Home बातम्या यंदा चांगल्या पिकाची कृषी खात्याला अपेक्षा

यंदा चांगल्या पिकाची कृषी खात्याला अपेक्षा

0

सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात कापणी व मळणीचे काम जोरात सुरू असून यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने ९० टक्के चांगले पीक मिळेल, असा विश्‍वास कृषी संचालक सतीश तेंडुलकर यांनी व्यक्त केला.

गणेश चतुर्थीच्या काळात पाऊस जास्त पडला होता. त्यामुळे काही भागांतील शेतामध्ये पाणी साचून भाताची नुकसानी झाली होती, परंतु अन्य भागांतील शेतकर्‍यांकडून पिकाच्या बाबतीत तक्रारी आल्या नाहीत. खात्याच्या अधिकार्‍यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार यंदा पीक समाधानकारक आल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी पावसामुळे प्रचंड हानी झाली होती, असे तेंडुलकर म्हणाले.

यंदा सुमारे ३० हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आणली आहे. शेतकर्‍यांनी कापणी व मळणीसाठीही यंत्रांचा वापर करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुमारे २५ ते ३० यंत्रे काम करीत आहेत. कृषी खात्याकडे १० यंत्रे आहेत, तर उरलेली यंत्रे कर्नाटकातून भाड्याने आणली आहेत. वेगवेगळ्या सोसायट्या वरील यंत्रे आणून शेतकर्‍यांना उपलब्ध करून देतात.

ताशी चार हजार मीटर जमिनीतील शेतांची कापणी व मळणी करणे शक्य होत असल्याचे कृषी अधिकार्‍यांनी सांगितले. ३० ते ३५ दिवस वरील यंत्रे गोव्यात असतात. त्यानंतर ती कर्नाटकात नेतात, असे त्यांनी सांगितले.