यंग इंडियनचे कार्यालय ईडीकडून सील

0
4

>> नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाई; पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय न खोलण्याचे निर्देश

नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियनचे कार्यालय सील केले. मंगळवारी ईडीने या कार्यालयाची झडती घेतली होती. त्यानंतर काल हे कार्यालय सील करण्यात आले.

नॅशनल हेराल्डशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगळवारी ईडीने हेराल्ड हाऊससह १२ ठिकाणी छापे टाकले होते. या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीनंतर देशभरात मोदी सरकार तसेच ईडीविरोधात कॉंग्रेसकडून निदर्शने करण्यात आली होती.
यंग इंडियन कंपनीचे ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधींकडे आहेत आणि तितकेच शेअर्स राहुल गांधींकडे आहेत. यंग इंडियन ही तीच कंपनी आहे, जी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेएलने टेकओव्हर केली होती. ईडीने हेराल्ड हाऊस इमारतीतील यंग इंडियन कार्यालयाला टाळे ठोकले आहे. तसेच पूर्वपरवानगीशिवाय हे कार्यालय खोलू नये, असे निर्देश ईडीने दिले आहेत.

ईडीच्या या कारवाईनंतर कॉंग्रेस आता ऍक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. यंग इंडियनवर केलेल्या कारवाईनंतर कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी कॉंग्रेस नेते जयराम रमेश, अजय माकन आणि अभिषेक मनू सिंघवी उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस नेत्यांनी केंद्रावर सूडाचे राजकारण केल्याचा आरोप केला.
सोनिया आणि राहुल गांधी यांच्या घराबाहेर पोलिसांचा पहारा वाढवण्यात आला आहे. त्यावर पोलिसांच्या पहार्‍याने सत्याचा आवाज दडपला जाणार नाही. महागाई, बेरोजगारी यावर प्रश्न विचारले जातील, असे कॉंग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कॉंग्रेसचे उद्या देशव्यापी आंदोलन
महागाई आणि बेरोजगारी विरोधात शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी कॉंग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येईल. कॉंग्रेस नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढणार आहेत, असे अजय माकन यांनी सांगितले. आज आम्हाला पोलिसांकडून पत्र मिळाले की तुम्ही ५ तारखेला कोणतेही प्रदर्शन करू शकत नाही. मात्र महागाई, बेरोजगारी आणि खाद्यपदार्थांवरील जीएसटी विरोधात कॉंग्रेस आंदोलन करत राहील, असेही माकन म्हणाले.