35 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला; कुटुंबातील सदस्यांना ठेवले बांधून; तपास पथके शेजारील राज्यांत रवाना
गणेशपुरी-म्हापसा येथील गणेश मंदिराजवळील डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर काल पहाटे 3 वाजता दरोडा पडला. बुरखा घातलेल्या 6 दरोडेखोरांनी दोन तास बंगल्यात धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली. दरोडेखोरांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना बांधून ठेवत सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि अन्य मौल्यवान वस्तूंसह जवळपास 35 लाखांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पलायन करण्यासाठी घाणेकर यांच्याच कारचा वापर केला. या घटनेनंतर म्हापसा पोलिसांनी श्वानपथकासह घराची पाहणी केली. या गंभीर घटनेची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलीस महासंचालकांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, दरोडेखोर परराज्यांतील असल्याचा अंदाज व्यक्त करून गोवा पोलिसांनी आपली पथके महाराष्ट्र व कर्नाटकात रवाना केली आहेत.
सविस्तर माहितीनुसार, दरोड्याची ही घटना मंगळवारी पहाटे 3 ते 5 या दरम्यान घडल. डॉ. घाणेकर यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना 6 दरोडेेखोर बंगल्यात घुसले. या दरोडेखोरांनी येताना आपल्यासोबत सुरे, लहान पारय व इतर लोखंडी हत्यारे आणली होती. सुरुवातीला एकाने खिडकीचे ग्रिल्स कापून आत प्रवेश केला आणि नंतर आतून दार उघडून इतरांना बंगल्यात घेतले. त्याचवेळी डॉ. घाणेकर यांची 80 वर्षीय वृद्ध आई स्वयंपाक खोलीत चहा करत होती. तिला चाहूल लागण्यापूर्वीच दरोडेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. तिला सुरीचा धाक दाखवत तिथेच बांधून ठेवले.
यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा कुटुंबातील अन्य सदस्यांकडे वळवला. पहिल्यांदा डॉ. महेंद्र घाणेकर आणि नंतर त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा घाणेकर यांना चादर आणि साडीच्या सहाय्याने बांधून ठेवले. तर त्यांच्या 14 वर्षीय मुलीला खोलीत बंद करून ठेवले. त्याआधी तिच्याकडून कपाटांच्या चाव्या घेतल्या. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांकडील मोबाईलही त्यांनी काढून घेतले. यानंतर त्यांनी कपाटे फोडून सोन्याचे दागिने व अन्य मौल्यवान वस्तू मिळवल्या. याशिवाय महिलांच्या अंगावरील रोजच्या वापरातील दागिनेही काढून घेतले. मात्र रोख रक्कम सापडत नसल्याने त्यांनी कुटुंबातील सदस्यांना सुऱ्याचा धाक दाखवत धमकावण्यास व मारहाण करण्यास सुरुवात केली. कुटुंबातील सदस्यांना कोणताही धोका पोहोचू नये, म्हणून डॉ. घाणेकर यांच्या आईने आपल्याकडील 8 ते 10 लाखांची रोकडे त्यांच्याकडे सोपवली. बराच ऐवज मिळवल्यानंतर दरोडेखोरांनी डॉ. घाणेकरांची कार घेत घटनास्थळावरून पलायन केले.
मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी भेट
गणेशपुरी म्हापसा येथे काल पहाटे झालेल्या दरोड्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेश म्हापसा पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पोलीस महासंचालक आलोक कुमार, पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी व तपासकामाचा आढावा घेतला.
आमदार डिसोझांकडून पाहणी
म्हापशाचे आमदार तथा उपसभापती ज्योशुआ डिसोझा यांनी काल घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गणेशपुरी हा भाग आपल्या घरापासून जवळ आहे. अशा घटना घडू लागल्या, तर ती सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. पोलीस नक्कीच दरोडेखोरांना पकडतील; मात्र यापुढे प्रत्येकाने सावध राहावे, असे आवाहन डिसोझा यांनी केले.
दरोडा म्हणजे गोवा
पोलिसांचे अपयश : आलेमाव
डॉक्टरच्या बंगल्यावर पडलेला दरोडा म्हणजे गोवा पोलिसांचे अपयश असल्याचा आरोप काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या अपयशामुळेच शहरातील भरवस्तीत दरोडा पडला. गोवा पोलिसांना राज्यात गुंडांकडून लोकांवर होणारे हल्ले, तसेच चोऱ्या व दरोडे रोखण्यात पूर्णपणे अपयश आल्याचा आरोप आलेमाव यांनी केला.
नाकाबंदीच्या कामी तर गोवा पोलिसांना पूर्णपणे अपयश आलेले असून त्यासंबंधी आपण वेळोवेळी आवाज उठवला असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. दरोडा पडल्यानंतर ते परराज्यांत नोंदणी झालेली वाहने अडवून तपासणी करू लागले असून, दरोडेखोर गुन्हा केल्यानंतर थांबतील काय, असा प्रश्न आलेमाव यांनी केला. तसेच पोलिसांचा तपासकामाचा दर्जा घसरला असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांत तक्रार दाखल
या प्रकरणात डॉ. महेंद्र घाणेकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यात अज्ञात व्यक्तींनी दरोडा घालून सुमारे 35 लाख रुपयांचा ऐवज पळविल्याचे नमूद केले आहे. काही अज्ञात व्यक्तींनी बंगल्याच्या मुख्य हॉलचे धातूचे ग्रिल तोडून बंगल्यात प्रवेश केला. तक्रारदाराला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कापडी दोरीने बांधून ठेवले, तसेच त्यांना शारीरिक दुखापत आणि जीवे मारण्याची गंभीर धमकी दिली. दरोडेखोरांनी घरातून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम, काळ्या रंगाची मारुती अल्टो कार (क्र. जीए-03-पी-7187) असा सुमारे 35 लाखांचा ऐवज पळविला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक वाय. मांद्रेकर पुढील तपास करीत आहे.
दरोडेखोर चहा प्यायले
डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या आई सुहासिनी ह्या दररोज पहाटे लवकर उठतात. लवकर उठून त्यांना चहा पिण्याची सवय आहे. ज्यावेळी दरोडेखोर घरात घुसले, तेव्हा त्या चहाच बनवत होत्या. सुहासिनी यांना सुऱ्याचा धाक दाखवत बांधून घातल्यानंतर दरोडेखोरांनी तो चहा आपण पिला.
फळे आणि खाद्यपदार्थांवरही मारला ताव
चहावरच न थांबता दरोडेखोरांनी फ्रीज आणि टेबवर ठेवलेली फळे आणि अन्य खाण्यापिण्याच्या वस्तू देखील फस्त केल्या.
तोंडात कोंबले कापडाचे बोळे
दरोड्यावेळी कोणीही ओरडू नये, यासाठी दरोडेखोरांनी कुटुंबातील सदस्यांना बांधून घातल्यानंतर त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबले.
मुलीला कोणतीही इजा नाही
कुटुंबातील अन्य सदस्यांना बांधून ठेवले असले तरी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या मुलीला दरोडेखोरांनी बांधून ठेवले नव्हते. तिला एका खोलीत बंद करून ठेवले. मात्र तिला कोणतीही दुखापत किंवा इजा पोहोचवली नाही.
दरोडेखोरांनी नेलेली कार सापडली पणजीत
बंगल्यावर दरोडा घातल्यानंतर दरोडेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेली डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या यांची कार पणजी कदंब बसस्थानकाजवळील अटल सेतू खालील पार्किंग जागेत बेवारस स्थितीत काल दुपारी आढळून आली. गोवा पोलिसांच्या फॉरेन्सिक विभागाने सदर कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी ती ताब्यात घेतली. सदर कारगाडीमध्ये हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या टोप्या व इतर वस्तू आढळून आल्या.
दरोडेखोर हे कारने पणजी बसस्थानकापर्यंत आले. अटल सेतू पुलाखालील पार्किंग जागेत कार पार्क करून नंतर ते पळून गेले. त्यानंतर दरोडेखोर कुठल्या वाहनाने पळून गेले ह्याबाबत अजूनपर्यंत काहीच सुगावा लागलेला नाही.
गोवा पोलिसांनी या दरोडा प्रकरणामध्ये आंतरराज्य टोळी गुंतल्याचा कयास व्यक्त करून पोलीस पथके शेजारी कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात रवाना केली आहेत. ह्या दरोडा प्रकरणानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
दरोडेखोरांना लवकरच अटक होईल : मुख्यमंत्री
डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून, त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला. डॉ. घाणेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी डॉ. घाणेकर कुटुंबीयांची भेट घेऊन दरोड्याबाबत माहिती जाणून घेतली. पोलीस दरोडा प्रकरणातील संशयितांच्या मागावर आहे. या घटनेनंतर नाकाबंदी वाढविण्याची सूचना केली आहे. रात्रीची सुरक्षा अधिक प्रमाणात ठेवण्यासाठी रात्रीच्यावेळी ड्युटीसाठी अधिक पोलीस तैनात करण्यात येणार आहे. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून खबरदारी घेतली जाणार आहे. दरोड्याचे स्वरूप पाहता असे दिसते की हे बाहेरील दरोडेखोरांनी काम केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

