यंदा राज्यात 173 इंच पावसाची नोंद

0
5

>> माजी वैज्ञानिक डॉ. रमेशकुमार यांची माहिती

>> वाळपई, सांगेत 5000 मी.मी. ची नोंद

हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सूनचा हंगाम हा 29 सप्टेंबर रोजी संपतो. त्यानुसार यंदा 29 सप्टेंबर रोजी मान्सूनचा हंगाम अधिकृतरित्या संपत असताना काल रविवारी यंदाच्या मान्सूनविषयी बोलताना राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे माजी वैज्ञानिक डॉ. रमेशकुमार यांनी, यंदाच्या हंगामात मान्सूनचे राज्यात कित्येक विक्रम केले असल्याचे सांगून यंदाच्या हंगामात गोव्यात तब्बल 173 इंच एवढा पाऊस 29 सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत कोसळला असल्याची माहिती दिली.

गोव्यात कोसळणाऱ्या सरासरी पावसापेक्षा तो तब्बल 50 टक्के एवढा जास्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दि. 8 जुलै रोजी गोव्यात सरासरी 236 मी. मी. एवढा पाऊस कोसळला. तर याच दिवशी पणजी शहरात तब्बल 363 मी. मी. एवढा पाऊस कोसळला. गोव्यात तसेच पणजी शहरात 125 वर्षांत एवढा पाऊस कधीच कोसळला नव्हता अशी माहिती श्री. कुमार यांनी दिली.

यंदाच्या जुलै महिन्यात तर पावसाने राज्यात मोठे विक्रमच केले. गेल्या कित्येक दशकांत गोव्यात जुलै महिन्यात एवढा पाऊस कोसळला नव्हता. या जुलै महिन्यात यंदा अतिमुसळधार पाऊस तब्बल 9 दिवस कोसळला. त्यामुळे जुलै महिन्यात नऊ वेळा हवामान खात्याला लाल रंगाचा इशारा द्यावा लागला. यंदाच्या हंगामात वाळपई व सांगे येथे भरभरुन म्हणजेच 5 हजार मी. मी. एवढा पाऊस कोसळला. तर राज्यातील अन्य नऊ ठिकाणी 4 हजार मी. मी. पेक्षा जास्त पाऊस कोसळल्याची माहिती श्री. कुमार यांनी यावेळी दिली.

मान्सून अजून काही दिवस

हवामान खात्याने सांगितले की, राजस्थानमधून नैऋत्य मान्सूनचे प्रस्थान 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यावेळी 23 सप्टेंबर रोजी म्हणजेच एक आठवड्याच्या विलंबाने घडले. त्यामुळे गोवा वमहाराष्ट्रात 10-12 ऑक्टोबरपूर्वी मान्सून संपण्याची शक्यता नाही. साधारणपणे 5 ऑक्टोबरच्या सुमारास महाराष्ट्रातून मान्सून माघारी येतो. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आणि ते वायव्येकडे सरकण्याची शक्यता असल्याने 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्र व गोव्यात चांगला पाऊस होतच आहे. गोवा व महाराष्ट्रात दीर्घ कालावधीनंतर पाऊस सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये या राज्यांतून मान्सून संपेल, असे भाकीत करणे घाईचे असल्याचे खात्याने म्हटले आहे.