म्हापशात ट्रक घरावर कलंडल्याने नुकसान

0
109

समतानगर-खोर्ली म्हापसा येथील चढावावरून जाणारा रिकामी गोणपाट वाहून नेणारा जीए ०१ डब्ल्यू ५८४७ हा ट्रक कलंडून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. हा अपघात काल सायंकाळी ६.३० वा. घडला. हा ट्रक समतानगर येथे राहाणारे कटारिया यांच्याकडील रिकामे गोणपाट भरून येथील चढावा वरून म्हापसा येथे येत असताना अती वजनामुळे तो ही चढण काढू शकला नाही. त्या ट्रकाच्या वाहन चालकाचा त्या वाहनावरील ताबा सुटला आणि तो तेथील बाबगो सावंत यांच्या घरावर कलंडला. त्यामुळे घराचे आणि ट्रकाचे मिळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात कुणी जखमी झाले नाही. परंतु बाबगो सावंत याच्या घरासमोर दोन मुले खेळत होती. त्यांना ट्रक पडत असल्याचे दिसताच त्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.