाव एज्युकेशनचे माजी प्राचार्य माधवराव कामत यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना असलेल्या या पुस्तकात एकूण नऊ भाग असून त्यात शिक्षक घडविण्याची सर्व अंगे सरांनी हाताळली आहेत. आताच्या मरगळलेल्या शिक्षण क्षेत्रात शिक्षकी पेशा स्वीकारणार्या उमेदवारांना यातील प्रत्येक प्रकरण प्रशिक्षणाच्या तोडीचे आहे.
शिक्षकाचा धर्म, त्याच्या जबाबदार्या, व्यक्तीमत्व, शिक्षकाचा पेहराव, शिष्टाचार, वर्गातील वर्तणुक, योजना आणि कृती, मूल्यांकन, संस्थेतील संबंध, ज्ञानोत्सुक शिक्षक, विद्यार्थोपयोगी कार्यक्रम, त्यांचे महत्व, शिक्षकाचे उत्तरदायित्व अशा आशयाची नऊ प्रकरणे सरांनी आपल्या अनुभवावर, निरीक्षणावर आधारीत लिहिली असून ती वाचताना अनुभवी शिक्षकाला त्यातील अनुभव, निरीक्षण उजळणी करायला मदत करतील, तर नवशिक्याला मार्गदर्शन करायला मदत करतील.
‘शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो’ हे प्रकरण तर, फारच उद्बोधक आहे. वैद्यकीय तसेच कायद्याच्या पेशाप्रमाणेच शिक्षकी पेशाचाही दर्जा असल्याचे ते प्रारंभीच सांगतात. यात टागोरांचे एक मौलिक वचन त्यांनी उद्धृत केले आहे, ते म्हणतात, ‘एक शिक्षक जोपर्यंत स्वतः शिकत नाही तोपर्यंत खर्या अर्थाने तो दुसर्यांना शिकवूच शकणार नाही. जळता दिवाच दुसरा दिवा पेटवू शकतो’ यातून शिक्षकाने ज्ञानप्राप्तीसाठी धडपडत रहावे, प्रयत्नशील असावे हा संदेश ते देतात. ठिकठिकाणी होणार्या चर्चासत्रांत, सेमिनार याचा शिक्षकांनी नियमित लाभ घ्यावा, असे ते सुचवितात.
वाचनालयावर त्यांनी भर दिला आहे. प्रत्येक ज्ञानशाखा कुठे ना कुठे एकमेकांशी जोडलेली आहे. म्हणून चहुबाजूंनी मिळू शकणार्या ज्ञानाचा लाभ वाचनातून घेत घेत ते विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावे असा त्यांचा आग्रह आहे. स्वतः डिलीमा सरांनी आपला याबाबतचा बोलका अनुभव दिला आहे. सप्ताहातील शुक्रवार त्यांनी वाचनालयासाठी त्यांनी राखून ठेवला होता.
या दिवशी ते बहुतांश वेळ संदर्भ पुस्तके वाचण्यासाठी देत. अन्य दिवशी वृत्तपत्रे, मासिके यासाठी ते द्यायचे. आपला इंग्रजी विषय धरून इतिहास, इलेक्ट्रॉनिक्स, अर्थशास्त्र या विषयावरचेही वाचन शिक्षकांना उपयुक्त ठरते हे त्यांना यातून सुचवायचे आहे. संशोधनात्मक शिक्षणाचीही शिक्षकाला फार गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
खरे तर, प्रत्येक प्रकरणाचा वाचूनच आस्वाद घ्यायला हवा, याचे एक कारण म्हणजे ते एका उपक्रमशील, अनुभवी शिक्षकाने तटस्थ वृत्तीने लिहीलेले आहे. माजी प्राचार्य व शिक्षणतज्ज्ञ माधवराव कामत यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना या पुस्तकाच्या संदर्भमूल्यात भर घालणारी आहे. यशस्वी शिक्षकाने आपण काय शिकवणार यापेक्षा आपण प्रभावी कसे शिकवणार यावर भर द्यायला हवा हे सरांचे मत त्या दृष्टीने बोलके ठरते.
या पुस्तकाची भाषा आपल्या नेहमीच्या सरावाची भाषा असल्याने हे पुस्तक वाचनीय जसे झाले आहे, तसेच शिक्षणक्षेत्रातील मरगळ घालवायलाही पूरक ठरणारे आहे. दोनशे रूपये किंमत असलेले हे पुस्तक सरांच्या कारकिर्दीतील आठवे पुस्तक होय. आवर्र्जून विकत घेऊन संग्रही ठेवण्याच्या योग्यतेचे हे पुस्तक केवळ इच्छुक उमेदवारांनीच नव्हे तर या व्यवसायात असलेल्या सर्वांनी जरूर वाचावे.