यंदा ‘पर्पल फेस्ट’ला आमिर खान येणार!

0
14

मुंबईतील भेटीदरम्यान समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले महोत्सवाचे निमंत्रण

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी नुकतीच मुंबईत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांची भेट घेत त्यांना यंदा होणाऱ्या ‘पर्पल फेस्ट’चे निमंत्रण दिले. आपण या महोत्सवाच्या उद्घाटनाला येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. पण शक्य न झाल्यास आपल्या प्रतिनिधींना पाठवेन, असे आमिर खानने सांगितल्याची माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली.

अभिनेता आमिर खान यांना आगामी ‘पर्पल फेस्ट’साठी निमंत्रण देण्यासाठी आम्ही गेलो असता त्यांनी आम्हाला दिलेल्या वागणुकीने आम्ही सगळेच जण भारावून गेलो, असे फळदेसाई यांनी नमूद केले. आम्ही त्यांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संर्पक साधून भेटीसाठीची वेळ निश्चित केली होती. त्याचवेळी आम्हाला कामात अत्यंत व्यस्त असलेला हा अभिनेता आम्हाला जास्तीत जास्त 20 मिनिटांचा वेळ देईल, असे वाटले होते. मात्र, 20 सप्टेंबर रोजी जेव्हा आम्ही त्यांना जाऊन भेटलो, तेव्हा त्यांनी आमचे जोरदार स्वागत तर केलेच. शिवाय नंतर आमच्याशी तब्बल दोन ते अडीच तास संवाद साधला. त्या दरम्यान ते दिव्यांग व्यक्तींविषयी तर भरभरून बोललेच. शिवाय दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याविषयी त्यांना किती आपुलकी आहे याचे दर्शनही त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून आम्हाला घडले, असे फळदेसाई यांनी सांगितले.
चर्चेदरम्यान आमिर खान यांनी मागच्या दोन वर्षांच्या पर्पल फेस्टचे काही व्हिडिओही आमच्याबरोबर बसून पाहिले आणि पर्पल फेस्टविषयी खूप चांगली प्रतिक्रियाही दिली.

आमिर खान यांचा नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित व्हायचा आहे. त्यामुळे ते सध्या खूपच व्यस्त आहेत; पण तरीही आपण उद्घाटन सोहळ्याला येण्याचे प्रयत्न करतो. मात्र शक्य न झाल्यास आपल्या प्रतिनिधींना पाठवतो. तसेच गोवा पर्पल फेस्टचा आपणही शक्य तेवढा प्रचार करू, असे आश्वासनही आमिर खानने दिल्याचे फळदेसाई म्हणाले.

जे. पी. नड्डांची घेतली भेट

दरम्यान, पर्पल फेस्टसाठी आपण काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व त्यांच्या पत्नीची भेट घेऊन त्यांनाही या महोत्सवासाठी येण्याचे निमंत्रण दिले. नड्डा यांच्या पत्नी मल्लिका नड्डा या स्वतः दिव्यांगांसाठी एनजीओ चालवत असून, त्यांनीही पर्पल फेस्टविषयी गौरवोद्गार काढल्याचे फळदेसाई म्हणाले.