म्हापसा, मडगावात कॉंग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात धरणे

0
144

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे दर सतत खाली येत असताना केंद्र सरकारने डिझेल व पेट्रोलचे दर सतत वाढवून जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल म्हापसा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलेल्या धरणे धरणाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. मडगाव व म्हापसा अशा दोन ठिकाणी सकाळी १० ते दुपारी १२ या दरम्यान धरणे कार्यक्रम झाला.

लोकांना ‘अच्छे दिन’चे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भारतभरातील लोकांची थट्टा चालवल्याचा आरोप त्यांनी केला. पेट्रोल व डिझेलची दरवाढ मागे घेण्यात यावी अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणारे एक पत्र यावेळी गिरीश चोडणकर यांनी म्हापसा उपजिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केले.

महिला कॉंग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, विजय भिके, विठू मोरजकर, ज्युलियो डिसोझा, सुभाष केरकर, आनंद नाईक यांनी धरणे कार्यक्रमात भाग घेतला.