Home बातम्या म्हार्दोळची जायांची पूजा आज

म्हार्दोळची जायांची पूजा आज

0

– नारायण विनू नाईक, मंगेशी

मानवी जीवन यशस्वी होण्यासाठी भक्तीमार्गाने वाटचाल केली पाहिजे. जगात एक महान शक्ती आहे. तिलाच ईश्‍वर किंवा भगवान म्हणतात. ईश्‍वरभक्तीसाठी श्रद्धा ठेवावी लागते. श्रद्धेवाचून जगता वा वागता येत नाही. प्रेमपूर्व भक्ती करा. बुद्धी जागी करा. ज्ञान प्राप्त करा. दया, प्रेम आणि ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गाने पुढे चला. असा आपला आपण उद्धार करायचा मार्ग संतांनी सामान्य माणसांपुढे ठेवला.

मानव विविध प्रकारांनी ईश्‍वरसेवा करीत असतो. ईश्‍वरसेवेत श्रद्धा अत्यंत महत्त्वाची असते. अशा श्रद्धेने केलेल्या सेवेत ईश्‍वर प्रसन्न होऊन इच्छित कार्यास सुफळ देत असतो. काही लोक आपल्या कुटुंबापुरतेच धार्मिक कृत्य करीत असतात, तर काही लोक सार्वजनिक धार्मिक देवकृत्ये करून विविध उत्सव थाटामाटात साजरे करतात. सार्वजनिक उत्सव साजरे करण्याचा हेतू हाच की सर्व लोकांनी तेथे यावे व देवाच्या कृपेस पात्र व्हावे. अशा उत्सवास दूरदूरचे भाविक लोक उपस्थित राहून देवदर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेत असतात.

विविध प्रकारच्या प्रत्येक फुलाचे वैशिष्ट्य व गुण असतो. ही फुले एका विशिष्ट हंगामातच होत असतात. जाई, जुई, मोगरा, चाफा, शेवंती, गुलाब इत्यादी फुलांपैकी जाईच्या फुलांना सुगंध अधिक असतो. इतर काही कमी जास्त सुवासिक फुले असतातच. लोक ही फुले खरेदी करून देवाच्या चरणी अर्पण करतात. तसेच महिलांनाही ती प्रिय असल्यामुळे त्या जाईंच्या फुलांचा वापर करतात.

भाद्रपद वद्य द्वितीया हा दिवस म्हार्दोळच्या फुलकारांचा मोठ्या पर्वणीचा दिवस होय. सुप्रसिद्ध जायांची पूजा येथील श्री महालसा मंदिरात दरवर्षी याच दिवशी साजरी केली जाते. जवळ जवळ ५०-६० कुटुंबाकडून हा उत्सव संपन्न होत असतो. यंदा या पूजेला १०० वर्षे पूर्ण होत आहे. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रती वर्षी निरनिराळ्या एका वाहनाची निवड केली जाते. उदा. विजयरथ, हत्ती अंबारी, हंस वाहन, गरूड वाहन, शेषवाहन, सिंहासन, गजान्तलक्ष्मी, विमान, मखर, इत्यादी विविध कलाकृती विविध प्रकारची फुले व असंख्य जाईच्या माळांचा वापर करून वाहन सुशोभित केले जाते. त्या वाहनात श्री सत्यनारायण महापूजा केली जाते.

श्री महालसा देवीच्या भव्य सभामंडपात ही श्री सत्यनारायण महापूजा केली जाते. या पूजेसाठी दोन दिवस जायांची फुले विक्री करण्यास बंदी असते. या दोन दिवसांत ५० ते ६० कुटुंबियांकडून जाईच्या माळा पूजेसाठी वापर करतात. येथील प्रसिद्ध श्री महालसा देवीच्या व सातेरी देवीच्या व इतर पंचायतन दैवतांच्या मंदिरात सर्वत्र जाईच्या माळा बांधलेल्या असतात. तसेच देव-दैवतांच्या अंगावर जाईंच्या माळा घातलेल्या असतात. या जाईंचा सुगंध संपूर्ण मंदिरात व त्याच्या परिसरात दरवळलेला असतो. श्री महालसा देवीच्या व इतर सर्व पंचायतन देव-देवतांच्या मंदिरात जाईच्या माळा घातल्यामुळे त्या जाईच्या सुगंध दरवळलेला असतो की सत्यनारायण पूजेसाठी जाईंच्या असंख्य माळा घालून सुशोभित केलेले वाहन, महालसा देवी दर्शन, श्री सत्यनारायण महापूजेचे दर्शन, एकीकडे महापूजा चालू असते. सर्वप्रथम गायकाकडून गायनाचा कार्यक्रम सादर केला जातो. गायनाच्या कार्यक्रमास रसिक सहभागी झालेले असतात. असंख्य भाविकजनांची ये-जा चालू असते. हे पाहून जणू ही वैकुंठ नगरीच आहे असे प्रत्येक भाविकाला वाटेल.

बर्‍याच वर्षांपूर्वी म्हार्दोळ गावात पटकी नावाच्या महाभयंकर रोगाची साथ आली होती. रुग्णलोक रोगातून मुक्त होण्यासाठी पुष्कळ औषधोपचार करीत. पण गुण मिळेना. तेव्हा ग्रामस्थ लोकांनी श्री महालसा देवीच्या मंदिरात जाऊन ब्राह्मणाकडून देवीची प्रार्थना करून रोगाच्या साक्षीचे संकट दूर करण्यासाठी साकडे (गार्‍हाणे) घातले आणि काही दिवसानंतर देवीच्या कृपा साक्षात्काराने रोगाचे संकट नाहीसे झाले. लोक आनंदित झाले. देवीच्या साक्षात्कार लोकांना कळून आला. नंतर नाईक फुलकार समाजातर्फे प्रती वर्षी श्री महालसा देवीच्या मंडपात श्री सत्यनारायण महापूजा व देवीला दोन दिवसांच्या जाईचा वापर करून पूजा केली जाते. श्री महालसा देवीने गावांवरील संकट दूर केल्यामुळेच प्रती वर्षी श्री सत्यनारायण महापूजा व देवीची पूजा करण्याची परंपरा चालू ठेवली.

श्री महालसा देवीच्या भव्य सभामंडपात सर्वत्र जाईच्या माळा बांधलेल्या असतात. श्री सत्यनारायण महापूजा झाल्यानंतर ब्राह्मणाकडून सार्वजनिक गार्‍हाणे घातले जाते. शांतपणे सर्व भाविकजन उभे असतात. गार्‍हाणे घालून संपल्यानंतर येथे उपस्थित असलेले भाविकजन मंडपात बांधलेल्या जाईच्या माळा काढून श्री महालसा देवीचा प्रसाद असे समजून घरी घेऊन जातात. म्हार्दोळ येथील अत्यंत जागृत अवतारी मोहिनीरुपी श्री महालसा नारायणी देवीने भाविकजनांवर कृपा ठेवून त्यांना दीर्घायुष्य, दीर्घारोग्य द्यावे व त्यांचे इच्छित काम पूर्ण करावे अशी ‘श्रीं’ चरणी नम्र प्रार्थना.