म्हापसा पोलीस ठाण्यावर मेणबत्ती मोर्चा

0
8

गावसवाडा-म्हापसा येथील सॅम्युअल ब्रागांझाच्या मृत्यूप्रकरणी काल रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सॅम्युअल यांच्या नातेवाईकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, आजी-माजी नगरसेवक आणि सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी भरपावसात मेणबत्ती मोर्चा काढत म्हापसा पोलीस ठाण्यावर धडक दिली. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा कुटुंबीयांनी यावेळी दिला. तसेच पंचनामा करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही केली.
सॅम्युअलच्या मृत्यू प्रकरणाला शवविच्छेदन अहवालामुळे नवे आणि गंभीर वळण मिळाले आहे. सॅम्युअलच्या कुटुंबीयांनी व्हिडिओ चित्रीकरण करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सॅम्युअलच्या आईने उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सिद्धार्थ शिरोडकर यांच्याकडे निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची तसेच चौकशीदरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
कुटुंबीयांच्या मते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याच्या आरोपावरून सॅम्युअलला पोलीस ठाण्यात बोलावून सुमारे सात तास त्याला तिथे बसवून ठेवण्यात आले. या काळात त्याच्यावर मानसिक दबाव आणण्यात आला आणि त्याचाच परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

शवविच्छेदन अहवालामुळे आत्महत्येच्या कथित घटनेबाबतही नव्याने प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर सॅम्युअलने स्वतःवर गोळी झाडल्याचे सांगितले जात असले, तरी त्याआधी झालेल्या दुखापतींचे स्वरूप आणि कारणे याबाबत सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे.
मोर्चादरम्यान सॅम्युअलच्या बहिणीसह नातेवाईकांनी पत्रकारांशी संवाद साधताना पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पोलिसांनी आरोप फेटाळले
दुसरीकडे, म्हापसा पोलिसांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सॅम्युअलला चौकशीसाठी दुपारी साडेतीन वाजता बोलावले होते. रात्री नऊ वाजता त्याला घरी पाठविण्यात आले. या कालावधीत त्याला कोणत्याही प्रकारची मारहाण करण्यात आलेली नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

दरम्यान, सॅम्युअलकडे रिव्हॉल्वर कसे आले, हा प्रश्नही चर्चेचा विषय ठरत आहे. नातेवाईकांनी याबाबत अनभिज्ञता व्यक्त केली असून, या शस्त्राचा उगम आणि त्यामागील परिस्थितीचा तपास करण्याची मागणी होत आहे. मोर्चात सहभागी झालेल्या शेकडो नागरिकांनी हातात मेणबत्त्या घेऊन न्यायासाठी घोषणाबाजी केली. रात्री आठ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यासमोर आंदोलन सुरू होते. त्यानंतर मोर्चा जवळील चर्चकडे वळला. तेथे सर्वांनी मेणबत्त्या अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.