यम – नियमांचे पालन महत्त्वाचे

0
279
  • डॉ. सीताकांत घाणेकर

 

आत्मशुद्धी जीवनात अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी आत्मशासन हवे.  नियमांचे पालन केले तर मनावरसुद्धा नियंत्रण मिळवता येते. आज हे नियंत्रण नसल्यामुळे विविध मानसिक आजार वाढताहेत. कोरोनाच्या संदर्भात विचार केला तर कळेल की ताणतणाव टाळण्यासाठी नियमांचा फार उपयोग होईल.

 

काळ कुणासाठीही थांबत नाही. सृष्टिचक्र त्याच्या  गतीने चालूच असते. सर्व विश्वातील घटनासुद्धा ठरल्याप्रमाणे घडत असतात. एरवी आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात एवढे गुंतलेलो असतो, व्यस्त असतो की दिवसरात्र व्यवहाराशिवाय अन्य कशावरच विचार करायला आपल्याला वेळ नसतो….

आणि अचानक… कोरोनाच्या रूपाने एक महाभयंकर संकट विश्वासमोर उभे ठाकले. इतिहासाकडे नजर टाकली की लक्षात येते की वेळोवेळी मानवतेवर व इतर प्राणिमात्रांवर अशी अनेक संकटे आलेली आहेत… उदा. प्लेग… पण हे रोग एका विशिष्ट क्षेत्रातच होते.

तदनंतर हल्ली देखील व्हायरसमुळे झालेले रोग उदा. एच१ एन१… विश्‍वांत पसरले. सुरुवातीला मानव घाबरला पण नंतर सावरला. त्यावर उपाय काढला… औषधे, लस… वगैरे. हा रोग होऊ नये म्हणून थोडी दक्षता घ्यायची हे सिद्ध झाले.

मध्यंतरी आणखी एका रोगाने धुमाकूळ घातला होता तो म्हणजे एचआयव्ही- एड्‌स. पण तो रोग विशिष्ट कारणांमुळे झाला होता. पण आतासारख्या महामारीचा रोग नव्हता. त्या रोगावरही आपल्या वैज्ञानिकांनी उपाय शोधून काढला.

पण यावेळी काही वेगळेच घडतेय. जणुकाही सर्व मानवतेला ओलीस ठेवून कोरोना स्वच्छंदपणे सगळ्या जगात फिरतो आहे. शेकडो देशात तो पसरला आहे. इतरत्रही पसरतो आहे. आश्‍चर्य म्हणजे तथाकथित मोठ्या, श्रीमंत, शक्तिशाली विकसित देशांना जास्त झळ बसली आहे. दर दिवशी शेकडो, हजारो लोकांना हा रोग होतो आहे. आता तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या लाखांवर पोचली आहे. चिंतेची व दुःखाची बाब म्हणजे मृतांची संख्यादेखील वाढते आहे.

त्या मानाने भारतात सुरुवातीलाच दक्षता घेतली व त्यामुळे आम्हाला तेवढा त्रास झाला नाही. आपल्या गोव्याने तर कमालच केली. सध्या गोव्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. पुढे काय घडेल माहीत नाही.

एका गोष्टीची नोंद घेणे आवश्यक आहे की कुणीही बेफिकीर होता कामा नये. मिल्ट्री व आतंकवादी, पोलीस व चोर यांच्यामध्ये चकमकी होतात. दोन्ही बाजूंच्या काही व्यक्ती मरतात, काही घायाळ होतात. तद्नंतर गुन्हेगार समाजातच लपून राहतात. संधी मिळाली की पुन्हा बाहेर येतात. इथे व्हायरस कुणाला घाबरत नाही. कारण त्याला मारण्याचे  औषध आपल्याकडे नाही. पण आवश्यक ती दक्षता घेतली नाही तर तो झपाट्याने पसरतो.

आपण रामायण- महाभारत पाहतो तेव्हा एका राक्षसाचे रक्त जमीनीवर सांडले तर शेकडो राक्षस तयार होतात. तसेच एका व्हायरसपासून शेकडो तयार होत असतात. त्याला उपाय सुचविलेला आहे तो म्हणजे त्याच्याशी संपर्क होऊ नये म्हणून…

– सामाजिक अंतर ठेवावे

– तोंडावर मास्क बांधावा.

– हात व्यवस्थित साफ करणे- साबण-पाण्याने अथवा सॅनिटायझरने.

सुरुवातीला सर्वजण घाबरले व व्यवस्थितपणे दक्षता घ्यायला लागले पण हळूहळू निष्काळजीपणा वाढला व अनेक जणांनी सर्व कायदे पाळणे सोडून दिले. यात अशिक्षितांबरोबर तथाकथित सुशिक्षितांचाही समावेश आहे. म्हणूनच सरकारी यंत्रणा राबवून रस्त्यांवर काही कायदे कटाक्षाने पाळले जातात. पण इतर ठिकाणी काय?.. जसे मोठमोठे हाउसिंग कॉंप्लेक्स- तिकडे आनंदीआनंदच दिसतो. मुलांना सुट्टी म्हणून ती आरामात खेळतात. तरुण व काही वयस्कर मंडळी सकाळ-संध्याकाळ फिरायला जातात. गप्पागोष्टी करतात.. अगदी जवळ राहून…

शेवटी प्रत्येक व्यक्तीने यावर विचार करून स्वनियंत्रण करायला हवे. एरवीदेखील बहुतेकांना बंधने नकोच असतात. त्यामुळेच विश्‍वांत अनेक समस्या येतात.

भारतीय तत्त्ववेत्त्यांनी या विषयावर सखोल विचार केलेला दिसतो. म्हणूनच योगशास्त्रातील अष्टांग योगात प्रथम दोन अंगे म्हणजे यम- नियम. पूर्वी आपण प्रत्येक यम-नियमावर विचार केलेलाच आहे. त्यांचे पालन जगातील इतर व्यक्ती करतील की नाही माहीत नाही. पण आपणतरी करू शकतो.

यम – व्यक्ती आणि समाजासाठी सद्वर्तनाचे आदेश – अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. प्रत्येक यम महत्त्वाचा. पण सध्याच्या परिस्थितीशी ज्या यमाचा संबंध आहे तो म्हणजे अहिंसा.

– फार मोठा शब्द. विविध व्याख्या असलेला, पण इथे त्याचा संबंध येतो तो म्हणजे प्राण्यांची हिंसा. आजचा मानव मांसाहाराकडे जास्त वळला आहे. तसे पाहिले तर मानवी शरीर शाकाहारासाठी आहे. मांसाहारासाठी नाही. पण…

त्यामुळे जसे आपल्या गाडीत ठराविक तर्‍हेचे इंधन घातले नाही तर इंजिन खराब होते तसेच आपले आहे. आहार योग्य नसला तर अनेक रोग होतातच, शिवाय रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि कोरोनाच्या संदर्भात ते बरे नाही. रोग होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच योगशास्त्रात सात्विक आहाराला महत्त्व दिले आहे.

सत्य व अस्तेय यांचा संबंध पाप-पुण्याशी येतो. ते महत्त्वाचे आहेतच, पण आजच्या समस्येच्या संदर्भात फारसे महत्त्वाचे नाहीत.

ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या सर्व कामभावनांवर विजय. आज सर्व विश्‍वांत कामभावना खूप बळावली आहे. त्याचे दुष्परिणाम क्षणोक्षणी दिसताहेत. त्यातीलच एक हृदयद्रावक म्हणजे बलात्कार. म्हणूनच भारतात कामभावना पवित्र मानलेली आहे. अपत्यप्राप्तीसाठीच जननेंद्रियांचा उपयोग करावा अशी मान्यता होती. म्हणून भारतीय संस्कृतीत स्वतंत्र असा कामदेव मानतात. तसेच पुरुषांच्या वीर्यामध्ये भरपूर शक्ती असते. परत परत वीर्यस्खलन झाले तर व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे आज स्वैराचार खूप बोकाळला आहे आणि दुःख वाटते की याचे तथाकथित सुशिक्षित समाजात  समर्थन केले जाते.

नियम – स्वतःच्या आत्मशुद्धीसाठी आत्मशासनाचे आदेश.

– शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्‍वर प्रणिधान.

आत्मशुद्धी जीवनात अत्यंत जरुरी आहे. त्यासाठी आत्मशासन हवे. या गोष्टी हल्ली कमी झालेल्या दिसतात. नियमांचे पालन केले तर मनावरसुद्धा नियंत्रण मिळवता येते. आज हे नियंत्रण नसल्यामुळेच विविध मानसिक आजार वाढताहेत. कोरोनाच्या संदर्भात विचार केला तर कळेल की ताणतणाव टाळण्यासाठी नियमांचा फार उपयोग होईल.

स्वामी विवेकानंद म्हणतात- योगशास्त्रात पहिल्या दोन पायर्‍या जीवनविकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

तिसरे अंग – आसने. व्यवस्थित व नियमितपणे ठरावीक आसने केली तर शारीरिक आरोग्य ठीक राहीलच पण मानसिक आरोग्यसुद्धा सुधारेल.

चौथे अंग – प्राणायाम. प्राणशक्तीवर नियंत्रण. हे अत्यंत गरजेचे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच प्राणायामाचा संबंध श्‍वासाशी आहे. श्‍वास खोलवर जातो त्यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात आणि कोरोनामध्ये अशी स्थिती असणे अत्यंत फायदेशीर आहे.

प्राणायाम करण्यापूर्वी दोन क्रिया केल्या तर फायदा चांगला होतो- जलनेती व कपालभाती,. या हठयोगातील क्रिया आहेत.

* जलनेती – मीठ घातलेले पाणी नाकपुड्यांत घालायचे किंवा ओढून घ्यायचे. मीठ अगदी थोडे – त्या पाण्याची चव अश्रुंसारखी असावी. ते पाणी उकळून कोमट केलेले असावे. तसेच ही क्रिया प्रथम योग्य गुरुकडून शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे नाकपुड्यातील अगदी आतला भाग साफ राहतो.

* कपालभाती – नाकपुड्यातून जोराने श्‍वास बाहेर सोडणे. अंतर्श्‍वास आपोआपच होतो. इथेही नाकपुड्या व्यवस्थित उघडतात व श्‍वास घेताना हवा व्यवस्थित वाहते.

कोरोनासारख्या रोगामध्ये या दोन्ही क्रिया फारच महत्त्वाच्या आहेत. कारण त्यामुळे नाकाच्या ज्या भागातून हा व्हायरस शरिरात प्रवेश करतो त्याच भागावर या क्रियांचा परिणाम होतो. कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी असते.

अष्टांगयोगाचे पाचवे अंग म्हणजे प्रत्याहार. पंच ज्ञानेंद्रिये व पंच कर्मेंद्रिये यांवर योग्य नियंत्रण. हे जर व्यवस्थित असले तर मानवाच्या जीवनात पवित्रता येते. आजच्या आधुनिक जीवनात विविध इंद्रियांचा दुरुपयोग केला जातो. रोग त्यामुळेच बळावतात. त्यात कोरोनाचाही समावेश आहे.

त्यानंतरची तीन अंगे – धारणा, ध्यान, समाधी.

– मनावर नियंत्रण ठेवून आत्मशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी अंगे आणि अशावेळी जेव्हा विश्‍वातील सर्व मानव जेव्हा भयभीत झालेले आहेत, तेव्हा आत्मशक्ती प्रबळ असणे अत्यंत जरुरी आहे. मग ना भीति रोगाची वा मृत्यूची.

सारांश – जग कसेही वागले तरी इतरांना आपण सुधारू शकत नाही. पण आत्मचिंतन करून योगसाधनेतील प्रत्येक मार्गाचा व अनेक अंगाचा फायदा कोरोनावर विजय मिळवण्यासाठी आपण करू शकतो.

प्रत्येक दिवशी नियमितपणे एक तास तरी योगसाधना करू शकतो.

– काही आसने, जलनेती, कपालभाती, ध्यान.

– तसेच ज्ञान व भक्तीयोग.

– यम- नियमांचे निश्‍चितपणे पालन

शारीरिक स्वास्थ्य लाभेलच पण मानसिक सुखाचा अनुभव येईल. आत्मशक्ती वाढल्यामुळे – रोगप्रतिकार शक्ती वाढेल. प्रत्येकजण सुख-शांतीची अनुभूती घेईल.